पाणी वाचवा जीवन जगवा
पाणी वाचवा जीवन जगवा


धोंडू तसा खूप मस्तीखोर. कोणत्याच गोष्टीची तो पर्वा करत नसे .शाळेतून आला की बॅग फेक. कपडे काढून उडव. हातपाय धुवायला गेला की नळ तसाच चालू ठेव.अगदी मस्त कलंदर.
शाळेतील बाई पण पाणी जपून वापरा .पाणी हेच जीवन आहे. पाण्याचे अनमोल उपयोग समजावून सांगत.पण धोंडूला ते शब्द म्हणजे इकडुन तिकडे गेले वारे. ते शब्द कानावर पडत. पण समजत नसत.कळत असे पण वळत नसे. कुणा नातेवाईकांकडे गेला की देखिल असेच.उगाच पाणी प्यायला मागायचा पण पित नसे. वाया घालवी.
पाण्यात मस्ती करायला तर त्याला खूप आवडत असे. पाणी म्हणजे खेळ असेच त्याला वाटे.
एक दिवस गंमतच झाली.राजू सकाळीच उठला. तोंड धुवायला गेला नळातून पाणीच येईना. पाणी गेले की काय?इथे तिथे पाहू लागला .पण काय इतर ठिकाणी पाणी होते पण त्याच्याच घरी नाही. हंडे कळशी रिकामी. घरातही कोणी नाही. आधी त्याला आश्चर्य वाटले .पण हळूच भिती ही डोकावू लागली. पुन्हा पुन्हा तो नळ उघडून पाहु लागला. पण छे! अन् नळातून आवाज आला .धोंडू तू नेहमी पाणी वाया घालवतोस ना?कुणीही कितिही सांगितले तरी ऐकत नाही ना?आता तुला कुठेच पाणी मिळणार नाही? तो अचंबित झाला.
बेफिकीरिने तो म्हणाला "नदीला आहे की भरपूर पाणी". तो धावतच नदीवर गेला. अरे बापरे! बारमाही पाणी असणारी नदी ठणठण गोपाळ. एक थेंब पाणी नाही.
तिथे पक्षांचा थवा आला. ए खंडू पळ की इथून तुझ्या बेजबाबदारपणामुळे आम्हालाही पाणी नाही. किती प्राणी जिवाला मुकले .काहि जाती नष्ट ही झाल्या. पळ इथून आधी. हे आपल्याबाबत काय घडतेय हे त्याला कळेचना. कधी नव्हे ती त्याला भरून आले .पण काय ? डोळ्यातून ही पाणी येईना.आता बाकी तो खरेच घाबरला. तिथून निघाला.
धावत धावत एका झाडाखाली बसला. थोड्याच वेळात झाडातून आवाज आला "ए खंड्या उठ, पळ इथून तुझ्यावर पाणी रुसले. तू जिथे जाशील .तिथून पाणी नाहीसे होणार. तू इथे बसलास तर पाण्यावाचून मी तर मरून जाईन . मग उन्हात दमलेल्या पांथस्याला सावली कुठून मिळेल?पक्षी त्यांच्या पिलांना सुखरूप कुठे ठेवतील. माझ्याशिवाय इतर झाडे ही कशी जगतील?वनस्पती नाहीतर मानवाला अन्न वस्त्र निवारा कोठून मिळेल. पाऊस कसा पडेल?सगळी सजीव सजीवसृष्टी पाण्याशिवाय राहूच शकत नाही. पाणी हेच जीवन आहे. सगळ्यांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा तू इथून निघ.
अरे पण कुठे जाऊ?काय करु ?मला कुणी सांगेल काय?हे काय भिती वाटतेय पण अंगाला घामही येत नाही अरे बाबा हे पाणी खूपच रुसलेय. पाण्याशिवाय अंघोळ नाही. प्रातर्विधी नाहीत. जेवण नाही .स्वच्छ कपडे नाहित. काही काही काहीच नाही.आता खंड्याचा जीव गुदमरु लागला .आवंढा गिळायला गेला तर घसा कोरडा.पाण्याशिवाय एक क्षण ही नाही हे त्याला पटले.
सगळी शक्ती एकवटली तो मोठ्याने ओरडला "हे जलदेवता मला खरेच माफ कर. तू नसशील तर कुणाचेच अस्तित्व राहणार नाही. आता मी पाणी जपून वापरेन .इतरांनाही वापरावयास लावीन. आता चुकणार नाही .कान पकडतो. लोटांगण घालतो." धप्प असा मोठ्याने आवाज झाला. काय झाले असेल बरे?
अहो खंडूला पडलेले ते स्वप्न होते लोटांगण घालताना तो पडला त्याचा आवाज होता तो. आई भाजी धूत होती. ती घाबरून तशीच बाहेर आली." खंड्या खंड्या अरे काय झाले? "
काही नाही पाण्याचा आवाज कुठून येतोय . आधी नळ बंद कर. पाणी ईश्वराने दिलेली देणगी आहे . जपून वापरा. जा आधी नळ बंद कर. त्याला रडू आवरेना. डोळ्यातील पाण्याचा झराही मुक्तपणे वाहू लागला. तो मनोमन म्हणाला पाणी वाचवा जीवन जगवा