पान्हा
पान्हा


तन्वीची भुकेची वेळ झाली होती. सुरेखा वाटीत दूध कोमट करून तन्वीच्या उठण्याची वाटच बघत होती पण आज बाईसाहेब अगदी गाढ झोपल्या होत्या मऊ मऊ दुलईत. उठण्याचे मुळी नावच घेईनात. सुरेखाला सारे आवरून कधी एकदा घरी जातो असे झाले होते कारण घरी तिची लेक 'सगुणा' तिची वाट पाहत होती ना !
बराच वेळ वाट पाहिल्यावर शेवटी एकदाची चुळबुळ सुरु झाली तन्वीची. वेळ न दवडता लगेच सुरेखाने तिला मांडीवर घेतले आणि चमच्याने दूध पाजू लागली. तन्वीला भूक लागली होती खरी... पण चमच्याने दूध नको होते आज. तोंडात दूध घातले की फुर्र करून बाहेर फेकून द्यायच्या बाईसाहेब. अर्धा तास प्रयत्न करूनही तन्वी दाद देईना. रडून नुसता गोंधळ घातला तिने. भुकेनी अगदी कासावीस झाली होती. पण हट्ट ....
आणि आज मॅडमची महत्वाची मिटिंग होती क्लायन्टशी त्यामुळे त्यांना आ
जिबात वेळ न्हवता तन्वीला घ्यायला. मॅडमनी बजावूनच ठेवले होते की त्यांना कसल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नकोय म्हणून. सुरेखाच्या जीवाची घालमेल होत होती. भुकेने व्याकुळ झालेल्या तन्वीकडे तिला पाहवेना. सगुणाच दिसू लागली डोळ्यासमोर. शेवटी एका क्षणी न राहवून तिने तन्वीला पदराखाली घेतले. थोड्याच वेळात पोट भरल्याने शांत होऊन तन्वी हसू खेळू लागली.
मॅडमची मिटिंग लांबतच चालली त्यामुळे सुरेखाला निघताही येईना आणि तिकडे सुरेखाच्या घरी फाटक्या गोधडीवर खेळत पडलेल्या सगुणाने भुकेने रडून रडून गोंधळ घातला. आजी पाजवीत असलेले पाणी तिला मुळीच नको होते. फुर्र करून पाणी बाहेर फेकत आईच्या दुधाची वाट पाहत शेवटी रडून रडून दमून भूकेपोटीच झोपी गेली बिचारी.
आणि आपल्या फुटलेल्या पान्ह्याकडे दुर्लक्ष करीत सुरेखा तन्वीला खेळवत राहिली.