ऑन लाईन शाळा
ऑन लाईन शाळा
कथेतील पात्र: शिक्षिका, मयूर, वरद, हेमा, श्रेयस इतर मुले
*शिक्षिका :-* चला आज दहा मिनिटे आधीच लिंक पाठवते, म्हणजे वेळेवर क्लास चालू होईल.
*( मुले लिंक जॉइन करतात.)*
*मयूर :-* गुड मॉर्निंग मॅम.
*( असे म्हणत सगळी मुले क्लास जॉईन करतात)*
*शिक्षिका:-* गुड मॉर्निंग. आलेत का रे सगळे ? ठीक आहे. बघू दे मला...... मयूर ,कार्तिक ,हेमा, श्रेयश... हे विकास जवंजाळ कोणाचे नाव आहे?
*वरद :-* मॅम, मी वरद आहे. माझा मोबाईल बिघडला म्हणून मी विकास काकांच्या मोबाईल वरून लिंक जॉइन केली.
*शिक्षिका :-* ठीक आहे, ठीक आहे! दुसऱ्यांच्या मोबाईल वरून लिंक जॉईन केल्यावर आम्हाला सांगत जा बाळांनो, नाही तर बाहेरचे कोणी ही लिंक जॉइन करतात.
*वरद :-* ओके मॅम !
*शिक्षिका :-* मुलांनो आज मी तुमची सूर्य, चंद्र, पृथ्वी या धड्यावर उजळणी घेत घेत प्रश्न विचारणार आहे, तर सगळ्यांनी उत्तरे द्यायची बरं का!
*( कोण तरी लेफ्ट होते)*
मध्येच कोण लेफ्ट झाले रे ?
*हेमा :-* मॅम तिच्या मोबाईलची बॅटरी संपत आली होती, तिने मला मेसेज करून सांगितले.
*शिक्षिका :-* अच्छा पहिलाच क्लास आहे हा अजून सुरूही झाला नाही, तोपर्यंत बॅटरी संपली ?
*श्रेयश :-* मॅम, माझ्या पप्पांचा एक अर्जंट कॉल आला आहे. त्यांना मोबाईल हवे आहे. मी परत जॉईन होतो.
*शिक्षिका :-* शाब्बास ! काय शिकवायचे तुम्हाला? निदान क्लास चालू असताना तरी व्यवस्थित लक्ष देत जा. फोन कॉल्स परत द्यायचे. पालक लोक ही समजून घेत नाही. आधीच ऑनलाइन शाळेमुळे मुलांचे लक्ष शिकण्यापेक्षा मोबाईल खेळण्यात जास्त असते, मग कसे त्यांना शिकवायचे ?
*मयूर :-* मॅम प्रश्न विचारताय ना ?
*शिक्षिका :-* हो, मग मला सांगा, चंद्र सूर्याभोवती फिरतो का पृथ्वी भोवती ?
*(सर्व मुले एकदम ओरडतात)*
*मुले :-* मॅम मी सांगू का ? मी सांगू का ?
*शिक्षिका :-* अरे.... हो...हो...हळूच जरा ! एकदा एकानेच उत्तर द्यायचे. अच्छा संस्कृती तू सांग.
*( संस्कृती लेफ्ट होते)*
*मयूर :-* मॅम संस्कृतीला उत्तर येत नसेल म्हणून ती लेफ्ट झाली असावी.
*शिक्षिका :-* अच्छा ! हे बरं आहे तुमचं ! म्हणजे उत्तर नाही आले की लगेच लेफ्ट व्हायचे आणि कारण सांगायचं की नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून.
ठीक आहे मयूर तु उत्तर दे
*मयूर :-* चंद्र पृथ्वीभोवती फिरत फिरत अप्रत्यक्षरीत्या सूर्याभोवती फिरतो.
*शिक्षिका :-* अगदी बरोबर !
आजच्या तासाची वेळ संपली आहे. उद्या यावेळीच भेटूया पण फक्त हजेरी पुरते क्लास अटेंड करू नका, तर शिकण्यासाठी अभ्यासासाठी क्लास जॉईन करा. प्रामाणिकपणे क्लास अटेंड करेल त्यालाच व्यवस्थित समजेल.
*मुले :-* हो मॅम....बाय..... उद्या भेटू .
*(सर्व मुले मीटिंग मधून लेफ्ट होतात.)*
