नववधूचे आईस पत्र
नववधूचे आईस पत्र


आईस सविनय शिरसाष्टांग नमस्कार,
आई मी तुला सोडून आले गं पण माझं संंपूर्ण लक्ष तुझ्याकडे आहे. आई तू स्वता:ची काळजी घे! माझी चिंता करायची नाही, मी माझ्या सासरी अगदी सुखात आहे. सध्या मला इथे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. पण तूझ्याविना काहीच बरं वाटत नाही.
आई मी तुझी लाडकी तनया, अशी का गं तू मला दूर केलेस, मला तुम्हा सर्वांची खूप खूप आठवण येते. बाबाची, दादाची, आजी-आजोबाची, आपल्या घराची, गावाची जिथे मी लहानाची मोठी झाली, माझ्या जीवलग मैत्रिणींची, माझ्या शाळेची, मला प्रत्येक वस्तूची आठवण क्षणोक्षणी येतेय. कुंडीमधल्या गुलाबाची गोड झाडांची, किती हौशीने मी ती रोज पाणी घालून, खत देवून जगवली होती, मी येताना बघितले होते वळून साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण गुलाबाने आपली मान खाली टाकली होती. जणू मला मोठं मन करून उदास होवून निरोप देतो आहे.
माझं घर म्हणत होते मी आजवर, ते घर आज माझ्यासाठी परके झाले. आणि ज्यांना मी कधीच पाहिले नव्हते तिथे मी येऊन वसले, ही कसली गं आई रीत-परंपरा, या हिंदू संस्कृतीचे नियम? हे नियम मुलींसाठीच का आहेत, हा नियम मुलांना का लागू होत नाही, त्यांना आपलं हक्काचे घर का नाही सोडावे लागत? आम्ही काय वस्तू किंवा जनावर आहोत, आम्हा मुलींनाच सर्व सासरचे चांगलं-वाईट सहन करून दिवस काढावे लागत असते. असे कोणते पाप आमच्याने घडत असते? वरून आई तुझी शिकवण लक्षात आहे माझ्या, ती म्हण तू नेहमी म्हणायची "ब्राह्मणाला दिली गाय अन तिची आशा काय" आई मी तूझी लाडाची लेक ना! मग तू अशी का म्हणालीस मला?
आई जर का मला योग्य पती व सासर मिळाले नसते तर माझं काय झालं असते इथे, हो मी मानते की मुलींना वयात आल्यानंतर चांगल्या पतीची गरज असते, तिला सासर आवश्यक असते, म्हणून का तिला दान समजून द्यायची, नाही आई तुला माझ्या बोलण्याचा राग येईल पण हे कन्यादान नको वाटते गं मला, तुझ्या रक्तमासाची मी तुझी लेक अशी दानात देणे कितपत योग्य असतंय!
ही जर जगाची रित असेल ना! तर आम्ही मुलींनी आपले भाग्य स्वत:च बनवायचे मी ठरविले आहे. "मी सर्वांची मनापासून सेवा करीन साऱ्यांना प्रेम देईन, कुठेच कोणाला बोलण्यासाठी जागा देणार नाही" व मी माझा सन्मान उभा करून संसार चांगला करून दाखविन. पण जर का मला कोणी अपमानित केले आणि कष्ट दिले तर मी सहन करणार नाही. मला शिक्षण शिकवून तुम्ही माझ्यावर अतिशय उपकार केलेत. त्याची जाणीव आहे मला, मी इतर मुलींसारखी कुढत जीवन जगणार नाही. आरोप-प्रत्यारोप सहन करणार नाही, मी कधीच अन्याय सहन करणार नाही. त्यातून मी अलगदपणे वाट काढीन व सुख-दु:खातही सासरची साथ देईल. ते कुटूंब आता माझे सर्वस्व आहे. मी तनामनापासून इमाने-इतबारे निटनेटका संसार करेन. फक्त मला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज लागेल. आई तुला एक गोष्ट निक्षून सांगते, मी कधी तुझ्या कानावर कोणतीच वाईट गोष्ट येऊ देणार नाही.
मुलींचा हक्क काय असतो, हे मला माहित आहे. आई तू पण खूप सोसलं आहे. त्यात सहनशीलता तुझ्यात भरलेली आहे, पण विचार कर आज प्रगत देशात अन्याय सहन करने योग्य आहे का? व तो का करावा? आम्हीपण पुरूषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून तडजोड करून बाजू सांभाळू, पण रडत बसणार नाही. तू माझ्या मैत्रिणींना हे पत्र वाचून दाखवशील. आणि त्यांना आपल्या मुलीचे विचार समजवून सांगायचे आहेत व म्हणावं, तुम्हीपण दिलेरीने वागा. अन्याय झाल्यास त्वरित पाऊल उचला. आणि मुली आहोत म्हणुन काय झालंय, स्वत:ला कमी लेखू नका व आपले जीवन सुंदर करा.
खरंच आई तुला पत्र लिहिल्यावर मला खूपच हलके हलके वाटत आहे. मला नेहमी तुझी काळजी असणार, आई तूपण दिलेरीने वाग म्हणजे तुझं आयुष्य सोपं होईल. मी तुझा लहान बाळ आई, मी काय सांगणार तुला. तू माझी अजिबात काळजी करू नकोस. पहिला सण आखाडीला दादाला घ्यायला पाठवशील, मग खूप गप्पा मारूया. शेष शुभ.
लोभ असावा.
विनंती विषेश
तुझी लाडकी लेक