नववधू प्रिया मी (भाग 1)
नववधू प्रिया मी (भाग 1)
सखू अग सांच्याला पावण येणार हायेत तुला बघाया. कुठं बाहीर नग जाऊ शारदा लेकी ला म्हणाली. आये कोण हायेत ग ते पावण ?
तालुक्याच्या गावातल हायेत, रस्त्याच्या कामा वर मजुरी करतो तो पोरगा शाम नाव हाय त्याच. तुझ्या आत्या कडन पावण हायेत ते लोक.
सखू नुकतीच यौवनात पदार्पण केलेली नव यौवना.चौथी पर्यंत शिकलेली. गावातच लहानाची मोठी झाली. बाप दारू पिऊन एक दिवस झोपेतच गेला. आई शारदा लोकांच्या शेतात मजुरी ला जाऊ लागली. सखू एकटीच मुलगी तिला. तीच लग्न चांगल्या घरात व्हावे एवढीच तिची इच्छा होती. आज येणारा मुलगा ठेकेदारा कडे कामाला होता म्हणजे बरा कमवणारा ,त्याला सखू नक्की पसंद पडलं . अस शारदा मनोमन विचार करत राहिली.
सखू दिसायला बरी होती. पण अंगा खांद्याने भरलेली. तिच्या मैत्रिणीची लग्न झाली होती. असे पण गावात मुलगी वयात आली की लगेच लग्न लावून देत असत. सखू च्या मैत्रिणी आपले लग्ना नंतर चे किस्से सखू ला सांगत असत. नवऱ्याचे प्रेम ,तो स्पर्श ,ती हुरहूर सगळं आपण ही अनुभवाव अस सखुला वाटत रहायचे. आपल्या स्वप्नातील राजकुमार कधी येईल अन आपल्याला सोबत घेऊन जाईल अशी स्वप्न ती बघत असायची. तारूण्य सुलभ भावना तिच्या मनात रुंजी घालत असत. सखुला अठरा वय नुकतंच संपलं होत. आज पावण येणार म्हणून ती खूप खुश होती. सारख सारख आरशात आपला चेहरा न्याहाळत होती.
आये कुठली साडी नेसू ग मी अस दहा वेळा सखू च विचारून झालं होतं. शारदा कड मोजून दोन च साड्या चांगल्या होत्या. एक तिच्या लग्नातली आणि एक पहिल्या दिवाळ सणाला सखू च्या बा ने घेतलेली. सखू ही एकच चांगली हाय बघ माझी साडी हीच घाल अन माझी लग्नातली हाय ती तू तुझ्या लग्नात घाल.
बर आये म्हणत सखू ने ती साडी चार चार वेळा नेसून बघितली. साडीत आपण मोठी दिसतो आणि सुंदर पण अस सखू ला वाटलं. आरशात आपलं रूप बघून सखू लाजत राहिली. कसा दिसत असल त्यो पोरगा? चांगला असल नव्ह ? असा विचार करत सखू संध्याकाळ कधी होते याची वाट बघू लागली. आजू बाजूच्या घरात पण समजलं होत की आज सखू ला बघायला पावण येणार हायेत. बायका शारदा कडे येऊन उगाच डोकावून जात होत्या. च्या ला साखर, पावडर दूध हाये का विचारून जात होत्या. ही सगळी तयारी आणि लगबग बघून सखू च्या मनावर मोरपीस फिरत होते.
चार वाजल्या पासून सखू तयार होत होती. छान साडी नेसली . केसाची वेणी घातली. डोळयात काजळ घातले. पावडर लावली. शेजारच्या सुमी ने शेवंती चा गजरा दिला होता तो वेणी वर माळला. आता सखू पावण्यां ची वाट बघत बसली. पाच वाजता येतो म्हणाले होते. सखू च घर म्हणजे एक स्वयंपाक घर चार फरशीच आणि बाहेर छोटी खोली जिथं एक लोखंडी खाट होती. मग जागा दोन लोकांना बसण्या पुरती उरत होती. पाच वाजता पाहुणे आले. एक म्हातारी एक वयस्कर माणूस आणि मुलगा शाम. शारदाने त्यांना पाणी दिले. पाहुणे खाटा वर बसले होते. शाम सावळा आणि अंगाने किरकोळ होता. दिसायला ठीक ठाक होता. शारदा ने बनवून ठेवलेला चहा घेऊन सखू बाहेर आली. पाहुण्या समोर पाटावर बसली. खाली मान घालून बसली खर तर तिला मुलाला बघायचे होते पण ते बर दिसले नसते. शेजारच्या बाया,पोरी सखू च्या दारात उभ्या होत्या. शाम कडे बघून खुसपुस करत होत्या. म्हातारीने सखू ला दोन चार प्रश्न विचारले पण मुलगा काही बोलला नाही. म्हातारी म्हणाली ह्यो माझा पोरगा शाम आणि हे त्याचं लांबच काका हायेत. सोबत आल्यात. शाम मजुरी करतो. घरात आम्ही माय लेक दोघेच . आम्हाला तुमची पोरगी पसंद हाय. तुम्हाला काय अडचण नसल तर लवकर लगीन ऊरकुन टाकू मला आता घरकाम होत नाय.
शारदा म्हणाली हा आम्हाला बी पसंद हाय सगळं. तुम्ही म्हणता तस करू लगीन. पर माय बी एकलीच हाय शेतात रोजंदारीवर काम करती. मला जमलं तस लगीन करून देईल. ठीक हाय आम्हाला बी जास्त काय नग. मग पाहुणे जायला निघाले. सखू आत गेली होती. पाहुणे घरा बाहेर पडले तेव्हा सखू दारात येऊन शाम ला बघत होती. तिला तो दुरून दिसला पण तो कसा दिसतो या पेक्षा आपलं लगीन ठरलं यात तिला जास्त आनंद होता. आपलं कोणी तरी हक्काच होणार यात ती खुश होती. लग्नाच्या सुखद स्वप्नात ती रमून गेली.
येणाऱ्या महिन्यात लगेचच सखू आणि शाम च साधे पणाने लग्न झाले. सावळा किरकोळ असा शाम सखू ला आवडला होता कारण आता तो तिचा नवरा होता. आई च्या गळयात पडून खूप रडली सखू मग आई ने समजूत घातली तशी शान्त झाली . सखू तिची सासू आणि शाम तिघे घरी आले. शाम नेच पिठल भात बनवला आणि ते जेवले. त्याचा आई ला जास्त काम जमत नवहते ती आजारी असायची. शाम च घर म्हणजे एकच मोठी खोली त्याला मधून पडदा लावून चूल वेगळी एका बाजूला केली होती. बाहेर कॉट वर शाम ची आई झोपायची.
क्रमश
