Supriya Jadhav

Others

4.8  

Supriya Jadhav

Others

'निसर्गवेडी'

'निसर्गवेडी'

4 mins
495


     खूप वर्षांनी प्रिया माहेरी गेली होती. आई बाबांना कडाडून मिठी मारून तिनं घरातल्या इतर सदस्यांकडे मोर्चा वळवला. सगळे घर आनंदाने वेडे झालं होतं. तसं फोनवर बोलणं व्हायचं, पण प्रत्यक्ष भेटणं, बोलणं यात खूप फरक असतो हो ना? बच्चे कंपनीही खूष होती. आत्याने खाऊ आणला होता ना! "ये आत्या मला फिलायला ने ना तुज्या गालीतुन". छोटी तनू आपल्या बोबड्या बोलात तिच्याशी बोलत होती, तसे सगळे जण खळाळून हसले

.

      प्रियाच्या येण्याने सगळीकडे आनंद ओसंडून वाहू लागला होता. होतीच तशी ती प्रेमळ अन् बोलघेवडी. तिला अजय म्हणाला "ताई या वेळी तू भरपूर सुट्टी काढून आली आहेस ना?" "हो दादुटल्या, हो चांगली आठवडाभर राहणार आहे". "हे बरे झाले, नाहीतर तुझं घाई घाईत येणं. एक दोन दिवसांतच परत फिरणं नीट बोलणं, फिरणं पण होत नाही." अजय बोलला, प्रिया म्हणाली "हो रे मावशी, मामा पण म्हणत होते येतच नाहीस हल्ली भेटायला, एवढी बिझी झालीस का? खरे तर मला माझ्या व्यापातून नाही वेळ मिळत. या वेळी मात्र चांगली आठ दिवसांची रजा टाकलेय, मज्जा करू". रात्री जेवण झाल्यावर सगळ्यांनी अंगणात बसून मस्त हास्यविनोद करत गप्पा मारल्या.


        पहाटे पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रियाला जाग आली, अन् धावत ती अंगणात गेली. अंगणातील बागेत खुर्ची टाकून बसली. धुंदूर मुंदुर वातावरणात ती पक्षांचं चिवचिवणार गीत ऐकत बसली. प्रसन्न सकाळ , थंडगार बोचरी हवा , आल्हाददायक वातावरण आकाशातली चंद्रकोर, कित्येक वर्षांनी ती आपल्या आवडत्या गोष्टींचा पुन्हा आनंद घेत होती. "ताई.....अग आत ये, चहा घे." आईच्या आवाजाने ती भानावर आली व चहा घ्यायला आत गेली.

 

        चहा नाश्ता अन् शिळोप्याच्या गप्पा झाल्या अन् प्रिया पुन्हा आपल्या घरासमोरील आवडत्या बागेत गेली. मोगरा अगदी बहरून आला होता. त्याच्या सुवासाने आजुबाजूचे वातावरण सुगंधीत झाले होते. त्याच्या शी गप्पा मारल्या, ओंजळभर फुलं घेतली. तिचा लाडका रेड रोज प्रसन्न हसून तिच स्वागत करत होता. कोपऱ्यावरील कुंदेचा वेल झाडावर चढून गुच्छांनी फुलला होता. अन् मधुमालतीच्या फुलांची सुंदर कमाण अंगणातील गेटची शोभा वाढवत होती. तिने तिच्या आवडीच सोनचाफ्याचे झाड अंगणात लावलं होते. त्याच्याशी हितगुज करायला ती गेली. मस्त सुगंध दरवळत होता. सोनचाफ्याने फुलायला सुरुवात केली होती. अजय लगेच पुढे आला त्याने तिला चार पाच सोनचाफ्याची फुले काढून ओंजळीत दिली.तीने त्या आपल्या अत्यंत आवडीच्या फुलांचा मस्त सुगंध हुंगला. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता दिसली. तिच्या आवडीचा चाफा मुद्दाम तिने नर्सरीतून आणून अंगणात लावला होता. त्याच्याशी बराच वेळ हितगुज करून ती अंगणातल्या प्रत्येक फूलझाडावरून प्रेमाने अन मायेने हात फिरवत होती, त्यांच्याशी गप्पा मारत होती . आई अंगणात तुळशीला पाणी घालायला आली अन् तीला अजय म्हणाला "ताई किती खूष दिसतेय ना आज!"


    हो रे बाळा, तिचे निसर्गवेड माहित आहे ना तुला, पक्की निसर्गप्रेमी आहेत ती. अंगणात खुर्चीत बसलेल्या बाबांच्या जवळ जात प्रिया म्हणाली, "हे आहेत माझे निसर्ग गुरू, यांनी शिकवलं मला निसर्गावर भरभरून प्रेम करायला. ही बाग आम्ही दोघांनी मिळून फुलवलेय. आपल्या बागेत बाबा काहींना काही तरी काम करायचे, तेव्हा मी असायचे त्यांच्यासोबत. अगदी बागेत वाफे तयार करण्यापासून, बियाणे लावेपर्यंत मी निरीक्षण करायचे. अगदी सतरा प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. बाबा सुट्टीच्या दिवशी शेतात निघाले तर मी जायचे त्यांच्याबरोबर फेरफटका मारायला. आपल्या शेतावर किती माया करतात ते पाहिलेआहे मी ,अन् दादू तू फक्त खेळातच दंग असायचास. "हो बाई तूच निसर्ग वेडी आहेस, आम्ही नाही, झालं तर मग........ अजयच्या बोलण्यावर सगळे हसू लागले.


         प्रिया बोलू लागली, "आठवतात मला ते दिवस ,समोरच्या टेकडीवरचा निसर्ग, पावसाळय़ात त्याच्यावरचं ते ओसंडून वाहणारे सौंदर्य, हिरवागार माळ रान अन् टेकडीच्या पल्याड दूरवर डोंगरावरचा धो धो आवाज करत कोसळणारा केवाळी चा धबधबा. काकी सोबत शेतात गेले ना की सगळ्या भाज्यांची छान ओळख व्हायची, अन् माळरानावरची रानफुलं गोळा करतकरत बेभान होऊन नाचायची. "अग हळूहळू , घसरून पडशील "असे काकी म्हणायची पण मी कसली ऐकते, नाचतच सुटायची.त्या मऊशार हिरवळीवरून अनवाणी पायांनी नाचत रहायची. तिथेच झाली रानभाज्यांची ओळख. 'सगळ्या रानभाज्या तुला कशा माहीत?' असं मला मैत्रिणी आश्चर्याने विचारतात, तेव्हा मी त्यांना माझं निसर्ग वेड सांगते अन त्याही अवाक होतात.‌सोनकी, गौरूला, आघाडा,माका, दुर्वा आईला पूजेसाठी आणून द्यायची. सुंदर फुलांनी परडी भरलेली असायची. "हे सांगता सांगता प्रिया बोलली "ये दादा जायच का आता आपण आपल्या शेताशेजारच्या त्या समोरच्या टेकडीवर?हो, जाऊ या ना सायंकाळी, अजय बोलला "हो, सायंकाळी जाऊ, तिथून दिसणारा सूर्यास्त पण पाहायचाय मला, दादा अरे थोड लवकर जाऊ या जाताना आपल्या वाडीतील बायका भेटतील, त्यांच्याशी थोडं तरी बोलून पुढे जावे लागेल".


      दुपारचे जेवण मस्त प्रियाच्या आवडीचं ,पाले भाजी, भाकरी, मस्त लोण्याचा गोळा , भरले वांग, पावटे भात असा चुलीवरचे जेवण म्हणजे मेजवाणीच.साधारण सायंकाळी ४:३० च्या दरम्यान अजय अन प्रियासोबत भाचे कंपनी, मुलगी प्राची सगळे निघाले टेकडीवर, तिकडे जाताना वाडीतल्या सगळ्या वहिनी, काकी ,काकांनी खूप आस्तेवाइकपणे तिची ख्याली खुशाली विचारली. त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांचं आग्रहाचं चहाचे निमंत्रण घेत ती पुढे टेकडीवर गेली.

 

 गेल्या कित्येक वर्षांनी ती टेकडीवर आली होती. थोडाफार बदल तिथे झाला होता. पण टेकडी स्वतःचं सौंदर्य टिकवून अजून उभी आहे. टेकडीवर असलेली परिचित कडूनिंब, आंबा आणि वडाच झाडं पुर्वी होती तशीच होती. एक मस्त झोका घ्यावासा वाटला तिला. अगदी उत्साहाने ती सगळीकडे धावत होती. तिथे पुढेच थोड्या अंतरावर पूर्वीची त्यांची जुनी घरे होती तिथे ती पोहोचली. साधारण पाच वर्षांची असेल तेव्हा ती, तिला सर्व आठवत, आपलं घर, घरासमोरचा परिसर, गल्लीच्या टोकावरचा पिंपळ, मारुतीचे मंदिर, मंदिरासमोरची चाफ्याची झाडं. पायऱ्या उतरून थोडे पुढे गेल्यावर लागणारी विहीर. ती विहीर अजून सुस्थितीत आहे , अन ते चाफ्याचे झाड अजून डौलाने उभी आहेत. त्या निष्पर्ण चाफ्याच्या झाडावर आता फूल उमलायला सुरुवात झालेली. सायंछटात सोनेरी, केशरी रंगांच्या छायेत सुंदर दिसणारी चाफ्याची झाडे गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे उभी होती. तिला आठवलं तिच्या बालपणात ती छुमछुम पैंजण वाजवत त्या झाडाखाली पांढरी शुभ्र फुल वेचणारी छोटी प्रिया. तिने चाफ्याशी हितगुज साधत त्याला कडाडून मिठी मारली. चाफ्याने ही तिच्यावर फुलांची उधळण करत आपले प्रेम व्यक्त केले. ती मोहरून गेली आनंदून गेली, चाफ्याचे प्रेम अविस्मरणीय स्म्रुतीगंध देऊन गेलं, सायंकाळचा सूर्यास्त तिला अधिक सुंदर वाटून गेला .....



Rate this content
Log in