STORYMIRROR

Prerana Wadi

Others

3  

Prerana Wadi

Others

निर्णय

निर्णय

7 mins
236

   "अगं काय बोलतेस तू ?जिभेला हाडकूड आहे की नाही? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला!आता या वयात आम्हाला हेच बघायचं बाकी उरलं होतं काय? जनाची तर सोडलीच आहे;काही मनाची तर ठेवायची. लग्नाला बारा वर्षे झाले तुझ्या. पदरात अकरा वर्षाचा मुलगा आहे आणि आता तू नवऱ्यासोबत घटस्फोट घेऊन दुसऱ्याशी लग्न करायला तयार होते आहेस?कुठे फेडशील हे पाप ?समाजामध्ये आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही पोट्टे." दीपाचे आई-बाबा, मामा - काका तिला ताड ताड बोलत होते व आतल्या खोलीत दीपा फक्त रडत बसली होती. आकाश तिला बिलगुन बसला होता.

   समोरच्या खोलीतून पुन्हा आवाज येऊ लागले "एका पोट्टीने तर शेण खाल्लेले आहे. आता या वयात हिला ही दुर्बुद्धी सुचून राहिली. याच्याचसाठी आम्ही तुला लहानच मोठं केलं काय?" आई बाबा अत्यंत त्राग्याने बोलत होते. 

   अग जरा आकाशचा तरी विचार कर इतके दिवस त्याचे बाबा दुसरे होते आता अचानक दुसऱ्या बाबांसोबत तो राहणार. त्याच्या बालमनाचा तरी विचार करायचा शाळेमध्ये ,मित्रांमध्ये त्याला किती प्रश्नांचे उत्तर द्यावे लागतील ?त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा तरी विचार कर.

   म्हणतात ना! - - - ना भयम् ना लज्जा" तशातली गत आहे.

    दीपा आकाशला बाहेर खेळायला जाण्याबद्दल बोलत होती .पण त्याला परिस्थितीचे गांभीर्य कळत होतं तो आईला सोडायला तयार होईना व त्याच्या समोर हे सगळे विषय दिपालाही नको होते पण तो

 ऐकेना.

    शेवटी बाबांचा राग अनावर झाला. त्यांनी दीपाचा हात धरून तिला बाहेर खेचले आणि म्हणाले" हे सर्व दाखवण्यापेक्षा आमचे डोळे मिटलेले बरे. एक काम कर आमच्यासाठी थोडं विष आणून दे म्हणजे तू सुटशील."

आकाश मोठ्याने रडू लागला. या वेळेला बाजूच्या खोलीत बसलेला त्याचा मामा आशिष बाहेर आला त्याच्या कानात काहीतरी सांगून बळेबळे त्याला बाहेर घेऊन गेला. तसंही त्याला आई-वडिलांचे वागणं पटत नव्हतं आणि अप्रत्यक्षरीत्या त्याचा दीपाला पाठिंबाच होता.

     त्याने आकाशला बाहेर नेल्यावर दीपा ने तोंड उघडले ती म्हणाली. "मी विष तर आणणारच आहे. पण तुमच्यासाठी नाही.मीच खाते ते. नाही तरी माझ्या आयुष्यात काय आनंद आहे ?एक काम करा तुम्हीच मला खाऊ घाला मी माझा खून तुम्हाला माफ करते. आणि नाहीतर विष आणण्याची कशाला वाट पाहायची?  एखादा चाकू -सुरा आणून देते. ज्या हाताने मला लहानच मोठं केलं त्याच हाताने माझ्या बळी घ्या .रोजचं जिवंत मरण जगण्यापेक्षा एकदाची मेलेली बरी."

      तिने घेतलेला हा पवित्रा पाहून अचानक वातावरण बदलून गेलं.

    दीपा साधारण गरीब घरातली; पण अतिशय चुणचुणीत, सावळीशी, कुरळ्या केसांची, बोलक्या डोळ्यांची मुलगी. आई वडील गरीब. वडील एका खाजगी कंपनीत चपराशी. आई संसाराला हातभार लावण्यासाठी स्वयंपाकाचे काम करणारी. घरी तीन मुली आणि एक मुलगा.

खाजगी कंपनीचे दुःख माहीत असल्यामुळे वडिलांनी मोठ्या मुलीसाठी म्हणजे ज्योतीसाठी सरकारी नोकरीचा मुलगा पाहणं सुरू केलं. मुलगा मिळाला पण त्याची नोकरी दूर खेड्यात होती पण क्वार्टर होतं आणि सरकारी नोकरीचा मुलगा मिळाला याचा आनंदच फार मोठा होता.

ज्योतीने खेड्यात राहणं नाईलाजाने पत्करलं . खेड्यातले जीवन शहरातल्या मुलीने जगणं कठीणच पण तरीही तिने ते निभवलं. दोन मुलांची आई झाली.परंतु तिच्या यजमानांना म्हणजे प्रशांतला नेहमी जीव घाबरायचा ,चक्कर यायचे. तपासण्या केल्या तर त्यांना मधुमेह निघाला आणि तो फार वाढत होता त्यांनी पहिले अंगावर काढलं होतं. आता रोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागत होते. इतक्या कमी वयात त्यांना त्रास लागला आणि हे प्रमाण इतकं वाढलं की त्यांचीब दृष्टीच कमी झाली. दोन-तीन ऑपरेशन झाले पण हळूहळू दृष्टी गेली व आंधळेपण आलं. शेवटी दोघेही मुलाबाळांना घेऊन शहरात आले. त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली असल्यामुळे संवेदना तत्वावर ज्योतीला नोकरी शहरातच मिळाली. पण घरचा पुरुष फक्त घरातल्या घरात आणि त्यात आंधळेपण आलेलं .त्यामुळे सारखी चिडचिड. वातावरण नेहमी तंग. आणि अशातच नैराश्यानेच त्यांचा जीव गेला. घरावर फार मोठी कुऱ्हाड पडली. कमीत कमी सरकारी नोकरी मिळाली असल्यामुळे बरं चाललं होतं.

    दीपा घरामध्ये त्यातल्या त्यात दिसायला चांगली त्यामुळे सख्या आत्यानेच मागणी घातली. घरचे चांगले होते. शेतीवाडी, दूधदुभत्याचा धंदा. वरपांगी तर सगळं छानच होतं.सगळ्यांनी म्हटलं दिपाने भाग्य काढलं. वर्षभरात आकाशचा जन्म झाला आणि हळूहळू बुरखा गळायला लागला. दीपाचा नवरा संदीप एक नंबरचा दारुडा आणि कामचुकार होता. हळूहळू भांडण व्हायला लागली दीपा चुणचुणीत होती. कॉलेजचे एक वर्ष शिकली होती.पण आई-वडिलांनी लग्नाची घाई केली.शिकत असताना दीपा नोकरी पण करत होती. तिला संदीपचे घरी राहणं दारू पिऊन पडून राहण पसंत नव्हतं.ती त्याला वेळोवेळी समजावून सांगायची. साम, दाम, दंड, भेद सगळे उपाय करून झाले परंतु काही फरक पडेना. भांडण वाढून मारण्यापर्यंत वेळ गेली. आता पाणी डोक्यावरून गेलं होतं. दिपाने एक दिवस निर्धार केला आणि बॅग भरून आकाशला घेऊन माहेरी वापस 

आली. घरच्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला संदीप हो म्हणाला म्हणून सासू-सासरे वापस घेऊन गेले. परंतु व्यसनाधीन माणसाला सुधारणे कठीण असते .शिवाय घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे अंगात बादशाही घुसलेली.

   दीपा बाणेदार होती ती सरळ मुलाला घेऊन पुन्हा वापस आली आणि पुन्हा नोकरी करू लागले तिने संदीपलाही इकडेच यायला सांगितले पण घरचं आयतच मिळत असलेलं सोडून दहा-बारा हजाराची नोकरी करणे त्याला मंजूर नव्हते.दिपाने न हारता आकाशला मोठं करायचं ठरवलं. 

     तशातच मुलगा आशिष याचे एका जाती बाहेरच्या मुलीवर प्रेम जडलं. मुलगी एकुलती एक होती वडिलांचं डेली निड्सचं दुकान होतं. आशिष त्याचा मालक झाला असता. वडिलांनी आकाश पातळ एक केलं .आपल्या खालच्या जातीतल्या मुलीशी लग्न करायचं नाही असा आग्रह धरला स्वाभाविकच दोन्ही घरातले लोक तयार नसल्यामुळे आशिषला मन मारावे लागलं.तो आता एका दुकानात काम करतो. सांगून आलेल्या एका मुलीशी त्याचं लग्नही झालं मुलगी चांगली होती संसार चालू झाला पण आई-वडिलांबद्दलचा राग त्याच्या मनात अजूनही खदखदत होता .त्याने काही दिवसातच दोन खोल्या मागितल्या व वेगळा संसार थाटला.दोन खोल्यांमध्ये आई-बाबा दीपा रहायचे. वरच्या मजल्यावर आणखी दोन खोल्या होत्या त्या भाड्याने दिल्या आई-बाबांना खर्चा

साठी त्याचा आसरा होता.

    चौथी मुलगी आरती तिचेही प्रेम प्रकरण होते. मुलगा खालच्या जातीतला होता घरचे लोक परवानगी देणार नाहीत. म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. मुलाच बियर बारचा धंदा होता म्हटलं. त्यामुळे पैशाची कमीच नव्हती मुलगी खूप थाटामाटात सुखात राहत होती. आई-वडिलांनी मात्र तिचं नावच टाकलं . चार वर्ष तिच्या घरी पाऊल नाही टाकलं .पण एकदा बाबा आजारी असताना त्याच जावयाने आणि मुलीने खूप मदत केली. त्यामुळे संबंध पुन्हा जुळले. तिसरा जावई स्वतःचा बिअर बार असला तरी अगदी निर्व्यसनी होता आणि मुख्य म्हणजे स्वभावाने खूप छान होता. सगळ्यांना मदत करणारा हसतमुख त्यामुळे त्यांच्या घरी जायला दीपाला फार आवडायचे आकाशही तिकडे खुश असायचा .आरतीचे दोन मुलं होते व त्यांच्या शेजारी त्यांच्या भावाचं घर होतं. दोन्ही भावांमध्ये संबंध सलोख्याचे होते. त्यांच्या घरात सदैव आनंद दिसायचा आणि सुबत्ता दिसायची.

      परंतु दीपाची आई बाबा मात्र "पोट्टीने शेण खाल्लं !"हे वाक्य सोडायला तयार नव्हते. एकदा दिपाने म्हटलं की "दोन मुलींचे लग्न तुम्ही करून दिलं काय झालं? मला तर नात्यात दिलं. आज कोणता आनंद बघत आहे मी ?कमीत कमी तिला कुठल्या प्रकारची चिंता काळजी नाही आणि आपल्यालाही त्यांचाच आधार आहे हे तुम्ही कसे विसरता" पण तरीसुद्धा आई-बाबा म्हणायचे "पण आमचं नाक तर कापलं." यांच्या या मनोवृत्तीचा काय करायचं हा प्रश्न नेहमी दीपाला पडायचा पण बोलून उपयोग नसायचा.

    तशातच आरतीच्या सासरी नणंदेच्या मुलाचं लग्न होतं म्हणून सर्व गेले होते. लग्ना

चे विधी हळद, मेहंदी, संगीत सगळं साग्रसंगीत केल्या गेलं. सगळीकडे कसा आनंदी आनंद होता.दीपा ,आकाश तर फुलून गेले. लग्न बाहेरगावी होतं. आताशा बाबांची तब्येत फारशी ठीक राहत नाही. म्हणून आई-बाबा लग्नाला नाही गेले; बाकी सगळी मंडळी गेले.

     लग्नात आरतीच्या जावेच्या भावाशी म्हणजे अशोकशी दीपाचं बोलणं झालं. आकाशला दोन मुलं होते आणि त्याच्या बायकोचं कोरोनामध्ये निधन झालं होतं. पण दोन्ही मुलांना ते इतकं छान सांभाळत होते. बीसीए पर्यंत शिक्षण झालेलं होतं आणि एका खाजगी बँकेत संगणक अधिकारी होते. स्वभाव फार छान होता .पगार चांगला होता.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारकरी संप्रदाय चालवणारे असल्यामुळे देवधर्मी होते आणि निर्व्यसनी होते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अतिशय विनोदी स्वभाव होता. वातावरण अतिशय खेळीमेळीचं होतं. दीपा नकळत आकर्षित झाली. अशोकही दीपा कडे आकर्षित झाले. थट्टा- मस्करी, नाच -गाणे, अंताक्षरी मध्ये त्यांची एकमेकांवर छाप पडण्याची धडपड सर्वांच्याच लक्षात आली.. अशोकच्या वतीने अशोकच्या बहिणीने दीपासाठी भावापाशी मागणी घातली. भावाने दिपाला विचारल्यानंतर तिने लाजूनच हो म्हटलं. तसाही तिच्या संसारात काय राम होता?भाऊ पण अनुकूल होता. मोठी बहीणही तिच्या पाठीशी होती. प्रस्ताव घेऊन सर्व घरी आले आणि आई-बाबांनी पुन्हा एकदा आकाश पातळ एक करणे सुरू केले होते.

  दीपा रागाने बोलत होती अतीव दुःखाने बोलत होती. "तुम्हाला कधीच असं वाटत नाही का? आज माझ्या लग्नाला बारा वर्षे झाले तुमच्याकडे मला वापस येऊन आठ वर्ष होऊन गेले. माझं वय आत्ता फक्त ३२ वर्षाचं आहे .२४ वर्षाच्या वयापासून मला आयुष्यात कुठलेही सुख मिळाले नाही.मला ते कधी मिळावं असं वाटत नसेल का? नवऱ्याने सुधरावं यासाठी सगळे प्रयत्न करून झाले. जे जे नवस उपास तापास सांगितले तेही करून झाले त्यांच्यात तर काही फरकच पडत नाही.आजही तुम्हाला तुमच्या नसलेल्या प्रतिष्ठेची चिंता आहे माझ्या सुखाचा माझ्या भविष्याचा विचार करावासा का वाटत नाही?"

   आज इतकी दुनिया बदलली आहे .जग इतकं बदललं आहे पण अजूनही तुम्ही खोट्या प्रतिष्ठा अन् जात, समाज या भ्रामक समजुतींमध्ये अडकून मुलांवर बंधने घालतात त्यांचे असफल लग्न आणि संसार केवळ लोढणे होऊन एक रोग पाळावा तसा जन्मभर त्यांनी पाळावा अशी अपेक्षाही करता? आता शिकून सवरून जग बदलले आहे तुम्हा लोकांचे विचार कधी बदलतील ?या खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लावून मुलांच्या मनाविरुद्ध लग्न लावून त्यांना जन्मभर दुःख  लावून देता आणि म्हणून घटस्फोटाचे प्रमाण वाढते.लग्न टिकले नाही की मुलगी उछृंगल होती तिला घरादाराची किंमत नव्हती म्हणून दोष देतात."

ती म्हणाली "आजकाल मुलं मुली शिकलेले असतात, सज्ञान असतात. ज्यांना मतदानाचा हक्क आहे ;देशाचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे, त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार तुम्ही कधी देणार? अर्थातच कोवळ्या वयात केवळ शारीरिक आकर्षणामुळे मुला-मुलींच्या हातून काही चुका होऊ शकतात त्यासाठी आई-वडिलांचे मार्गदर्शन हवेच परंतु जर आई-वडीलच आपल्या पाठीशी असतील तर मुलं-मुली कधीही दुखी होणार नाहीत.

     मी तुमच्या मनाविरुद्ध कधीही केलं नाही. तुमची परवानगी मागत आहे .कधीतरी आपलं मन विशाल करून पहा आणि खोट्या प्रतिष्ठेपेक्षा माझ्या भवितव्याचा विचार करून पहा आकाशच्या भवितव्यांचा विचार करून पहा.जो बाप त्याचं काहीच करत नाही त्याचं नाव लावण्यापेक्षा जो आपल्या घराला खूप चांगला सांभाळत आहे आणिआकाशचाही सांभाळ करायला तयार आहे अशा बापाचा मुलगा होण्यात त्यालाही आनंदच वाटेल. तुम्ही आकाशला विचारा त्याने जर नाही म्हटलं तर मी नाही करणार लग्न."

     खरोखरच तेवढ्यातच आकाश आणि आशिष आले. बाबांनी आकाशला विचारले "तुला अशोक काका बाबा म्हणून चालतील का." आकाश आनंदाने उडी मारून म्हणाला हो नक्की चालतील ते खूप छान आहेत. त्यांची माझी खूप छान गट्टी जमली आहे . मला ते काका आणि त्यांचं घर खूप आवडलं."

आई-बाबांना त्यांचं उत्तर मिळालं एवढ्या छोट्या मुलाने इतक्या पटकन परिस्थिती सांभाळली आणि आपण अजूनही विचारच करतो आहे.

    शेवटी त्यांनी दीपाला नवऱ्याशी घटस्फोट घेऊन अशोकशी लग्न करण्याची परवानगी दिली.

     दीपा आईला बिलगली आणि म्हणाली "थोडासा समजूतदारपणा दाखवला आणि मुलांच्या पाठीशी उभे राहिले तर कदाचित असे बरेच संसार सांभाळले जातील."

    आशिष पेढे घेऊन आला आणि त्याने सगळ्यांचे तोंड गोड केले.


Rate this content
Log in