Sarika Jinturkar

Others

3.9  

Sarika Jinturkar

Others

ना उम्र की हो सीमा

ना उम्र की हो सीमा

3 mins
286


नातं म्हणजे नेमकं काय असतं... कदाचित एखाद्या गूढ रहस्यमय पुस्तकाचं त्यात खोल गुंतलेल्या वाचकाशी असावं तसंच...


प्रत्येकाच्या जीवनातला 'आजी' हा हळवा कोपरा असतो, तिच्या बटव्यामुळे आरोग्य तर गोष्टींमुळे बालपण समृद्ध होतं... माझ्या आयुष्याच्या गोष्टीतलं महत्त्वाचं पात्र आहे ती म्हणजे 'माझी आजी’... 

हिरव्यागार मायेच्या कुशीत दडलंय इवलंसं पातं.. तसं आमचं आजी- नातीचं नातं...


लहानपणीचा एक प्रसंग 

मी आणि माझ्या घरा शेजारची मैत्रीण, खूप घट्ट मैत्री होती आमच्यात माझ्या घरासमोरच्या अंगणात आम्ही खेळायचो, बागडायचो, एकदा असंच खेळता-खेळता तिच्या धक्क्यामुळे मी जोरदार खाली पडले, चांगलेच लागले म्हणून रडता-रडता मी घरात गेले, आजी समोरच बसलेली असल्यामुळे तिने काय झाले? म्हणून मला विचारले...


मी मोठ्याने मी नाही खेळणार आता? नाही बोलणार तिच्यासोबत, असं म्हणत घरात आईजवळ गेले..


आईप्रमाणे आपल्यावर जीव लावते ती म्हणजे आपली आजी दोन शब्दात व्यक्त होणारी मायेची माऊली, अशी माझी आजी चेहऱ्यावर उमलते.. अव्यक्त प्रेमाची सावली घेऊन माझ्याजवळ आली, काव्य स्वरूपात बोलायला तिने सुरवात केली, सखीला सोडून आली, मन उदास करत, इथे येऊन बसली. वाटलं नव्हतं मला असं काही घडेल, तुमच्या मैत्रिचा वृक्ष असा कोलमडून पडेल, तुमच्या खास मैत्रीला, कधीकाळी मधाचा गोडवा होता, त्या दिवसात तर तुझा रोजच दिवाळी पाडवा होता.. चूक नसावी तिची न तुझी खेळातच खोट असावी.. पडले तू याचं वाईट वाटतं पण रडून-रडून डोळ्यातलं पाणी आटतं गं बाळा.. विसर जा आता, सावर स्वतःला, तू म्हणशील तर तयार आहे मी तुझ्याशी खेळायला.. आणि मला समजावत ती खरंच माझ्यासोबत मनसोक्त खेळली..


काही क्षणांनी थकलेले डोळे मिटूनी मांडीवर आजीच्या अंग टेकूनी,

अंगाई सदृश स्वर मी अनुभवला होता, कोरड्या वृद्ध बोटातून मायेचा मोरपंखी स्पर्श झाला व माझा आनंद अनावर झाला...


बस त्या क्षणी माझ्या बालमनाला समजवत ती काही क्षण अगदी माझ्या वयाची झाली तेव्हा वाटले 


'ना उम्र की सीमा हो'....


दुसरा प्रसंग असा की,


घराशेजारी राहणाऱ्या मुलीचे लग्न झाले ती सासरी गेली. मी आजी असेच एकदा बसलो असताना, तिच्या पदराला हात पुसत तिच्याकडून गोड कौतुक करून घ्यायची भारी सवय मला असल्यामुळे व ती गोष्टींचे जणू भांडार असल्यामुळे तिच्याकडे वेळ असला की मी तिला काही सांगायचे आणि ती मला काही ऐकवायची...


एकदा असंच मी आजीला म्हणाली, 'मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं, आपली माणसं सोडून तिनेच का परकं घर आपलं मानायचं..


त्यावर आजी म्हणाली, 'अगं वेडे, हा तर सृष्टीचा नियम आहे. नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून.. तो येतो का तिच्याकडे कधी आपली वाट मोडून.. नदीचं पाणी किती गोड तरीही ती सागराच्या पाण्यात मिसळते आपलं अस्तित्व सोडून ती त्याचीच बनून जाते...

अगदी तसंच.. 


माझ्या जवळ असलेली बाहुली तिने हातात घेतली. भातकुलीचा खेळ खेळायला सुरुवात केली. जणू माझ्यासोबत तिही तेव्हा लहान झाली व माझ्यासोबत क्षणभर का होईना तिचे रम्य बालपण आठवण ती रमून गेली...


आज आठवण झाली रंगलेल्या त्या गप्पांची, आजीने सांगितलेल्या विविध गोष्टींची, तिच्यासोबत जगलेल्या त्या अविस्मरणीय क्षणांची, मुद्दामून मी तिच्या काढलेल्या खोड्यांची, त्या गोड रुसव्याची...


तिच्या सोबत साजऱ्या केलेल्या प्रत्येक आनंदी क्षणांची.. खरंच आजी माझ्यापेक्षा वयाने मोठी होती पण..

 

विश्वासाच्या वेलीवर फुललेलं, हृदयाच्या कोपऱ्यात हळुवार वसलेलं, मोठेपणा त्यागून कमीपणा घेणारं, माझ्यासाठी लहान होऊन ऋणानुबंध अलगद जपणारं मनापासून निस्वार्थ प्रेम करणार तिचं माझं नातं..


वयाचा विचार न करता तिने माझ्या सोबत केलेला तो अवखळपणा आणि तिच्या संस्कारमुळे समृद्ध झालेलं माझं आयुष्य... म्हातारी असली तरी आयुष्य समृद्ध करणारी साठीतली माझी आजी... आठवून आज मला म्हणावंसं वाटतं... 


"ना उम्र की हो सीमा"...


Rate this content
Log in