sunil sawant

Others

3.8  

sunil sawant

Others

मुक्तिबंध

मुक्तिबंध

5 mins
267


माई गेल्याची खबर सुहासला पोहोचलीच होती. तो यायला खुपच वेळ लागणार होता. थांबण्यात काहीच अर्थ नव्हता. आप्पांनी अंत्यसंस्कार आटोपून घेतले. दोन दिवसांनंतर सुहास आपल्या गावी आला. आप्पा ओसरीत आरामखुर्चीवर विसावले होते. त्यांना पहाताच सुहासला रडू फुटले. इतके तास आवरून ठेवलेले अश्रू अनावर होऊन वाहू लागले. धावतच तो आप्पांकडे गेला. आप्पांच्या पायाशी बसून तो माईच्या आठवणी काढून रडू लागला. अप्पाही अश्रू पुसत त्याचे सांत्वन करू लागले. थोड्या वेळानंतर आप्पांनी सुनेची आणि नातवंडांची विचारपूस केली. त्यांना येता येणार नाही हे आप्पांना सुहासने आधीच कळंवलं होतं.


त्यानंतर काही दिवस घरी सांत्वनासाठी कोणी ना कोणी येत राहिले. गावातले सर्वचजण माईला खूप मानीत. माईने सर्वांनाच काही ना काही मदत करून आपलेसे केले होते. सातआठ दिवसांनंतर एके दुपारी अप्पा आराम करीत बसले होते. सुहास त्यांच्या शेजारीच येऊन बसला. त्याचा अस्वस्थपणा पाहून आप्पांनीच विचारले, "काय रे काय झालं? अस्वस्थ दिसत. . ."

"आप्पा, तुम्हांला कारण माहित्येय. परवा माईचा दहावं आहे." सुहास आप्पांना अडवत म्हणाला. "तीन चार दिवसानंतर इकडचं सर्वकाही आटपलेलं असेल."

"तुलाही परदेशी परतावे लागेल. . . . आणि तुझ्याबरोबर मीही तिकडे यावं हीच तुझी इच्छा आहे ना?"

"होय आप्पा, मला तसेच वाटतेय, आप्पा तुम्ही येथे एकटे राहणार आहात. मला त्याची काळजी लागून राहील."

"साहजिकच आहे. पण तिथे आल्यावर तुझी काळजी संपूर्णपणे मिटेल?" आप्पांच्या ह्या प्रश्नाने सुहास चमकला.

"म्हणजे तुम्ही नाही येणार ?"

"तसं नाही रे, पण तेथे मला राहायला जमेल का, याचा विचार करतोय." आप्पांच्या उत्तराने सुहासला थोडीशी आशा वाटली.


आप्पाचं बोलणं सुरूच होतं. . .'' निवृत्तीनंतर मी येथे परतलो. गेली दहा वर्षे आम्हा दोघांचं मस्त चाललं होतं. मामुली तापाचं निमित्त झाले आणि माई गेली. तुला माहितीये माईचं सर्व आयुष्य खेड्यात गेलं, लग्न करून ती माझ्यासोबत या गावी आली आणि हे घर, हा परिसर, हा गाव तिचा झाला. मी शहरात त्यावेळी नोकरी करीत होतो. तिला घेऊन तिकडे गेलो पण ती नाही रमली. मी असूनसुद्धा तिची घुसमट व्हायची त्या शहरी वातावरणांत. तिला इथलीच ओढ होती. मीही समजलो. तिला शहरात राहण्याचा आग्रह न करता येथे आणून सोडलं. तिचा अखेरचा श्वास इथेच सुटणार होता. तिने निर्माण केलेलं विश्व संभाळायला हवं. पण तू नको काळजी करूस. सदू आणि मी आतापर्यंत छानपैकी संभाळत आलोय. परसात फुलांची छान नर्सरी आहे. बाजूला भाज्यांचा आणि फळांचा मळा पिकलाय."

"हे सर्व तुम्ही नसताना सदूही सांभाळेल पण तुम्हांला येथे कोण सांभाळणार?" सुहास उद्वेगाने म्हणाला.

"तू जे सदू संभाळेल म्हणतोस ते माईचं इथे आल्यापासूनच विश्व होतं रे. . .पण, चालायचंच. आता माईच ठरवेल मी इथे रहायचं की तुझ्याबरोबर यायचं. उद्या पिंडदानानंतर

काकस्पर्श होतो की नाही त्यावर तो निर्णय ठरेल." आप्पांनी सुहासला सांगितले आणि त्यानंतर दोघेही काकस्पर्श आणि माई याबाबत बोलत राहिले.


दहावं आटपून सुहास घरी परतला. आप्पा नेहमीप्रमाणे आराम खुर्चीवर वाट पहात बसले होते. परसात आंघोळ करून केस पुशीत सुहास त्यांच्या बाजूला येऊन बसला.

"सर्व व्यवस्थित पार पडलं ना?" आप्पांनी सुरुवात केली "हो, अगदी विधीवत सर्व झालं. . . आणि तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल." सुहास शांतपणे उत्तरला. आप्पा गंभीर झाले. "म्हणजे माईने पिंडाला स्पर्श केला तर. ठिकाय, मी तुझ्याबरोबर येतोय. तुझी तयारी झाली की सांग. इथले पुढचे सर्व विधी झाले की आपण निघू." आप्पा बोलत-बोलत खुर्चीवरून उठले, जड पावलांनी आत निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना सुहासचा खुललेला चेहरा पुन्हा उतरला. आत वळून तो म्हणाला, "सदू, मी जरा पाय मोकळे करून येतो."


तेराव्याचे विधी आटोपल्यानंतर संध्याकाळी सुहास सामानाची आवराआवर करीत होता.

"तिकिटे कधीची काढतोयस?" आप्पांनी त्याच्याजवळ जाऊन विचारलं.

"बहुतेक दोन दिवसांनंतरची." सुहासने मान खाली ठेवूनच उत्तर दिले.

"तसं असेल तर मी शहरात जाऊन येतो. वर्ष-दोन वर्षांनी माझं तेथे जाणे व्हायचे. आता तुझ्याबरोबर परदेशी गेल्यावर तेथील लोकांना पुन्हा भेटणे होईल की नाही. . ." अप्पा बोलत होते. "आयुष्याची उमेदीची आणि निवृत्तीपर्यंतची सर्व वर्षे तेथेच गेली. एक साधी चाळीतली खोली होती ती. सर्व चाळकरी एखाद्या मोठ्या कुटुंबाप्रमाणे राहत होते. तू येईपर्यंत तेथे एकटाच होतो मी. पण त्यांनी एकटेपणा जाणवू दिला नाही."

"ठिक आहे आप्पा. तुम्ही या जाऊन. मी सर्व तयारी करून ठेवतो. तुम्ही आलात की आपण निघू." सुहास उत्तरला.


पहाटेलाच आप्पा शहरात निघून गेले. सुहास नेहमीप्रमाणे उठला. आंघोळ, न्याहारी आटपून आजुबाजूचा परिसर पाहण्यास निघाला. आप्पा परतेपर्यंत त्याला दुसरे कोणतेच विशेष काम नव्हते. पुढची सर्व तयारी त्यानंतरच करावयाची होती.


दोन दिवसांनंतर आप्पा परत आले. ओसरीवरूनच सदूला पाय धुण्यासाठी पाणी मागितले. सदूने पाणी आणून दिले. अप्पा हातपाय, चेहरा धुवून आत आले. हातपाय पुसून आरामखुर्चीवर डोळे मिटून बसले. बराच वेळ झाला तरी सुहासची चाहूल दिसेना म्हणून त्यांनी सदूला हाक मारली. सदू येताच त्याला सुहासबद्दल विचारले. सदूने एक पत्र अप्पांच्या हातात ठेवले. अप्पा थोडेसे चमकले नंतर हलकेच स्मित करीत त्यांनी ते पत्र वाचायला सुरुवात केली.


आदरणीय आप्पा,

गेली दहा वर्षे मी परदेशी राहतोय. वर्षातून एखादी फेरी गावी होते त्याचवेळी एकमेकांना भेटणं होतं. माझं परदेशातील वास्तव्य आणि काम अजून किती दिवस असेल त्याबद्दल आताच नाही सांगू शकत. तुम्ही, माई आणि मी आपण तिघे आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगलो किंवा जगतोय. एकमेकांबद्दल अतिशय प्रेम असूनही ते कधीही लादण्याचा प्रयत्न केला नाही, उलट प्रत्येकाने घेतलेल्या निर्णयाचा दुसऱ्यांनी आदरच केला. तरुणपणात अर्थार्जनासाठी तुम्ही शहरात राहिलात. पूर्णपणे नवीन जागा असूनही हिमतीने नोकरी मिळवली. गावी असलेल्या आई-वडिलांची चिंता सतत मनात असायची. पण नाईलाज होता. नंतर माईशी तुमचे लग्न झालं. माईला आजीने जबरदस्तीने तुमच्याबरोबर शहरात पाठवलं. पण माई हट्टाने गावी परतली. हे घर, हा गाव तिने आपला मानला.


माझा जन्म याच गावी. शालेय शिक्षण या शाळेत. पुढील शिक्षणासाठी आणि त्यानंतर नोकरीसाठी तुमच्या बरोबर शहरात. आणि आता परदेशात. जेव्हा मी गावी होतो तेव्हा तुम्ही आणि माई एकमेकांपासून खूप दूर होता. पण तुमच्यातील प्रेम, आदर, समंजसपणा अफलातून होता. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. परदेशी जाण्याचा माझा निर्णय तुम्हाला अनपेक्षित होता. पण माईने आणि तुम्ही तो सहज स्वीकारलात. माझ्या वियोगाचे दुःख मनातच दाबून समंजसपणे हसतमुखाने निरोप दिलात. त्याच वेळेला तुम्ही रिटायर्ड होऊन गावी परतलात. माईसाठी तो पराकोटीचा आनंद देणारा क्षण होता पण तीने तो कमालीच्या संयमाने व्यक्त केला.


मी जेव्हा गावी जायचो तेव्हां तुम्ही फुलवलेला निसर्ग पाहून सुखवायचो. पण माईला तुमची खूपच काळजी वाटायची. तुम्ही नसतांना मला बोलूनही दाखवायची. मीही त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार होतो.


तुम्ही नसतांना हा संपूर्ण परिसर, हा गाव फिरून आलो. तुमच्या फुलवलेला निसर्गात, ह्या गावात या वेळेला एक वेगळाच अनुभव आला. जाणवलं की सर्व वातावरणात माईचा श्वास भरून राहिलाय. तिचे हे विश्व तीच्या पश्चात तुम्ही संभाळाल हा विश्वास होता तिला, या विश्वासापोटीच तिने पिंडाला स्पर्श केला आणि संपूर्ण मुक्ती स्वीकारली. तुम्हालाही हे माहित होतं तरीही केवळ माझ्या प्रेमाखातर तुम्ही माझ्याबरोबर यायला तयार झाला होता. मला हे समजायला थोडासा वेळ लागला इतकंच. मी एकटा जात आहे. तुम्ही येथेच राहणार आहात. माझं तिथले काम आटपलं की सर्वांना घेऊन इथंच येणार. स्वत:ला सांभाळा, काळजी घ्या. तुमची आणि . . .माईचीही.

तुमचा,

सुहास.


पत्र वाचून आप्पा मनापासून हसले. खुर्चीवरून उठत सदुला हाक मारली. "सदू आंघोळीचं पाणी काढलं का? आज मळ्यात जायचंय, बरीच काम राहिलीत तिकडे."


Rate this content
Log in