Manisha Awekar

Others

2  

Manisha Awekar

Others

मनाचा कप्पा

मनाचा कप्पा

2 mins
142


भूतकाळ विसरा कारण तो मागे गेलेला असतो. भविष्यकाळाची स्वप्ने पाहू नका कारण तो अनिश्चित असतो. फक्त वर्तमानात जगा कारण तोच आपल्या हातात असतो.


स्टोरीमिरर साठी हा कोट मी टाकली खरी पण माझ्या मनात विविध आवर्तने उठली. आपल्या मनाच्या कप्प्यात खूप काही साठलेलं असतं. आपण भूतकाळ मागे गेलेला म्हणून त्या आठवणी खरं तर मनातून काढायला हव्यात, पण जातात का काढल्या? नाही कारण आपण काही संत महंत नाही आपण सर्वसामान्य माणसे आहोत.


माझी एक मैत्रिण कजरीच्या कॉर्नरला गेल्या दिवाळीला भेटलेली. आता खूप दिवसांनी भेटल्यावर आनंद झालाच पण हिला कुठेतरी मन मोकळं करायचं असल्याने मला समोरच्या हॉटेलमध्ये घेऊन गेली.


"कशी आहेस गं?" असा माझा सहज खुशालीचा प्रश्न. तिला फुल चावीच बसली.


"आता नं मनीषा मी अगदी स्पष्टवक्ती झालीय. कुणाचं काही ऐकून घेत नाही." इतपत ठीक होतं पण बाईससाहेब थेट लग्नानंतरच्या भूतकाळात घुसल्या. सासरी आल्यावर काय काय सहन केलं, अनावश्यक टोमणे, हिणवलेली बोलणी अगदी शब्द न शब्द हिला बरोबर आठवत होता.


"अगं आता जाऊ दे. झालं ते झालं. विसरुन जा सारं..." एवढं मी बोलताच उसळून म्हणाली, "काही सल खूप बोचणारे असतात. कसे विसरणार?" तेवढ्यात वेटरने वॉर्निंग दिली म्हणून माझी भूतकाळ पोथीतून सुटका झाली.


प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही अपमानास्पद अवहेलनेचे क्षण असतात. आपण त्यावेळी घायाळ झालेलो असतो. आपली कुणी दखलही घेतलेली नसते. मला वाटते एकदा तुम्ही साठीच्या वळणावर आलात, की अशी बडबड हास्यास्पद ठरते. आता शांतपणे जगायचे असते. मागच्या भूतकाळातील वाईट आठवणी खरंच उपटून लांब फेकून द्याव्यात. त्याने आपणही आनंदित रहातो व आपल्या बरोबरची व्यक्तीही!!


"मी आता खूप खमकी झालीय. कोणाचेच काही ऐकून घेणार नाही..." ही भविष्यकाळातली आक्रमकता कशासाठी? आता आपण अशा स्टेजला आहोत की पुढच्या क्षणाला काय होणार ते माहित नसते. मग एवढा अहंपणा ठेवू नये. याउलट ती वर्तमानात जगली असती तर आमची भेट सुखद आठवणींनी बहरली असती.


साठीच्या पुढे मनाला थोडा लगाम घालायला शिकले पाहिजे. मनावर विजय मिळवणे अवघड आहे, पण मनात साठलेला अनावश्यक आठवणींचा कचरा आपण काढला, तर आपण लहानपणच्या चांगल्या आठवणीत रमून जाऊ. आपले आपल्यालाच खूप हलके वाटेल, अगदी पिसासारखे!!


फोनवरही हसतखेळत गप्पा मारल्या तर आनंदच होईल.


हे अवघड आहे, हे मलाही मान्य आहे. आपण सर्वसामान्य माणसे आहोत. सुरुवातीला जरा जास्त प्रयत्न करावे लागतील, पण जमेल हळूहळू कारण 'प्रयत्नांती परमेश्वर' हे तर वैश्विक सत्य आहे.!!


Rate this content
Log in