मित्र
मित्र
महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद या शहरात एक मध्यमवर्गीय शिंदे कुटुंब रहायचं. त्या कुटुंबात पती,पत्नी,त्यांची मुलगी आणि एक संभव नावाचा नौकर राहत होता. संभव हा अनाथ होता त्यामुळे उदरनिर्वाहासाठी तो शिंदे कुटुंबाकडे काम करत होता. १७ वर्षीय संभव हा हुशार असल्यामुळे तो काम करत शिक्षणही घेत होता.यासाठी शिंदे कुटुंबही त्याच्या पाठीशी उभं राहिलं.कुटुंबातील दोघेही पती पत्नी शिक्षक असल्यामुळे संभवला त्याचा खुप फायदा झाला.संभव त्या दोघांनाही त्याच्या आई-वडिलांच्या जागी बघायचा.सर्व काही सुरळीत सुरू असताना एक विपरीत घटना घडली आणि सर्व काही उध्वस्त झालं.
एके दिवशी सकाळी संभव हा पारिजातकाचे फुले आणण्यासाठी घराबाहेर पडला,त्याला पारिजातकाचे फुल खुप आवडायचे.त्यामुळे तो खुप वेळ पारिजातकाच्या झाडाखाली बसून रहायचा.त्या दिवशीही तो तिथे खुप वेळ बसून राहिला आणि काही वेळाने घराकडे निघाला.घरी पोहोचताचं त्याने असे काही दृश्य पाहिले जो तो आयुष्यभर विसरू शकला नाही.तो ज्या घरात काम करायचा ते घर आगीत होरपळत होत.गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे त्या घरात स्पोट झाला आणि सर्व काही नष्ट झाले. त्या अपघातात कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाला. नियतीने संभवचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर आणून सोडलं. पुढे काय करावं,कुठे जाव,कसं जगावं हे सर्व प्रश्न घेऊन तो त्या पारिजातकाच्या झाडाखाली जाऊन बसला. रडण्यासाठी त्याच्याकडे कोणाचाही खांदा नव्हता त्यामुळे तो झाडाला कवटाळून रडत होता.पोटात पडलेली आणि आयुष्याला लागलेली आग यात तो जळतं होता.या सगळ्यातून सावरून तो कामाच्या शोधात निघाला.पण खुप प्रयत्न करूनही त्याला काम काही मिळाले नाही.काम नसल्यामुळे शिक्षणही थांबले. भुकेमुळे संभवचे हाल होऊ लागले,काही करता त्याला काम काही मिळतं नव्हत.शेवटी पोटासाठी त्याने एका हॉटेलमधून जेवण चोरलं आणि पकडला गेला .तिथल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.त्या घटनेमुळे संभव पूर्णपणे बावरून गेला.धावतच तो त्या पारिजातकाच्या झाडाकडे गेला आणि त्याला कवटाळून रडू लागला.आता ते झाडच त्याच सर्व काही होत.
शिंदे कुटुंबाच्या निधनानंतर त्याने आयुष्यात खुप काही पाहिले.पण आता मात्र त्याला कोणताही मार्ग दिसत नव्हता. सारखे त्याच्या डोळ्यांपुढे शिंदे कुटुंबाचा चेहरा येत होता. शेवटी त्याने ठरवलं की आता आयुष्यच संपवून घ्याव आणि खुप रडू लागला. इतक्यात त्याच्या गालांवर अलगद फुलांचा वर्षाव झाला. ती फुलं जणू त्याचे अश्रृ पुसत त्याला धीर देत होती.त्या फुलांना पाहुन त्याला एक वेगळीच प्रेरणा मिळाली. तो म्हणाला,"ही फुले जर माझे अश्रू पुसू शकतात, तर मी माझ्या आयुष्याला लागलेले परिस्थितीचे डाग नाही का पुसू शकत?"आणि त्याने ठरवलं की आता हार नाही मानायची.त्या फुलांपासून प्रेरणा घेऊन त्याने त्या पारिजातकाच्या झाडाखाली फुले विकण्याचे काम सुरू केले. हळुहळु सर्व सुरळीत होऊ लागलं.काही वर्षांनी त्याने तिथे फुलांचे दुकान सुरू केले.त्या दुकानाचे नाव त्याने 'मित्र' असे ठेवले.त्याचे असे म्हणणे होते की आज त्याचे आयुष्य जे सुरळीत सुरू आहे ते फक्त त्याच्या मित्रामुळे म्हणजेच त्या पारिजातकाच्या झाडामुळे.तो म्हणाला,"ज्यावेळी माझ्याकडे रडण्यासाठी खांदा नव्हता त्यावेळी त्या झाडाने मला आधार दिला,मित्रासारखे माझे अश्रू पुसले.त्या झाडानेच मला प्रेरणा दिली.शिंदे कुटुंबानंतर ते झाडच माझं कुटुंब आणि सर्वस्व आहे".त्या पारिजातकाच्या झाडाच्या मैत्रीमुळेच संभवने असंभव गोष्ट संभव करून दाखवली.मित्र नेहमी मनुष्य स्वरूपी असावा असं काही नसतं.या वृक्ष स्वरूपी मित्राने संभवला ज्याप्रकारे सावरलं ते अलौकिक होत.संभव आणि त्याच्या वृक्ष रुपी मित्राने ही गोष्ट सिद्ध केली की आपण कोणत्याही परिस्थितीत एकटे नसतो कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यासोबत एक मित्र असतोच.
