मित्र - सुऱ्या...!
मित्र - सुऱ्या...!
सुऱ्या माझा बालपणीचा मित्र.
त्याच पूर्ण नाव सुरेश भीमराव फुटाणे,
रा.हसूरचंपू,ता.गडहिंग्लज
जि.कोल्हापूर.
पूर्वी एका घराची अनेक शकले व्हायची पण सारी एका छताखाली आनंदात असायची. त्याचंही घर तसचं होतं. आत बोळकांड आणि अंधुक प्रकाश पण त्यातही हश्श्याची कारंजी फुटायची, बरं वाटायचं.
मित्र या संकल्पनेत पूर्णपणे फिट्ट बसणारा. त्याची मैत्री एक वेगळं रसायन. त्याचा माझ्यावर विशेष लोभ, त्याची हुशारी मला भावायची. भूगोल हा विषय त्याच्या हाताचा मळ होता. मुळात हुशार तेवढाच हरहुन्नरी. लेझीम, दांडपट्टा, पोताटी चालवणे, पोहणे, क्रिकेट, पळणे, खोखो, लंगडी, गोट्या, भेंडा गोंडा, सुरपारंब्या, हर हर गवळ्या सारे खेळ रंगायचे. थोडक्यात सर्वच मैदानी खेळात तरबेज आणि सर्वातच त्याला रस असायचा. अक्षर आणि वाचन छान.
सातवी स्कॉलरशिपचा निकाल लागला, माझा तालुक्याला पहिला नंबर आला आणि त्याचा दुसरा त्यामुळे आणखीनच दोस्ती बळकट झाली.
आंब्याची आड्या ओढ्या कडेला घालणे, पाटलांच्या झाडातील बम्पर खाणे, पोहणे, आंब्याच्या झाडावर बसून अभ्यास करणे आणि दिवाळी सुट्टीत रात्र रात्र जागून गृहपाठ लिहिणे हे आमचे छंद. दिवस ते खरोखरच सोनेरी होते. मैत्रिणींना वह्या देणे आणि वर्गात धुमाकूळ घालणे म्हणजे मस्त मजेचे दिवस असायचे.
पुढे तो कॉमर्सला गेला, पोस्टात नोकरी धरली, घरची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि कुटुंब सावरून जीवन सफल केले. आजही तो नोकरीत आहे, सुखी आहे. आहे त्यात समाधानाने जीवन कसे जगावे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझा सुऱ्या.
केव्हातरी आठवण आली, अडचण आली की मनोमन त्याच्याशी मी गप्पा मारतो आणि बरेच प्रश्न मी सोडवतो, बरे वाटते. मित्रांच एक वैशिष्ट्य असत ते जवळ असोत अथवा नसोत त्यांच्या स्वभावामुळे नुसत्या विचारांनीसुद्धा साथ मिळते आणि जीवन सुखकर होते. सुऱ्यासारखे मित्र म्हणजे एक अनमोल ठेव. शिदोरीसारखे जन्मभर पुरतात यात शंका नाही...!