मी अन हा पाऊस
मी अन हा पाऊस


माझे लग्न अवघ्या सतराव्या वर्षी झाले.मी लहान माझे पती वैभव पण बावीसच वर्षाचे होते. आमचे लग्न मे मधे झाले. जूनला पाऊस सुरू .आम्ही १२ जून १९८५ ला लोणावळाला निघालो.दुचाकी गाडीवर .गाडी व्हेस्पा नुकतीच नवी घेतलेली.नवे जोडपे मस्त लोणावळ्याला जायला निघाले.
घाटातच आम्हांला पाऊस लागला.तो ही असा की उभाआडवा तिरपा.....
घाट संपल्यावर दोघे जरा आडोशाला थांबलो. खूप पाऊस पडत होता.छत्री होती पण पावसापुढे तिचे काही चालेना.
आम्ही भिजत होतो.तरूण सळसळते रक्त मस्त पावसात भिजण्याचा आनंद घेत होतं.
घाटातील नागमोडी वळणे.हिरवा शालू नेसलेले डोंगर माथे,दरीतील दृश्य तर इतके छान दिसत होते की ढगखाली उतरलेले इंद्रधनुष्याचा देखणा नजरा...आहाहा!!!
पृथ्वीवरील स्वर्गच भासत होता.
हे न्याहळताना आपल्या अंगावरपाऊस कोसळतोय याचेही भान नव्हते.त्यात मी फलटण सारख्या गावात वाढलेली .हा नजारा पाहून मी यात हरवून गेले.माझे पती माझ्याकडे पाहत होते मी नजारा पाहत होते.
अशी आमची आनंदाची ,हर्षाची,मोदाची छोटीशी पावसाळी सहल झाली.
आम्ही मगपुढे गेलोच नाही तिथेच थांबून पाऊस ती दृश्ये नयनी साठवून घेतली .एका ढाब्यावर मस्त गरम गरम भजी,वडापाव,चहा घेतला.
पाऊस कमी होताच परतीच्या प्रवासाला लागलो...
पुण्यात घरी पोहोचताच जावूबाई बोलल्या,"काय हनीमून कपल,पावसात मस्त भिजला न,मजा आली का ग तुला?"
तिनेअसे म्हटल्यावर मी खूप लाजले.आणि आतल्या खोलीत पळून गेले.