मी आणि माझा देव
मी आणि माझा देव
माझ्या कळत्या वयापासून मी देवाला मानत आलोय.....
तो असतो कसा , दिसतो कसा ,पावतो कसा असे कुठलेही प्रश्न न विचारता......
लहानपणी संध्याकाळी ७ वाजले की आजी " शुभंकरोती " म्हणायला बसवायची.मग शुभंकरोती पासून ते अगदी रामरक्षा , मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष , शनीकवच , प्रज्ञाविवर्धन स्तोत्र असा अर्धाएक तासाचा रोजचा कार्यक्रम ठरलेला.
कधी काही चूक केली , मस्ती केली तर घरचे सांगायचे ,"देवबाप्पा सगळं बघत असतो , शहाण्यासारखा वाग नाहीतर बाप्पा शिक्षा करेल"..
मी घाबरून शहाण्यासारखा वागायचो.......
मुंज झाल्यावर काही वर्षे फडके गुरुजींकडे पौरोहित्य शिकलो....
देवे, रुद्र , पुरुषसुक्त ,विष्णूसुक्त यांची शेकडो वेळा पारायण करून झाली.......
गणपतीत अनेक जणांकडे आवर्तन देखील करून आलो........
काकडआरतीला मनसोक्त नाचूनही घेतलंय आणि नवरात्रीत मोठमोठ्याने आरतीही म्हणली आहे आणि मांसाहार खाताना उगाच स्वतःच्या मनाच समाधान म्हणून जानवही काढून ठेवलय......
मिलिटरी स्कूलमधे असताना कपाटात एक देवाचा फोटो असायचा......जमेल तेव्हा, वेळ मिळाला तर नमस्कार करायचो.
पण न चुकता अंघोळ झाल्यावर स्तोत्र म्हणायची सवय काही गेली नाही...
घरात वर्षातून एकदोन वेळा सत्यनारायण होतो , पूजेला अगदी लहानपणापसून यजमान म्हणून माझीच नेमणूक ठरलेली......
महाविद्यालया मध्ये गेल्यावर देवाशी कधी फारसा संबंध आला नाही....
वर्षातून एकदोनदा नाशिकला कुलदैवतेला जाऊन आलो की यावर्षीचं काम पूर्ण झाल एवढीच भावना.......
संबंध आला तो वक्तृत्व स्पर्धा करायला चालू केल्यावर मिळालेल्या विषयांमुळे......
मग देवाची चिकित्सा चालू झाली..........
कर्म हाच देव ह्या वाक्यापासून ते ब्रम्हांडातल्या सर्व क्रिया प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणारी एक अदृश्य शक्ती म्हणजे देव इथपर्यंत मी येऊन पोचलो...
पॉल ब्रन्टन ने लिहिलेल्या " इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया" वाचताना अजून काही पैलू मिळाले ........
अगदी आतापर्यंत देवाने माझं अथवा बाकीच्यांचं अस काय भलं केलय म्हणून मी त्याला पुजायच ? असाही प्रश्न स्वतःला विचारून बघितला मी........
मिळालेलं उत्तर एका वाक्यात सांगू ?
"आपल्या देवाबद्दलच्या कल्पना , विचार , मत, अंदाज जिथे संपतात तिथून पुढे देव नावाची गोष्ट चालू होते." किंबहुना " देव म्हणजे काय " या प्रश्नाच उत्तर "देव म्हणजे देव ' असच देईन मी तरी....
नाही नाही.......... मी प्रश्नापासून पळून गेलेलो नाहीये किंवा काहीतरी थातूमातुर उत्तर देऊन बोळवण करतोय अस ही नाही.पण मला देव जसा कळला , जाणवला तसा मी शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय ...........
दगडातल्या मूर्तीला मी केवळ देवाचं प्रतिक मानून नमस्कार करतो.......
पूजा आणि स्तोत्रे केवळ सवयीची म्हणून करतो.....
सगुण साकार कि निर्गुण निराकार या प्रश्नाचा मला काहीच फरक नाही...
माझी भक्ती माझ्यापुरती मर्यादित आहे.
मी इतरांना तुम्ही देव माना किंवा मानु नका हेही सांगायला जात नाही......
पण आजही रस्त्यावरून चालताना एखाद्या मंदिरासमोर माझे हात कोणीही न सांगता आपसूक नमस्कारासाठी जोडले जातात , मान नतमस्तक होते .
आणि देवाला माझी तेवढीशी भक्तीही पुरेशी होते .......!!