महत्त्वाची निवड
महत्त्वाची निवड


मुलींनी जास्त शिकून काय करायचंय? शेवटी आयुष्यात चूल आणि मुलंच ना? असे शेरे मला ऐकायला मिळायचे पण मी हट्टाने माझे बी.ए. शिक्षण घेतले. शेवटच्या वर्षाला असताना लग्न झाले आणि दुसऱ्या वर्षी मुलगी ही झाली. आता सगळ्यांनी मारलेले शेरे खरे होतात असेच वाटू लागले. मुलीच्या पहिल्या वाढदिवसानंतर माझी कॉलेज मैत्रीण मला भेटायला आली होती. सहज बोलता बोलता विषय निघाला आणि ती बी.एड. करते हे समजलं. तिने मला ही एडमिशन घ्यायला सांगितले. कॉलेज सुरु होऊन दिड महिना झाला होता. एडमिशन मिळणे कठीणच होते आणि मुलीचं कसं होईल याची चिंता? रात्र भर विचार करत राहिले आणि सकाळी महत्वाचा निर्णय घेतला. बी.एड. करायचंच आणि शिक्षिका व्हायचं. मला नशिबाने ही साथ दिली. माझी मुंबई विद्यापिठाची बी.ए. ची डिग्री होती म्हणून "गांधी शिक्षण भवन" च्या प्रिन्सिपल मॅडमनी मला कॉलेज लगेच जॉईन करायला सांगितले.
त्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या डिग्रीला खूपच भाव होता. हे मला नंतर कळलं. माझ्या ह्या निर्णयाला पाठिंबा देऊन माझ्या चुलत सासू सासऱ्यांनी, चुलत दीर नणंदांनी माझ्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी घेतल्याने मी बी.एड. पूर्ण केले. बी.एड चा निकाल लागताक्षणीच मला शाळेत पार्ट टाईम नोकरी ही मिळाली. खरंच त्यावेळी घेतलेला निर्णय खरोखरंच श्रेष्ठ ठरला. माझी इंग्रजी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत बढती झाली. माझ्या दोन्ही मुली ही माझ्याच शाळेत शिकल्या. त्या ही खूप हुशार निघाल्या. कसल्याही शिकवणी किंवा क्लासेस शिवाय मोठी मुलगी दहावीला अख्या "के वॉर्ड" मध्ये पहिली आली. तिने माझे आणि माझ्या शाळेचे नाव उज्ज्वल केले.
शिक्षकी पेशा हा अत्यंत मानाचा असे मी मानते. शिक्षकाच्या हातून देशाचे नागरिक घडवले जातात. आपली शिकवण आणि संस्कार याचा आपल्या विद्यार्थांवर प्रभाव पडतो. आज जगभर मोठ मोठ्या हुद्द्यावर असलेले माझे विद्यार्थी मला आठवतात आणि त्यांना ही मी आठवते हीच माझ्यासाठी अलौकिक संपत्ती आहे. सेवा निवृत होऊन सुद्धा आजही मी शिक्षकी पेशात आहे. सतत विद्यार्थ्यांन बरोबर राहिल्याने मला ही मी विद्यार्थीच असल्यासारखे वाटते व मी अजूनही शिकत आहे. माझ्या आयुष्यात मला सुख समाधान लाभलं ते मी घेतलेल्या त्या माझ्या महत्वपूर्ण निर्णयामुळेच.