महापूर
महापूर


पूर्णा नदीला महापूर आला आणि रामपुरी पुराच्या पाण्यात वाहून गेली. पुराने सर्व काही वाहून गेले. होत्याचे नव्हते झाले. पुतळाबाई कशीबशी स्वतःला सावरत या ओसरलेल्या पाण्याकडे ,गाळ आणि चिखलाकडे बघत डोळे पुसत होती. तिचा बापू नावाचा सोळा वर्षाचा करता सवरता लेक पुरात बेपत्ता झाला होता. आज पूर्ण एक आठवडा लोटला होता. मागच्या पुनवेला पूर आला आणि सगळे गिळून गडप झाला.
पुतळ्याने कसेबसे स्वतःला सावरले आणि कधीतरी बापू परत येईल या आशेवर मोडक्या संसाराला कसेबसे उभे करायचा प्रयत्न करू लागली. हळूहळू एकेक वस्तू जमवू लागली. पाहता पाहता एक महिना लोटला. पुतळा आता जरा सावरली होती. एका संध्याकाळी दिवेलागणी झाल्यावर हातात एक भाकरी आणि चटणी घेऊन भूक भागवत होती. तेवढ्यात अंगणात कुणीतरी आल्याची चाहूल तिला लागली. हातातली भाकर तशीच हातात घेऊन पुतळा बाहेर आली.पाहते तर दारात एक नऊ वर्षाची मुलगी उभी होती.
मुलीचे घारे डोळे रडून रडून पार आटून गेले होते ,केस विस्कटलेले होते ,अंगावरच्या झग्याचा चिखल वाळला होता.बऱ्याच दिवसापासून पोटात अन्नाचा कण न गेल्यामुळे चेहरा निस्तेज दिसत होता. तिला भूक लागली होती हे तिच्या चेहऱ्यावरून पुतळाला स्पष्ट जाणवले. तिने त्या मुलीला घरात घेतले. मायेने तिच्या केसांवरून हात फिरवला अन् भाकरी खायला दिली. पाणी पिल्यावर मुलीला जरा धीर आला. उद्या सकाळी उठल्यावर बाकीची विचारपूस करू असे ठरवून पुतळाने तिला झोपायला अंथरूण घालून दिले. ती मुलगीही कसला विचार न करता तिथेच झोपली.
सकाळ होताच मुली समोर प्रश्न उभा राहिला की आता कुठे जायचे. पुतळाला तिची तगमग समजली आणि पुतळाने तिला थांबवून घेतले. सर्वात आधी तिला स्वच्छ अंघोळ घातली, नेसायला साडीचा धुडका दिला, केस विंचरून दिले .आता ती मुलगीही सुंदर दिसू लागली. पुतळाने तिचा झगा धुवून टाकला आणि तिच्यासाठी दुसरा झगा शोधायला गावात फिरू लागली.खुप फिरल्यावर तिला एक झगा मिळालाच. घरी परतल्यावर नवा झगा पाहून मुलगी खुश झाली .तिचा आनंद पाहून पुतळाला हायसे वाटले .पुतळाने तिला काही प्रश्न विचारले .कुटुंबाबद्दल माहिती विचारताच मुलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले .तिने रडत रडतच तिचे नाव 'पुनम' असल्याचे सांगितले .पुरामध्ये आई वडील हरवल्याचे सांगितले. पुतळ्याला तिची दया आली .पुतळाने तिला आपल्या सोबतच राहाण्यास सांगितले. जणू त्या दोघी एकमेकीसाठीच राहिल्या असे वाटत होते.
पुतळाला जगण्याचे कारण सापडले. पूनम साठी तिने कंबर कसली आणि कामाला लागली .एकेक करून सर्व गरजेच्या गोष्टी जमविल्या आणि सुरू झाला एका आईचा आपल्या लेकीसाठी प्रवास....... अगदी नव्या उमेदीने.
हळूहळू रामपुरी देखील पुन्हा पहिल्यासारखी उभी राहिली. लोकांनी आता कामाला सुरुवात केली होती .पुतळा पूनमची आई झाली आणि पुनम आईची लाडकी लेक. मोठ्या हौशीने पुतळाने पुनमच
े नाव शाळेत दाखल केले. पूनमचे शिक्षण सुरू झाले पण पुतळ्याच्या मनात एक वेगळेच स्वप्न आकार घेत होते. दर पुनवेला पुतळा पूनमला घेऊन पूर्णा नदीच्या काठावर जायची एकटक पाण्याकडे बघायची आणि काहीही न बोलता परत यायची.
गाव आता पूर्णपणे पूराला विसरला होता. जनजीवन सुरळीत सुरू होते बरीच वर्षे निघून गेली आणि एक आनंदाची बातमी ऐकून पुतळा नाचू लागली. बातमीही तशीच होती पुनम देशभरात इंजिनीयर च्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाली होती . दोघींच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. पुतळाने सारा गावभर पेढे वाटले .आज तिचे स्वप्न पूर्ण झाले होते. आता ते स्वप्न सत्याचे रूप घेणार होते.
एक पुरग्रस्त अनाथ मुलगी आज इंजिनीअर झाली ही बातमी सगळ्या वर्तमानपत्रात झळकू लागली . मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुनमचा सत्कार झाला. पूनमला सरकारी खात्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पुढे काय करायचे हे पूनमने आधीच मनाशी पक्के ठरवले होते .आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि कार्यवाही करून पूनमने रामपुरी गावासाठी, पूर्णानदी साठी धरणाचा प्रस्ताव मंजूर करून आणला.
सगळा गाव पूनमचे आभार मानू लागला कारण धरण पूर्ण झाल्यावर पुराची भीती राहणार नव्हती तब्बल अठरा वर्षानंतर पुनवेच्या दिवशी धरणाचे भूमिपूजन झाले पुतळाच्या हाताने नारळ फोडून आणि पहिली कुदळ मारून कार्याचा शुभारंभ झाला. गावकऱ्यांनाही रोजगार मिळाला. पुनम आणि पुतळा जातीने कामावर देखरेख ठेवायच्या. सारा गाव एकजुटीने घाम गाळू लागला पाहता पाहता दोन वर्षाच्या आत धरण पूर्ण तयार झाले.
धरणाच्या उद्घाटनासाठी पूनमने पुनवेचा दिवस निश्चित केला उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, मंत्री ,अनेक मान्यवर रामपूरीत दाखल झाले. मान्यवरांनी धरणाचे उद्घाटन केले पण पूनमची जिद्द आणि इच्छा पाहून धरणासाठी तिनेच नाव सुचवावे असे सांगितले. नाव सांगण्यासाठी पुनम जेव्हा मंचावर उभी राहिली तेव्हा एका क्षणातच तिच्या डोळ्यासमोरून तिचा भूतकाळ भरकन निघून गेला आणि तिच्या तोंडातून शब्द निघाले 'पुतळाई'. नाव ऐकून सर्व उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला .पूनमने आपली कहाणी सर्वांनाच ऐकवली. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी जमा झाले. बायाबापड्या तर डोळ्याला पदर लावत होत्या. खूप वर्षांनी पूनमने आपल्या आईच्या पुतळाच्या सुरकुतलेल्या डोळ्यांत समाधान पाहिले. आज पुतळाच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रूंचा पूर दाटला पण हे अश्रू आनंदाचे होते- गावकऱ्यांच्या हितासाठी जपलेले. इतके दिवस अडवलेल्या आसवांना पुतळ्याने मोकळी वाट करून दिली. हे सर्व पुनम बघतच होती. तिने मनोमन आपल्या आई नसलेल्या आईचे आभार मानले .तिच्या आधाराशिवाय सारे काही अशक्यच होते.
एका शांत सायंकाळी रक्ताचं नातं नसलेल्या या दोघी मायलेकी हातात हात घालून धरणाच्या कठड्यावर उभ्या होत्या, एकटक नदीच्या पाण्याकडे बघत होत्या --अगदी नि:शब्द.