महागुरु कोरोना
महागुरु कोरोना
आटपाट नगर होतं.महानगरच म्हणा ना!!राज्याची राजधानी!!अगदी मोठी , भव्य- दिव्य. ते राज्य आखिल भारतीय बोलीभाषांचं!! लोक आणि राजधानी सर्वसमावेशक. लोक गुण्यागोविंदानं रहात होते. सगळं कसं छान चाललं होतं.
सगळे सुखात रहात होते. अचानक राज्याला दृष्ट लागली . कोरोना ह्या जीवघेण्या रोगाची सावली पडली अन् ह्या अक्राळविक्राळ साथीनं कमी होण्याऐवजी आधी बेरीज आणि नंतर गुणाकार करायला सुरुवात केली.
२०२० मधे आलेल्या कोरोनाने निसर्ग मानवापेक्षा श्रेष्ठ आहे हे तर दाखवून दिले आहेच पण ह्या महागुरु कोरोनाने अहंकारी माणसाला क्षणोक्षणी धडे शिकवले आहेत..त्याच महागुरु कोरोनाचा आढावा आपण ह्या लेखात घेणार आहोत.
कोरोनाचे इतर देशांतील विराट स्वरुप बघून , आदरणीय पंतप्रधानांनी 100 संख्या असतानाच 21 दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर केले.घराच्या बाहेर लक्ष्मणरेषा आखावी आणि कोणीही घराबाहेर न पडण्याचे कडक आदेश दिले.
आता कोरोना महागुरुने काय काय शिकवले ते आपण आपल्या घरापासूनच पाहू.
लॉकडाऊनमधे सहकार्याची फार मोठी शिकवण घरच्या लोकांना मिळाली. कामाला येणा-या बायका बंद झाल्याने , सर्व कामे घरातच करावी लागली.सर्वजण घरातच असल्याने , गृहिणीच्या मदतीला सर्वजण स्वेच्छेने धावले. सर्वांनी मदत केल्यामुळे , तिचा जीव जाणल्यामुळे , तिला पण बरे वाटले. सर्वांना घरी असल्यामुळे , सारखी भूक लागल्याने , फर्माईशी येऊ लागल्या. घरच्या बाईने सर्वांच्या सहकार्याने , आनंदाने केल्याने , घरात खेळकर वातावरण राहिले. आता सर्वजण घरात असल्याने , सर्वांना एकमेकांचा सहवास मिळाला. गप्पागोष्टी , चेष्टामस्करी होऊ लागल्या.घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी गप्पा मारल्याने , त्यांनाही छान वाटले. माणसांत आल्यासारखे वाटले. कँरम , पत्ते , बुद्धीबळ असे बैठे खेळ खेळले जाऊ लागले .त्याचा आनंद घरातील मोठ्या माणसांनाही घेता आला. पूर्वी त्यांना जो एकटेपणा वाटायचा तो नाहीसा झाला.
लॉकडाऊन अचानक जाहीर झाल्याने , घरात जे आहे , त्यात भागवून घ्यायची गृहिणींची मानसिकता तयार झाली.
नूडल्स , बर्गर , डोनटस ऐवजी फळे, हिरव्या पालेभाज्या , उसळीही सर्वजण गोड मानून घेऊ लागले . स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागल्या. कोणीही बाहेरुन आल्यावर, लगेचच आघोळीला जाऊ लागले . स्वयंपाकाला लागण्यापूर्वी , जेवायला बसण्यापूर्वी , काहीही खाण्यापूर्वी , एवढेच काय भांडी झाल्यावर , केर झाल्यावर , तासातासाला प्रत्येक जण जंतूनाशकांनी हात धूवू लागला . बाहेर जाताना सर्वजण मास्क वापरु लागले , त्यामुळे कोविडच काय , इतर रोगांचाही संसर्ग होणे थांबले. सोशल डिस्टन्सिंगमुळे ठराविक अंतर ठेवून बोलल्याने , संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जवळजवळ नष्ट झाले.
लॉकडाऊनमधे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांची संख्या भरपूर आहे. लोकांनी, समाजसेवी संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी दोन वेळा जेवण व चहा देण्याची माणूसकी दाखवली. त्यांच्या राज्यात जाईपर्यंत कोणालाही उपाशी ठेवले नाही. ह्यात दातृत्व आणि माणूसकीही दिसून येते.
शाळा बंद असल्यामुळे , मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अॉनलाईन शिक्षणपद्धती सुरु केली. पहिली ते बारावीच्या मुलांसाठी टिलीमिली सारखे उपयुक्त कार्यक्रम टि व्ही वर सुरु केले.
खाजगी शिकवण्याही अॉनलाईन पद्धतीने सुरु झाल्या .
कोविडवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स नर्सेसना अहोरात्र सेवा करावी लागली. पुढच्या शिफ्टच्या व्यक्तीला वेळ झाला किंवा कोणी गंभीर रुग्ण असेल तर, घड्याळ न बघता वेळेची पर्वा न करता सततच कार्यरत रहावे लागले . त्यांचे हे प्रचंड योगदान बघून, त्यांच्या कार्याची दखल आदरणीय पंतप्रधानांनी घेतली. त्यांची फोनवरुन वैयक्तिक चौकशी करुन , प्रोत्साहन दिले. चांगले काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन धन्यवादही दिले.
पोलिसांनी लोकांना घराबाहेर पडू न देण्यासाठी अहोरात्र काम केले. तरीही न ऐकणारे महाभाग असतातच. त्यांना योग्य शब्दांत समज दिली. जे सामाजिक कार्यकर्ते अन्नदानाचे काम करत होते , तिथे पोलीसांनी मदत केली. गरीबांना माणूसकीच्या नात्याने अन्न दिले. सफाई कामगारांनी वेळेचे महत्त्व ओळखून जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रोग वाढण्यास अटकाव झाला.
जिथे ज्येष्ठ नागरिक दोघेच रहायचे , मुले परदेशात किंवा परगावी , अशा ठिकाणी एकाला कोणाला कोरोना झाला तर , शेजा-यांनी , बिल्डिंगमधल्या तरुण वर्गाने घरच्यासारखी मदत केली. त्यांना अँडमिट करणे , तब्बेतीची देखरेख करणे , जे घरी आहे , त्याचे मनःस्वास्थ्य चांगले ठेवणे ह्या गोष्टी लोकांनी उस्फूर्तपणे , माणूसकीने आणि कर्तव्यबुद्धीने केल्या. सहकार्याचे , माणूसकीचे , कर्तव्यबुद्धीचे फार मोठे मोल ह्या कोविडच्या काळात माणसाला समजले आहे. ह्या काळात संकटामुळे का होईना , माणसे मनाने जवळ आली. ज्येष्ठ नागरिकांना वेळ पडली तर,आपली काळजी घेणारे कोणीतरी आहे असा दिलासा मिळाला. मुले, नातवंडे गप्पा मारु लागल्याने ज्येष्ठ नागरिक समाधानी दिसू लागले.
माणूस निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे असा माणसाला गर्व होता , पण ह्या छोट्याशा विषाणूने आख्खे विश्व हादरवले.मानवाचे आस्तित्व टिकविणे हे पण त्याच्या हातात राहिले नाही. ह्या रोगावर लस शोधण्याचे काम शास्त्रज्ञ झटून करत आहेत , पण अजूनही लस उपलब्ध होत नाहीये. लस मिळायला जून 2021 उजाडेल असा अंदाज आहे. निसर्गापुढे माणूस किती क्षुल्लक आहे हेही कोविडच्या तडाख्यामुळे मानवाला समजले आहे.
आपण साकल्याने विचार केला तर , ह्या कोविडने निसर्ग माणसापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवून दिले आहे. निसर्गाने मानवाला नमविले आहे. ह्या रोगामुळे दुर्दैवाने जी जिवितहानी झाली , ती कधीही भरुन येणारी नाही , ह्याचे दुःख मला लिहितानाही होत आहे , पण निसर्गाने मानवाला त्याची जागा दाखवून दिली आहे.
कोविड महागुरुनी सहकार्य , स्वच्छता , आहे त्यात भागवून समाधानाने रहाण्याची वृत्ती , भुकेल्याला जेवू घालायची माणूसकी , दुस-यासाठी आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर्स , नर्सेस ह्यांनी मानवतेच्या भूमिकेतून केलेली सेवा , पोलिस आणि सफाईकामगारांनी केलेले प्रचंड कष्ट ह्या सर्व कोविडसारख्या महागुरुनी संकटात शिकवलेल्या चांगुलपणाच्या निदर्शक आहेत.
रोगाची साथ येते अन् जाते , पण कोविड महागुरुकडून मिळालेले चांगुलपणाचे धडे पिढ्यानपिढ्या स्मरणात रहातील यात शंकाच नाही.
