मेडिकल इमर्जन्सी
मेडिकल इमर्जन्सी


दिवसभराच्या बोर्ड मीटिंगमधे झालेला वाद-विवाद आठवत, प्रचंड तणावातच संग्राम मुंबई विमानतळाच्या डिपार्चरला संध्याकाळी सहा वाजता कारमधून उतरला. स्वतःच्या विचारांमध्ये असतानाच त्याने नेहमीच्या सवयीने सिक्युरिटीला तिकीट दाखवून आत प्रवेश केला. बोर्डिंग पास घेत असतानाच त्याला हैदराबादचे विमान एक तास उशिरा असल्याचे समजले... “आता घरी पोहचायला अकरा वाजणार”.... संग्राम स्वतःशीच म्हणाला. सिक्युरिटीचे सर्व सोपस्कार करून संग्रामने लाउंजमध्ये जाण्याचा विचार केला. मनाचा ताण थोडा हलका व्हावा म्हणून जाता जाता तो स्मोकिंग झोन मध्ये थांबला. सिगरेटचे झुरके मारत संग्राम दिवसभरातल्या घटना आठवू लागला. थर्ड कॉरटर रिझल्ट अपेक्षित न आल्याने सर्व बोर्डमेंबर्सनि त्याला चांगलेच फैलावर घेतले होते. टारगेटपेक्षा 40% डाऊन….. हे कोणीच मान्य करायला तयार नव्हते. एकंदर सध्याची मार्केट सिच्युएशन पाहता संग्रामने जो काही बिझनेस केला होता तोच मोठ्या मुष्किलीने.... बरं, कॉम्पिटिशनचि परिस्थितीही आपल्या कंपनी पेक्षा फार काही चांगली नव्हती.. किंबहुना अधिकच वाईट होती. पण ऐकणार कोण.. आणि.... एका क्षणी संग्रामचा तोल सुटला.. तो वरच्या आवाजात बोर्ड मेंबरशि बोलू लागला... परिणाम व्हायचा तोच झाला.. “पुढील एका महिन्यात रिझल्ट दाखव, अन्यथा आम्हाला दुसरा विचार करावा लागेल”, एमडीचे हे वाक्य ऐकताच संग्रामला तिथेच दरदरून घाम फुटला...
सिगरेट संपताच संग्राम लाउंजमध्येआला. काउंटरवर जाऊन त्याने ड्रिंक्स ऑर्डर केले. तसाही विमानाला उशीर असल्याने दोन-चार पेग घेतले म्हणजे बरे वाटेल.. असा विचार करून त्याने तोंडाला ग्लास लावला.. पण एमडीचे ते शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होते... “दुसरा विचार करावा लागेल”....
अशी परिस्थिती उद्भवली तर... आपले, सुरुचीचे, मुलांचे कसं होणार, या विचाराने तो पुन्हा हादरला. सध्याच्या परिस्थितीत एवढ्या पगाराची नोकरी कुठे मिळणार.. अशा वेगवेगळ्या विचारातच त्याचे चार पेग कधी झाले त्याला समजलेच नाही... अचानक त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले. तो धावतच बोर्डिंग गेटवर गेला आणि विमानात बसला. थोड्याच वेळात सर्व प्रवासी विमानात स्थिरस्थावर झाले. शेजारी बसलेल्या सहप्रवासी सुधीर बरोबर थोडीशी औपचारिक ओळख करून दिवसभराच्या टेन्शनने संग्रामने डोळे मिटून डोके मागे टेकले. एअर होस्टेसने नेहमीच्या अदबीने सर्वांचे स्वागत करून, सूचना देऊन तीही स्थानापन्न झाली. कॅप्टन पद्मजाने उशीर झाल्याबद्दल प्रवाशांची दिलगिरी मागितली व विमान रनवेवर नेऊ लागली. विमान मुख्यरनवेवर येण्यास जेमतेम शंभर मीटर असतानाच, सुधीर हात वर करुन जोरात ओरडला.. मेडिकल इमर्जन्सी.. ..संग्राम अतिशय अस्वस्थ होऊन छाती चोळत होता आणि अचानक त्याने सुधीरच्या खांद्यावर मान टाकली. एअर होस्टेसला क्षणात समजले की काहीतरी गंभीर आहे... तिने लगेचच कॅप्टनला कळवले व कॅप्टनने विमान उजवीकडे मुख्य रनवेवर नेण्याऐवजी डावीकडे पुन्हा एरोब्रिजकडे वळवले. विमानात कोणी डॉक्टर आहे का?.. उद्घोषणा झाली.. नशिबाने एक डॉक्टर लगेच पुढे आला व त्याने संग्रामला पंपिंग करण्यास सुरुवात केली. पाच मिनीटांच्या प्रयत्नानंतर संग्राम रिवाईव झाला. तोपर्यंत विमान एरोब्रिजजवळ आले.. डॉक्टर, ॲम्बुलन्स, ग्राउंड स्टाफ, ड्युटी मॅनेजर या सर्वांची धावाधाव सुरू झाली व अर्ध्या तासानंतर संग्रामला स्ट्रेचरवरून ॲम्बुलन्समध्ये हलवण्यात आले.. रिफ्युअलींग... पॅसेंजर, लगेज आयडेंटिफिकेशन, या सर्व सोपस्कारातून सरतेशेवटी रात्री साडे-दहा वाजता विमानाने हैदराबाद कडे उड्डाण केले.
“रात्री हॉटेलवर पोचण्यास आता एक वाजणार”.. सुधीर मनाशीच पुटपुटला.. सुधीर एका प्रख्यात फार्मा कंपनीचा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होता.. थर्ड कॉरटर रिझल्ट एकदम चांगले आल्याने सुधीर एकंदर खुशीत होता. उद्याच्या मॅनेजमेंट मीटिंगमध्ये त्याचे नक्की कौतुक होणार हे त्याला माहिती होते. हैदराबादच्या त्याच्या कलीगबरोबर आज रात्री मस्त पार्टी करायची, असा प्लान बनवून त्याने साडेसातची फ्लाईट घेतली होती, की जेणेकरून नऊ वाजेपर्यंत हॉटेलवर पोहोचू आणि दोन तास मस्त एन्जॉय करू... पण संग्रामने त्याचा पुर्ण प्लान बिघडवला होता.
अभिजीत, हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर.. संग्रामचा दुसरा सहप्रवासी..”करंट इंडियन इकॉनोमी इन गलोबल परस्पेक्टिव” यावरची दोन दिवसाची कॉन्फरन्स अटेंड करून अभिजीत हैदराबादला निघाला होता. कॉन्फरन्समधे त्याने मांडलेला “सोसिओ-इकॉनोमिक इम्पॅक्ट इन रुरल इंडिया” हा पेपर सर्वांनाच आवडला होता. बोर्डिंग गेटवर बसून विमानाची वाट बघत असताना अभिजित व सुधीर यांची ओळख झाल्यामुळे ते दोघे याच विषयावर गप्पा मारत होते. भारताच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर अभिजीतचे विचार ऐकून संग्राम अस्वस्थ होत होता. त्या दोघांच्या अतिशय कोरड्या संभाषणाने व शाब्दिक बुडबुडयामुळे हे दोघेही ग्राउंड रियालिटी पासून खूप दूर असल्याचे संग्रामला वाटत होते.. या सर्वांमध्ये त्याचे फ्रस्ट्रेशन अधिकच वाढत होते....दिवसभराच्या घटना व त्यानंतरचे हे डोळे मिटून ऐकत असलेले संभाषण.. यामुळे संग्राम आतल्याआत खूप अस्वस्थ झाला ... त्यातच त्याला दरदरून घाम फुटला आणि तो छाती चोळू लागला..
स्वप्ना, सध्याच्या हिंदी सिरियलमध्ये वरचेवर दिसणारी हीरोइन.. आपल्या क्रू-मेंबर बरोबर रामोजी फिल्मसिटी मध्ये चाणक्य या नव्या सिरीयलच्या शूटिंगसाठी निघाली होती. संग्रामच्या मागच्याच सीटवर स्वप्ना व गोपाळ रेड्डी, तिच्या नव्या सिरीयलचा लेखक-डायरेक्टर बसले होते. गोपाळ रेड्डी तिला चाणक्याची अर्थनीती व राजकारण यावर त्याचे विचार ऐकवत होता. गप्पांच्या ओघात स्वप्नाही त्याला विचारत होती, की सध्याच्या परिस्थितीत चाणक्य असता तर त्याने भारताच्या आर्थिक व राजकीय परिस्थितीवर काय उपाय योजले असते.. घाम फुटायच्या आधी हे सर्व संग्रामच्या कानावर आदळत होते...
श्रीनिवास रेड्डी, हैदराबाद जवळील एका छोट्या गावातला व्यापारी. पहिलाच विमान प्रवास.. 25 वर्षानंतर मुंबईत झालेल्या कॉलेज री-युनियन वरून हैदराबादला परतत होता. नऊ वाजता हैदराबादला उतरल्यावर, रात्री बाराची बस पकडून गावी येतो असं तो लक्ष्मीला, त्याच्या बायकोला, फोनवर सांगत होता. संग्रामची मेडिकल इमर्जन्सी अनाउन्समेंट ऐकूनही श्रीनिवास रेड्डीला काहीच कळले नाही कि काय झालंय. शेजाऱ्याकडून त्याला समजताच श्रीनिवास समोर भला मोठा प्रश्न पडला.. आता घरी कसे पोहोचायचे…
आज रेवतीचा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस. सतीशने मुंबई एअरपोर्टवरच तिच्यासाठी एक छानसा ड्रेस घेतला होता. रात्री नऊ वाजता आपण डायरेक्ट ताज बंजारा ला भेटू म्हणून त्याने तिला कसेबसे राजी केले होते. मुंबईत दोन दिवस चाललेल्या “फ्युचर ऑफ डिजिटल इकॉनोमी” या कॉन्फरन्सला त्याला बँकेने जायला सांगितले होतं. त्याने टाळण्याचा खुप प्रयत्न करुनही, “आपण लवकरच एक नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च करत आहोत, त्यामुळे तुला गेलंच पाहिजे.. व्हाईस प्रेसिडेंटने सतीशला ठणकावून सांगितले”...बँकेत लागून सहाच महिने झाले होते, त्यामुळे नाही म्हणणेही शक्य नव्हते.. शेवटी महत्प्रयासाने रेवतीला मनवून तो कॉन्फरन्सला गेला होता. संग्रामच्या मेडिकल इमर्जन्सीने आता आपले काही खरे नाही.....या विचाराने त्याला टेन्शन येऊ लागले...आता रेवतीची कशी समजूत काढायची याचा विचार करु लागला..
डॉक्टर आराध्या, एअरपोर्टवरील डॉक्टर.. “चला, 07:45 झाले. पटापटा आवरून आठ वाजता निघू, असे म्हणत तिने घरी जायची तयारी सुरू केली. छोट्या अन्वयला सांभाळणार्या मावशींना साडेआठला घरी जायचं असतं. अजयला आज क्लायंट मीटिंग असल्यामुळे घरी यायला रात्रीचे दहा वाजून जातील असं म्हणाला होता. नेक्स्ट डॉक्टर पावणेआठ झाले तरी अजून आली नाही म्हणून आराध्याने तिला फोन केला.. ट्रॅफिकमुळे पाच-दहा मिनिटे उशीर होईल, आठ पाच पर्यंत येते म्हणाली. तिचा फोन ठेवते न ठेवते तोच दुसरा फोन वाजला... “मेडिकल इमर्जन्सी इन हैदराबाद फ्लाईट... प्लीज रश”.. डॉक्टर आराध्या मटकन खुर्चीत बसली.. आणि तिच्यासमोर प्रश्नांची मालिकाच सुरू झाली….पण पुढच्याच क्षणी तिला आपल्या कर्तव्याची जाणीव होऊन आवश्यकती औषधे घेऊन आराध्या विमानाकडे धावू लागली..
“फर्स्ट ऑफिसर कॅप्टन पद्मजा अगेन, वुइ हाव रिसिव्हड क्लिअरन्स फ्रॉम ट्रॅफिक कंट्रोलर..अँड नाऊ रेडी टू टेक ऑफ’.. कॅप्टन पद्मजाने पुन्हा अनाउन्समेंट केली आणि एवढ्यावरच न थांबता प्रसंगावधान दाखवल्याबद्दल विमानातील डॉक्टर, एअर होस्टेस, ग्राउंड स्टाफ व प्रवाशांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कौतुकही केले.. विमानात टाळ्यांचा कडकडाट झाला... त्यातच विमानाने पुन्हा एकदा एरोब्रिज सोडला व हैदराबादकडे जाण्यास निघाले..
संग्रामच्या मेडिकल इमर्जन्सीने काही क्षणांमध्ये कितीतरी जणांपुढे कैक प्रश्न उभे केले....तरीसुद्धा, या कसोटीच्या क्षणी, सर्व घडामोडीत, काही जणांना कर्तव्यपूर्तीचे तर काही जणांना यात आपल्या संयमाचा खारीचा वाटा असल्याचे थोडेसे मानसिक समाधान नक्कीच मिळाले असेल...