sunil sawant

Others

4.6  

sunil sawant

Others

मैत्रेय

मैत्रेय

7 mins
666


ही गोष्ट आहे १९९० या सालची.


"काय संज्या, मग आज कुठला नंबर," विजूने सर्वांच्या बहुचर्चित विषयाला तोंड फोडलं आणि चर्चेला सुरूवात झाली.

"आज ७ नंबरची टिप मिळालीय" संजयने आपलं मत जाहीर केलं.

"भिडू अपुन तो ६ नंबर ऐकून हाय." मनोजने आपली माहिती पुरवली. बहुतेक त्याने काल केबलवर जॅकीचा पिक्चर पाहिला असणार.

"मी पण दोघा-तिघांकडून ६ आणि ७ च ऐकून आहे." विजूने आपली भर टाकली.

"कल वो मंगेशको आपून ४ नंबर बोला था और भिडुको लग गयी लॉटरी." मनोज कॉलर फुगवून सांगत होता.

"मग तू का नाही काढली काल, ४ नंबरची ? " विजूची चिडकी शंका.

"जेब खाली हो गया ना भिडू उसके पयले " मनोजचं उत्तर.

"चल उगाच फेकू नकोस " विजयची चीडचीड.

"मला एक सांगा अगोदर, कोणीतरी लॉटरी काढलीय का? का उगाचंच नंबरची चर्चा करायची?" सुहासने शंका काढली. यावर सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. कोणीतरी लॉटरी घेतलीय का याचा अंदाज घेऊ लागले.

"अरे मी काल काढली होती. २ नंबरची. पक्की खबर होती. पण ४ नंबर फुटला आणि गेले पाच रुपये फुकट."

विजयला सांगताना उमाळा फुटला आणि त्याच्या चीडचीडपणाचं कारणही कळंलं. सगळ्यांनाच हसू फुटलं होतं, पण उगाच त्याच्यासमोर हसलो तर तो अजूनच चिडेल म्हणून गप्प होते.

"हे नेहमीचंच झालंय... म्हणूनच म्हणतो हा लॉटरीचा नाद सोडा. पण तुम्ही ऐकाल तर ना!" सुमितने तोंड घातलं.

"तू गप बे भिडू, साला जीतलो की वडापावकी पार्टीमे तुच पुढे असतोस." मनोजने कधीतरी अगोदर झालेल्या नुकसानीचा राग सुमितवर ओरडून वसुल केला.

"अरे आपण नेहमीप्रमाणे भटकंतीला निघालोय खरे. पण आज करायचं काय? " सुहासचा प्रश्न.

"बसू या तलावाकाठी. टाईमपास करू आणि मग निघू." संजयचं मत.

"ते तर आहेच रे...... पण....जरा लॉटरी स्टॉलकडे पण एक फेरी मारूया ना." आतापर्यंतचं सर्व बोलणं शांतपणे ऐकणार्‍या अत्यंत मितभाषी राजेशने आपलं मत सांगितलं.

"कशाला उगाच? लॉटरी तर कोणीही काढली नाहीये. आणि तसंही तु, सुहास आणि सुमीत लॉटरी काढायचं नाव घेत नाही. मग उगाच कशाला? " संजयने नापसंती दाखवत तेथे जायला नकार दिला. खरंतर गेल्या आठवडयात त्याने तीनचार वेळा लॉटरीचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा लागलीही आणि नंतर सलग तीनवेळा जादावाली तिकिटं काढून नुकसान झालं होतं. त्यामुळे जेव्हा पक्की टिप मिळाली तरच काढायची नाहीतर नाही असं त्याने ठरवलं होतं. तरीही आजची ७ नंबरची टिप मिळूनदेखील त्याने हिंमत केली नव्हती.

"त्याच काय आहे, आपल्याला सर्वांना जेमतेम महिना ६०० ते १००० रुपये पगार मिळतो. तो पण अपुरा आहे हे सगळे मान्य करतील. त्यात लॉटरी हा नशीबाचा खेळ. जिंकण्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता जास्त. मला त्यामुळेच लॉटरी नकोशी वाटते. बाकी काही नाही." सुहासने नेहमीप्रमाणे आपली फिलॉसॉफी मित्रांच्या डोक्यावर मारली.

"मी तर अजून कॉलेजला आहे. घरून खर्चापुरता कसेतरी पैसे मिळतात, लॉटरीला कोण देणार? " सुमितने आपली व्यथा मांडली.

" ते खरं रे. पण राजेशला आज लॉटरी स्टॉलकडे का जायचंय? " विजयने सर्वांना मुळ मुद्दयाकडे आणलं.

"अरे हो! हे लक्षातच आलं नाही. राजेश, कशाला जायचंय तिकडे?" सुहासने शंकीत नजरेने विचारलं.

खरंतर सुहास आणि राजेश घनिष्ट मित्र. दोघेही पदविकाधारक. दोघेही एकाच ठिकाणी नोकरीला. राजेश गावाहून नोकरीसाठी इथं आलेला. सध्या बहिणीकडे रहात होता. आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची. त्यामुळे लॉटरीच्या फक्त गप्पा ऐकण्यापुरता त्याचा इंटरेस्ट. सुहासनेच राजेशला विचारलंय म्हटल्यावर सर्वांनाच नवल वाटलं. राजेशच्या उत्तरासाठी सर्वांनी कान आणि डोळे राजेशकडे वळवले.

"काही नाही रे, सहजच " राजेश नजर चुकवत बोलला. " तसंही आपण नेहमीच तर जातो म्हणून . . ."

"अस्स.. पण नाही, तसं नाही वाटतं आम्हांला, काय तरी आहे " सुमितची बालसुलभ शंका. इतरांनीही त्याची री ओढली. बरेच आढेवेढे घेऊन शेवटी राजेश बोलला, " मी आज लॉटरी काढलीय. "

अख्खा गृप उडाला, सर्वांनाच धक्का बसला हे ऐकून.

"काय्य! " सर्वांत पहिल्यांदा मनोजने प्रतिक्रिया नोंदवली. मग इतर आळीपाळीने पुढे सरसावले.

"खरंच तू लॉटरी काढलीयस?" सुहासचा अविश्वास.

"मला पण आश्चर्य वाटतंय हे ऐकून." सुमित.

"वो बोल रहेला ना, तो खरं असणार " मनोजचं प्रामाणिक मत.

"ठीक आहे मग, कुठला नंबर काढलास?" संजयचा उत्साह.

"अँ? अरे संज्या, हे तूझं काय भलतंच." सुहासचा वैताग.

" का? काय झालं? " संजयचा निर्विकारपणा.

" अरे राजेशने लॉटरी का काढलीय म्हणून आम्हांला नवल वाटतंय आणि तुला नंबराचं पडलंय." सुमितचा प्रांजळ विचार.

" अरे संज्याचं काय चुकलं? राजेशने लॉटरी काढलीच आहे तर त्याने फक्त त्याचा नंबर विचारला." विजय प्रसंगानुरूप मत.

" हे बराबर बोला विज्याभिडू. " मनोजचा दुजोरा.

" कोणीतरी टिप दिली का राजेश? " संजयचा उत्साही प्रश्न.

आता बाकीचेही सावरले. शिवाय विजयचं बोलणं पटलं होतंच.

" फिर बोल भिडू, क्या है नंबर? " मनोजने सलगीने विचारलं.

" ९..... मी नऊ नंबर काढलाय." राजेश हताशपणे म्हणाला. . ."आणि हो, कोणीही टिप वगैरे दिली नव्हती. "

" च्यायला, बरी डेरिंग केलीस तू. कोणाकडून टिप, सल्ला तरी घ्यायचास ना. गेले ना पैसे फुकट. " विजय

" खरंय, फारच मोठी डेअरिंग केलीय मी. पैसे घालवून बसलो. मोठं नुकसान करून घेतलं माझं. " राजेश एकदम उदास झाला होता.

" एक मिनिट! तु काय म्हणालास ? मोठी डेअरिंग ? मोठं नुकसान? याचा अर्थ ? " सुहासच्या बोलण्यात काळजीचा सूर होता. सर्वजण गंभीर झाले.

"मी पन्नासवाली काढलीय " राजेशच्या या वाक्याने सर्वच हादरले. २, ५ किंवा कधीतरी जास्तीची डेअरिंग करून १० रुपयाची लॉटरी तीही आठवड्यातून एकदादोनदाच काढणारेसुध्दा आ वासून पहात होते. सर्वजण तलावाच्या कठड्याकडे आले. राजेश पहिल्यांदा बसला. बाकी त्याच्याभोवती जमले.

"पण असं अचानक का वाटलं ? " सुहासने शांतपणे विचारलं.

"वाटलं, कधीतरी आपणही नशीब आजमावून बघू. " राजेश कसंनुसं हसत बोलला. सर्वजण गंभीरपणे ऐकत होते. मितभाषी पण हसतमुख राजेश वेगळं काहीतरी बोलला होता.

"माझ्या घरची परिस्थिती तुमच्यापासून लपलेली नाहीये. दोनतीन वर्षांपासून इथं आहे. गावी आईबाबा आणि धाकटा भाऊ आहे. इथं मोठ्या बहिणीचा संसार आहे. भावोजींची नोकरी बेभरवशाची. सर्वांना अपेक्षा माझ्याकडून. इंजिनिअर आहे ना मी. . . कशीबशी नोकरी मिळालीय. नोकरीला सुरूवात केल्यापासून मी माझ्या पगारातून माझ्या येण्याजाण्यासाठीचे आणि थोडेसे हातखर्चाला पैसे घेतो. काही पैसे गावी पाठवतो आणि उरलेला सर्व पगार बहिणीकडे देतो. तीला तोही अपुराच पडतो. गेली कित्येक महीने हेच करतोय. खरंतर आपण सर्वजण आर्थिकदृष्ट्या दारिद्र्यरेषेखालील पट्टयात मोडतो. माझ्या परिस्थितीबाबत तुम्ही सर्व जाणता आणि वेळप्रसंगी मला संभाळूनही घेता. पण. . .पण किती दिवस असं चालणार? कधीतरी, काहीतरी बदलेल म्हणून अजून किती दिवस वाट पहायची. चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करतोय तर तिकडेही अपेक्षाभंग होतोय. कधीकधी फार निराश होतो मी."

"असं काय बोलतोयस तू. मान्य की आम्ही तुझे सर्व प्रॉब्लेम नाही सोडवू शकत. पण एकमेकांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न तर करू शकतो. " सुहासने मत व्यक्त केलं. बाकीच्यांनीही त्यात सूर मिसळला.

"तेच म्हणतोय मी. आपण एकमेकांशी आपापले प्रॉब्लेम बोलतो पण काही प्रॉब्लेम सोडवू शकत नाही खासकरून पैशाचे. मग पर्याय काय? तर नशीब आजमावून बघणे. मग आपले काही मित्र लॉटरीचा पर्याय निवडतात. मी खरं सांगू, मला लॉटरीचा मोह कधीच नव्हता. पण तीन-चार दिवसांपासून फारच प्रॉब्लेम झाला होता. "

"आमच्याकडून काहीच होण्यासारखं नव्हतं का? संजयने थोडंसं नाराजीच्या स्वरात विचारलं.

"खरंच नव्हतं रे, वाईट वाटून नका घेऊ तुम्ही. आणि सर्वांनाच सर्वांबद्दल सर्वच माहीत आहे रे. खासकरून पैशांबाबत. "

"पण एकदम ५० वाली लॉटरी? " विजयचा प्रश्न.

"होय, मुद्दामच. . . विचार केला, मिळाले तर एकदम ४५० मिळतील. माझा अर्धा पगार. . . .पण शेवटी आपण ज्या गोष्टीला प्रामाणिकपणे मानत नाही ना त्या गोष्टी आपल्यालाही उडवून लावतात. नास्तिकाला देव कसा पावणार? मी नशीब, दैव इ. ना मानत नाही मग ते पण मला कसं मानणार, उडवूनच देणार ना."

"म्हणजे लॉटरी गेली. पैसे फुकट गेले. " सुमितची भाबडी शंका.

राजेशने होकारार्थी मान हलवली.

"अरे पण निकाल कुठं पाहीला आपण अजून. " सुहासचा आशावाद आणि त्याला इतरांचाही दुजोरा.

"खरंय. पण सर्वजणांकडून ९ नंबर सोडून बाकीच्या नंबरबाबतच सकाळपासून ऐकतोय. " राजेश.

"मग लॉटरी स्टॉलकडे जायचं की नाही ? संजयने राजेशकडे पहात मिश्किलपणे विचारलं. त्याच्या मिश्किलपणावर राजेशलाही हसू आलं.

"देख भीडू, जबतक अपने आँख से देख नही लेता तबतक माननेका नही. मै एकदम सीधी बात बोल रहेला हुँ. " मनोजमधून जॅकी काहीकेल्या बाहेर जात नव्हता.

सर्वांनी मनोजला दुजोरा दिला आणि पूर्ण गँग स्टॉलकडे निघाली मनात लॉटरी लागावी हि सदिच्छा बाळगून. . .


या घटनेला तीस वर्षे झालीत. मीही त्यातलाच एक होतो. राजेशला लॉटरी लागली का? त्याच्या प्रॉब्लेमच काय झालं? राजेशने पुढे काय केलं? आमची प्रतिक्रिया त्यावेळी काय होती? ह्या सर्व प्रश्नांना आता महत्त्व नाही राहिलेय.


तो प्रसंग, ती घटना महत्त्वाची आहे. आम्ही सर्वजण एकमेकांशी बांधलो तो दोर किती पक्का की कच्चा होता ते कळंलं. तेही राजेशमुळे. आपली समस्या त्याने पूर्णपणे नाही सांगितली पण त्यातलं गांभीर्य आम्हांला व्यवस्थित समजलं. त्याला तेव्हा जी पैशांची गरज होती ती आम्ही कदाचित पुरी करू शकलोही असतो किंवा नसतोही पण त्याने आम्हांला त्या संदिग्धतेपासून लांबच ठेवले. मैत्रीमध्ये कुठंच्या अपेक्षा ठेवाव्यात आणि कुठंच्या टाळावयास हव्यात ते त्याने अगदी सहज कोणासही न दुखावता सांगितल्या. लॉटरी हा चुकीचा पर्याय त्याने निवडला, खरंतर तो आमच्याच संगतीचा दुष्परिणाम होता. पण त्याबाबत कोणीही कसलंच मत व्यक्त नाही केलं. प्रत्येकाचं सरळ-साधं बोलणं हेच त्यादिवशीचा मुख्य मुद्दा होता. कोणत्याही नातेसंबंधात हीच सहजता, हाच समंजसपणा अपेक्षित असतो. आपल्या भावना सरळपणे, स्पष्टपणे व्यक्त केल्या की कोणीही समंजस व्यक्ती दुखावली जात नाही हेही आम्हांला समजलं.


आता आम्ही पन्नाशीचे झाले आहोत. एकमेकांशी संपर्क होतो, नाही होतं. पण ती घटना कित्येक वर्ष लक्षात होती. राजेशने मोकळेपणाने व्यक्त केलेली भावना सर्वांना स्पर्शून गेली होती.


Rate this content
Log in