मातीची माणसे
मातीची माणसे


सदू आतबाहेर करत होता त्याच्या मुलीला पहायला पाहुणे येणार होते. मुलगा चांगला होता. मुंबईत नोकरीला होता. शेजारच्या गावामध्ये त्याचे आई-वडील रहात होते. त्याला दोन बहिणी होत्या त्यांचे लग्न झाले होते. हा एकटाच होता. मुंबईलाच राहत होता.. सदूच्या मनात घालमेल चालू होती. आपल्या तनयाला तो मुलगा पसंत करेल ना. हातचं स्थळ जाता कामा नये. यासाठी त्याच्या जिवाचा आटापिटा चालला होता. त्याची पत्नी छाया म्हणाली "अहो आत मध्ये येऊन बसा की.सारख आतबाहेर करताय.बसा गप."
"अगं अजून पाहूणं आली नायती."
" येतील जरा दमानं घ्या की "छाया म्हणाली. तेवढ्यात गाडीचा आवाज आला." पावनं आल्याती आवर बिगीबिगी "असे म्हणत सदूने पाहुण्यांचे स्वागत केले .काचेचे ग्लास पाण्याने भरले .सदूने पाण्याने भरलेला ग्लास चा ट्रे पुढे केला.
"येताना काही त्रास झाला नाही ना. "
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
"आता मुलीला बाहेर बोलवा "एकजण म्हणाला. छाया तनयाला घेऊन बाहेर ये. कन्या रंगाने गोरी सडपातळ होती. तिच्या अंगावर जांभळ्या रंगाचा पंजाबी सूट अधिक खुलून दिसतं होते.
नाव काय पोरी?"
मुलाच्या आईने विचारले .तनया तिने लाजून उत्तर दिले. "अजून प्रश्न काही विचारायचे तर विचारा"
सदू म्हणाला. मुलाने मुलगी पसंत आहे असे आईला सांगितले. बोलणी करायचा दिवस ठरवला. सदूच्या मनात भीती होती. काय काय मागतील आपणाला तेवढं द्यायला होईल का बोलण्याचा दिवस उगवला सदू कडची चार माणसं नवरदेवा कडची चार माणसं एकत्र आली. लग्न तुम्ही करून द्यायचं मुलाची आई म्हणाली मुलाला चैन अंगठी व घड्याळ घेऊन द्या.मानापान बघा. आम्हाला अजून काही नको. सदूची हृदयाची धडधड वाढू लागली एवढा खर्च कसा झेपणार मला. नंदूने सदूला बाहेर बोलावलं अरे वेड्या तू काय करतोस एवढा चांगला मुलगा शोधून सापडणार नाही. हाती आलेली संधी सोडू नकोस. अरे तुला एक मुलगी आहे. तिचं लग्न लावून दिलं की पाटी दोन मुलं. होईल नीट सगळं तू टेन्शन घेऊ नकोस नंदू समजावून सांगत होता. सदू तयार झाला. लग्नासाठी सावकारांकडून कर्ज काढलं
लग्न धुमधडाक्यात लावून दिलं. मुलगी खुश होती. सदू मात्र चिंताग्रस्त होता. यावेळेस पाऊस चांगला पडला. तर पीक चांगलं सावकाराचे कर्ज फेडता येई जून महिना उजाडला. पेरणी करण्यासाठी पावसाची वाट पाहू लागला. पावसाचा पत्ताच नव्हता. सरकारनेही दुष्काळ भाग म्हणून जाहीर केला. सदू चे धाबे दणाणले. सावकाराचं कर्ज मला फेडता येणार नाही. रोज रोज शेतात जाई. माती हातात घेई. ए काळे आई. तूच माझी आई. हे काळी माती माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी तूच मला वाचव. यातून मला मार्ग दाखव. मी मातीचा माणूस मातीत जाणार. मला आता दुसरा काही मार्ग दिसत नाही. आत्महत्या हाच एक उपाय आहे. सावकार मला सोडणार नाही. इकडे माझं कुटुंब पाहून माझं हृदय पिळवटून जात. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था माझी झाली आहे. काळी आई मी काय करू असे म्हणून रडत असे. त्याच्या डोळ्यातील अश्रू मातीत पडे. जणू माती त्याच्या दुःखात सामील होई.
रोज सदू शेतात जाई. रडत असे. एकदा पोरांनी पाहिले. आपले बाबा रोज जातात कुठे. चल आपण पाठलाग करू या. दोघेही लपत-छपत सदूच्या पाठी जाउ लागले. सदू थांबला तसे पोरेही थांबले. रोजच्याप्रमाणे सदूने काळी आईची विनवणी केली. पोरांच्या डोळ्यात पाणी आले
"बाबा तुम्ही आत्महत्येचा विचार करायचा नाही. आम्हाला तुम्ही हवे. तुमच्या विना कोण आहे जगी
. सोनं देखील तलाकुन सलाखुन चकाकतं. आपण तर मातीचे माणसे आहोत. मातीतच जाणार पण संकटावर मात करून "तेवढ्यात वीज चमकली. पावसाचे थेंब जमिनीवर पडू लागले. मातीचा सुगंध दरवळला. जणू पोरांच्या विचाराचे स्वागत आकाश व काळी आई करत होती. आकाश त्यांच्याबरोबर रडत होतं. पोरांनी माती हातात घेतली. बाबांच्या हातात ओली माती देताना "बाबा शपथ घ्या या मातीची ,कधी आत्महत्येचा विचार करणार नाही. कितीही संकट आलं आपण सर्वांनी मिळून मात करू या. "पोरं म्हणाली. सदूच्या डोळ्यात अश्रू आले. पोरांचे हात पकडले व त्यांना जवळ घेतले व छातीशी लावले. विज कडाडली. त्याचा प्रकाश त्या तिघांवर पडला होता.अश्रूंनी व पावसाच्या पाण्यांनी तिघे न्हाऊन निघाले होते.