माझी नोकरी
माझी नोकरी


प्रत्येकाला शिकून सवरून पोटापाण्या करता नोकरी ही करावीच लागते. पुरुषांना तर हवीच हवी आणि आज बायकांना ही ती जरुरीची झालीयं. खर्चच एवढे वाढलेत की नोकरी हवीच.
माझ्यावेळी बायकांना नोकरीची एवढी जरुरी नव्हती. नोकरी न करणारी मुलगी म्हणजे सासरी काबाडकष्ट करायला आयती नोकराणी, बिन पगारी. पण शिकलेल्या मुली स्वस्थ बसत नसत. आपल्या शिक्षणाचं चीज व्हावं आणि स्वावलंबी होणे हाच एक उद्देश नोकरी मागचा होता.
माझं ही लग्न झालं. मुलगी झाली. बी.ए होऊन, टायपिंग, शॉर्ट हॅन्ड शिकून सुध्दा चूल आणि मूल हेच चालू होतं. पण अचानक संधी आली आणि मी बी.एड. करायचं ठरवलं. एका वर्षात बी.एड. ची पदवी ही घेतली. आता बी.एड. म्हणजे शिक्षिकेची नोकरी. त्यातून मुलीला सांभाळून करायची म्हणजे जास्त वेळ घेणारी आणि घरापासून लांब ही चालणारी नव्हती. पण म्हणतात ना की मनी इच्छा प्रबळ असेल तर देवाची आणि नशिबाची ही साथ लाभतेच. माझ्या बाबतीत नेमकं तसच झालं.
माझी बी.एड.ची परिक्षा एप्रिलला झाली. निकाल मे महिन्यात लागला आणि जून महिन्यात मला घरासमोर असलेल्या शाळेतच पार्ट टाईम, दोन तासांची, इंग्रजी माध्यमात, सिनीयर के.जी. च्या मुलांना शिकवण्याची नोकरी लागली. ह्या दोन तासाच्या शाळेत मी माझ्या दोन वर्षाच्या मुलीला ही घेऊन जात होते. अधून मधून त्या मुलांबरोबर माझ्या मुलीच्या ही सगळ्या पॉयम्स पाठ झाल्या. तीन वर्षे शिकवल्या नंतर मी मोठ्या शाळेत जाऊन माध्यमिक मुलांना शिकवू लागले.
बायकांनी नोकरी केली म्हणजे घरा दाराकडे दुर्लक्ष होते असे लोकांना वाटते. थोडं होत ही असेल, पण माझी नोकरी ही शिक्षिकेची, म्हणजेच पाच साडेपाच तासंच घराबाहेर रहावं लागणारी. सकाळचा किंवा दुपारचा वेळ शाळेकरता, ऊरलेला अर्धा दिवस हा आपल्या संसारासाठीच. म्हणजे घर संसार सांभाळून नोकरी केल्याचे ही समाधान. नोकरी करताना सुरुवातीला थोडा त्रास झाला पण तो सर्वांनाच करावा लागतो.
ह्या नोकरीने मला खूप समाधान मिळाले. शिक्षकाची नोकरी म्हणजे ज्ञानार्जन. जेवढं आपण ज्ञान देऊ, तेवढं आपलं ज्ञान वाढतं. देशाचे भवितव्य शिक्षकांच्या हातात असते. आपण जसे घडवू तशी पुढची पिढी तयार होणार. हे समाजाचे एक महान कार्य मी करत रहिले. माझे आचार, विचार, संस्कार त्या मुलांवर बिंबवले आणि देशाला सुजाण नागरिक दिले ह्याचे मला खूप समाधान लाभले. सगळीच मुले चांगलीच निपजली असे नसेल पण बहुतांश मुले उत्तम नागरिक झालेली मी पाहिलीत आणि खरंच एक आत्मिक समाधान मला लाभले. ते दुसऱ्या कोणत्याही नोकरीत लाभले नसते.