Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Surarna Sayepure

Others


3.5  

Surarna Sayepure

Others


माझी डायरी

माझी डायरी

4 mins 22.7K 4 mins 22.7K

माझी डायरी

भाग १:

.... आणि मी नापास झाली!

माझं शाळेत पहिलं पाऊल पडलं (इयत्ता - बालवाडी). तशी मी आधीपासूनच चालायला लागली. परंतु, शाळेतलं पहिलं पाऊल ही आपल्या जीवनातली क्रांती वैगरे असते म्हणून. तो पहिला दिवस मला अजूनही आठवतो... कारण पहिल्याच दिवशी माझ्या बाटलीतली नळी हारवली आणि ती अद्याप सापडली नाही (कुणीतरी चोरली असणार असा संशय मी वय वर्षे ३ असल्यापासून येत आहे).... ती घटना आठवली की मन अजूनही हळहळतं आणि शाळेत जाणार्या त्या मुलांच्या बाटलीकडे मी आशाळभूतपणे पाहत बसते... असो...

बालवाडीत दोन वर्षे बसवण्याची प्रथा आहे. पण ती प्रथा मी मोडली आणि प्रथा मोडण्याची प्रथा मीच पाडली.... तर झालं असं की माझ्या बालवडीच्या बाई (बाई म्हणायचो कारण तेव्हा निळू फूलेचे थोर वाक्य आमच्या कानांपर्यंत पोहचली नव्हते) ....तर कांबळे बाईंनी मला एकच वर्ष बालवाडीत ठेवलं.... मी या बद्दल आईला जेव्हा कारण विचारते तेव्हा ती सांगते की मी हुशार होते म्हणून. पण मला आजही स्पष्ट आठवतं (स्पष्ट आठवतं असं सांगाव लागतं कारण त्याने कथा अधिक रंजक होते.) तर मला आज स्पष्ट आठवतं की, मला प्रश्न विचारायची फार सवय होती. ‘बाई तुम्हाला त्या साबणातलं सोनं कधी लागलं होतं का?, सितेला पळवताना रावणाने रामाचच रूप का घेतलं नाही?, जाडजूड गायकांचा आवाज अधिक मंजूळ का असतो? पृथ्वी कुठे जाऊन संपते? टिव्हीतले नट-नटी नेमके टिव्हीच्या बॉक्सच्या कोणत्या नटामागे लपलेले असतात? असे एक ना अनेक प्रश्न मला पडायचे. त्यामुळे नक्की मी हुशार होती की बाई मला नव्हे तर माझ्या माझ्या प्रश्नांना कंटाळल्या होत्या हे देव जाणे.... तर अशा रितीने मी वय वर्षे 'चार' असताना इयत्ता पहिलीत पोहचले.

प्राथमिक शिक्षण म्युनिसीपालटीच्या शाळेत झालं… त्यामुळे पहिला नंबर येण्यासाठी नक्की काय कराव लागत अभ्यास की बाईंची सेवा हा प्रश्न कायम मला पडायचा (तसे भरपूर प्रश्न पडायचे पण त्यातल्या त्यात हा आघाडीचा प्रश्न असला तरी विरोधी पक्षाच्या आघाडीवर असणाऱ्या प्रश्नांशी याचा कोणताही सबंध नाही.

मी खुप हुशार होती असं सांगण्याचा मी प्रयत्न करत नाही पण जे शहिस्तखानाच्या बोटांएवजी मुंडके उडवायची ते वार्षिक मध्ये मात्र पहिल्या पाचात असायचे... मग थोडं आश्चर्य तर वाटणारच ना?? (अशा गोष्टींना प्राधान्य दिल्यानेच मोठा गुन्हेगार तयार होत असावा अस माझ प्रामाणिक मत होतं.)

माझ्या डब्यात तसे रूचकर पदार्थ असायचे. त्यामुळे मी तो डबा बाईंबरोबर बसून खायची. त्यामुळे मी ही तशी पहिल्या पाचात असायची (कशी?? हा प्रश्न मला अजूनही पडतो) आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी काय लिहलय हे एक वाक्यही कोणाला धडं वाचता यायचं नाही पण तरीही मी मात्र पहिल्या पाचात! (तस ते आजही कोणाला वाचता येईल याची शाश्वती मी देऊ शकत नाही).

एकदा बाहेरून इन्सपेक्शन करणारे येणार होते. हे इनस्पेक्षन करणारे अघळपगळ वैगरे कसेही असले तरी त्यादिवशी मात्र, त्यांचा त्या दिवसापुरता दरारा असायचा हे खरे. त्या बाई येणार म्हणून त्यामुळे कोणी कोणत्या बाकावर बसायचं इथपासून काय शिकवणार आणि कोणाला कोणता प्रश्न विचारणार हे सगळं ठरलं होत! (आयुष्यात कोणाला मॅनेजमेंटच कौशल्य शिकायचं असेल तर म्युनिसीपालटीच्या शाळेतील शिक्षकांकडून शिकावं..... इतक चोख मॅनेजमेंट असतं...). त्या इन्सपेक्शन करणार्या बाई आल्या आणि थेट मागच्या बाकावर बसल्या... ठरल्याप्रमाणे सगळं झालं, प्रत्येकाने आप-आपली उत्तरे श्लोकांप्रमाणे बोलून दाखवली. त्या आमच्यावर जाम खुश झाल्या... त्यांनी समोर येऊन आमचे कौतुकही केल.... आम्हाला 'अ' गट मिळणार हे जवळ-जवळ निश्चितच झालं होत! इतक्यात त्यांनी नुकत्याच झालेल्या सहामाही परिक्षेचे पेपर पहायला मागितले. बाईंनी पेपर व्यवस्थित रचले होते. स्वच्छ, सुवाच्च अक्षरातील पेपर वर आणि हाताखाली लागतील अशा प्रकारे वैगरे वैगरे.... पण यावेळेस मात्र बाईंचा प्लॅन फ्लाॅप ठरला. त्यांनी त्या गठ्ठयातून एक पेपर बाहेर काढला (अर्थात तो माझाच होता हे वेगळे सांगायला नको) त्यांनी समासात नजर टाकली. ५० पैकी ४४ मार्क्स होते म्हणून उत्सुकतेने त्यांनी आत नजर टाकली... एक वाक्य सोडा एक शब्द वाचायला आला असता तर मी धन्य झाले असते. त्यांनी तडक लाल पेन घेतला आणि बिनकामाची लोक जेवढी अंडी घालत नव्हती तेवढी अंडी त्यांनी माझ्या पेपरावर रेखाटली..... त्यानंतर काय झाले मला खरंच माहित नाही पण आमच्या शाळेला 'क' गट मिळाला आणि मी पहिल्यांदा पास होऊनही नापास झाली!

उत्तर अगदी तोंडपाठ असतानाही मी नापास कशी झाले?? या प्रश्नामुळे माझ्या बाबांचा मोर्चा पहिल्यांदा शाळेकडे वळाला. (तसे माझ्या बाबांना माझ्या तक्रारीरी शिवाय शाळेत जाण्याचा योग आला नाही. आणि माझं ते अक्षर पाहून पुन्हा कधी शाळेत आलेही नाही) माझा पेपर पाहून माझ्या बाबांनी 'आ' च वासला. तो 'आ' मला गिळंकृत करतो कि काय अशाच प्रकारचा होता... त्यानंतर त्यांनी माझे शुध्दलेखनाचे धडे घेतले. पण ते धडे माझे अक्षर काही धड करू शकले नाही. असो माझं अक्षर हा तेव्हापासून आतापर्यंत हिट टाॅपीक राहिला आहे.

इतकंच काय अखेर मला लोक विचारू लागले, बेटा नापास म्हणजे नक्की किती पडले?

तेव्हा मी म्हणायचे, चार!!

अर्थातच हे चार शुन्य होते... आणि अशा रितीने मी आयुष्यांत पहिल्यांदा नापास झाले.


Rate this content
Log in