Jyoti gosavi

Others

3.5  

Jyoti gosavi

Others

माझे बाबा माझ्यासाठी

माझे बाबा माझ्यासाठी

3 mins
133


सातारा जिल्ह्यातील करंजखोप नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात माझा जन्म, त्यातून मी "तिसरी मुलगी" पण माझ्या वडिलांनी मी तिसरी मुलगीच आहे हे कधी जाणवू दिले नाही. याउलट त्या काळात माझे वडील काळापेक्षा दोन पावले पुढे होते. वंशाच्या दिव्यासाठी नऊ-नऊ मुली जन्माला घालण्याच्या काळात, माझ्या वडिलांनी तीन मुलींवर ती स्वतःचे फॅमिली प्लॅनिंग चे ऑपरेशन करून घेतले. या काळामध्ये आत्तासुद्धा पुरुष स्वतःचे ऑपरेशन करून घेत नाहीत, तर बायकोला पुढे करतात. घरची परिस्थिती हलाखीची किंवा गरिबीची होती परंतु त्यांनी शिलाई धंदा ,शेतीचे उत्पन्न, भिक्षुकी असे सगळे उपद्व्याप करून आम्हाला दोन्ही टाईम व्यवस्थित जेवण दिले.


ज्या काळात मी शालेय शिक्षण घेत होते त्या काळात मुली जास्तीत जास्त दहावी पर्यंत शिकत असत. दहावीपर्यंत शिक्षण दिले म्हणजे खूप झाले. लग्नाच्या बाजारात त्या वेळी "नॉनमॅट्रिक "ही पदवी खूपच मोठी होती.मुली दहावी झाल्या की लग्न करून दिले जात असे.पण आमच्या वडिलांनी आम्हा तिघी बहिणींना उत्तम शिक्षण दिले , आम्ही तिघी देखील सरकारी नोकरीमध्ये आहोत, त्यांनी आम्हाला आमच्या पायावर उभे केल्याशिवाय लग्न केले नाही. तुम्हाला भाऊ नाही तेव्हा तुमची नोकरी हा तुमचा भाऊ असे आई-वडील सांगत असत. त्यांनी त्यांचा कोणताही निर्णय आमच्यावर कधी लादला नाही. तीस-चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी आम्हाला भरपूर विचार स्वातंत्र्य दिले. आचार स्वातंत्र्य दिले होते.


बाकी इतर आईवडील करतात ते त्यांनी केले पण त्या व्यतिरिक्त त्यांनी कायम सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार, सकारात्मक विचारसरणी, कधीच हार न मानण्याची वृत्ती ,आमच्यामध्ये पेरली.परिस्थितीशी झुंज देण्याची आमची वृत्ती  त्यांच्यामुळेच बनली. त्याची दोन-तीन उदाहरणे सांगते.

1) ज्यावेळी मी सायक्याट्रिक नर्सिंगच्या साठी बंगलोरला गेले होते. तेथील अभ्यासक्रम ,इंग्लिश स्पिकिंग झेपणारं वाटत नव्हतं त्यामुळे ट्रेनिंग सोडून परत येण्याचा विचार करत होते. परंतु वडिलांनी एका शब्दात सांगितले. "नापास झालीस तरी चालेल! परंतु पळपुटेपणा करायचा नाही. आणि त्यांच्या एका वाक्यावरती मी माझे ट्रेनिंग पूर्ण केले. 


2) माझा मोठा मुलगा दिव्याच्या अमावस्येला जन्माला आला. त्यामुळे मी थोडीशी नाराज होते, खट्टू होते पण "अगं! अमावास्येला झाला म्हणून काय झालं? तुझा मुलगा अतिशय धाडसी होईल. दुसरे महायुद्ध गाजवणारा चर्चिल देखील अमावस्येचा होता असे उदाहरण त्यांनी मला दिले. छोटा मुलगा दुपारी बारा वाजता जन्मला, तेव्हा वडिलांनी राम जन्मला ग सखे राम जन्मला गाण्याची ओळ ऐकवली. 


3)तिसरा आणि शेवटचा किस्सा म्हणजे नवीन घर घेत होते काही कारणामुळे मिस्टर घरातच होते आणि सात लाखांचे घर घेतले. त्यावेळी माझ्या अकाउंटवर 70,000 देखील नव्हते. काय काय उचापती कराव्या लागल्या, किती पापड बेलावे लागले ते माझे मलाच माहित. त्यावेळी तर माझे वडील अंथरुणाला खिळलेले होते. परंतु तशा परिस्थितीतही  देखील फक्त त्यांनीच मला विचारले, अगं! जावईबापू घरात असताना तू एकटीने 700000 कसे उभे केलेस? बाकी कुणालाही हा प्रश्न पडला नाही. परंतु स्वतःच्या आजारपणात देखील त्यांना आमची काळजी होती.   मी म्हणाले काका तुमचे आशीर्वाद, "पांडुरंगाची कृपा" दुसरं काय झाले सात लाख रुपये ऊभे! 


अक्षरशः दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळले. आज ते या जगात नाहीत परंतु पावलोपावली त्यांची आठवण येते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक क्षणी ,प्रत्येक प्रसंगी, आजही त्यांचेच विचार तारून नेतात माझ्या जडणघडणीत माझ्या आई वडील दोघांचाही मोठा वाटा आहे.परंतु म्हणतात ना मुलगी आणि वडील यांची जी वेगळी अटॅचमेंट असते ती आमच्यात असल्यामुळे, जगात कोणाला नसतील मिळाले असे वडील मला मिळाले ,आणि परमेश्वराला माझी प्रार्थना की जन्मोजन्मी हेच वडील, हेच आई वडील पुन्हा पुन्हा मिळत राहावे हीच तुझ्या चरणी प्रार्थना.


Rate this content
Log in