Preeti Sawant

Others

3  

Preeti Sawant

Others

माझे आजोळ

माझे आजोळ

3 mins
308


उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की मला आठवतं माझं आजोळ. म्हणजे माझ्या मामाचं गाव.

लहानपणीचे ते दिवस फारच वेगळे होते. वार्षिक परीक्षा संपली की काही दिवसांनी आम्ही चक्क टेम्पोतुन गावाला जायचो. 

आता तुम्ही म्हणाल, टेम्पोतून का?तर माझ्या चुलत मामाचा टेम्पो होता. 

सो, मुंबईला जर सामान पोहचवायचे असेल तर तो टेम्पो भरून यायचा पण परत जाताना मात्र तो खाली असायचा. त्यामुळे मग आम्ही आम्ही टेम्पोच्या पाठी बसून आरामशीर गावी पोहोचत असू.

डोंगर आणि भरपूर झाडे दिसायला लागली की, गाव जवळ यायची चाहूल लागे. मग काय कधी एकदा घर येतेय असे होई.

माझ्या आजोळी मुख्य रस्त्याच्या कडेला बोरिंग होती म्हणजे आताही आहे. बोरिंगकडून घर अगदी समोर होते. गाडीचा आवाज आला की, आजोबा धावत यायचे. मग सगळे सामान घेऊन आम्ही घरी जायचो तर दरवाजात आजी आमची वाट पाहत असे. मग ती आम्हाला जवळ घेऊन आमचा पापा घेत असे.

मग काय आमची मजाच असे. रोज सकाळी उठून आजीच्या हातची न्याहरी खायची आणि मग पत्ते खेळायला बसायचं. आजोबा ही आमच्याबरोबर खेळायला येत असत.

दुपारी जेवण आणि मग परत डोंगर का पाणी किंवा डब्बा फोडी असे खेळ आम्ही खेळत असू. दुपारी कोणालाही झोप यायची नाही.


संध्याकाळी फिरायला जात असू. कधी करवंद कधी कधी जांभूळ खा. असे आमचे पराक्रम होत. परत घरी येऊन हात पाय धुवून देवाला नमस्कार करून परत आम्ही खेळ खेळत असू.

कधी कधी मावशी नदीवर पण घेऊन जात असे. तिथे पाण्यात पाय घातल्यावर पायाला गुदगुदल्या होत असत. बारीक मासे आपल्या पायाभोवती फिरत असत. तेव्हा ची मजा काही औरच होती.

माझ्या आजोबांची बैलगाडी सुद्धा होती. आजोबा आमच्याकडून पावसाआधीची कामे करून घेत असत. म्हणजे लाकडे उचलून वाड्यात ठेवणे, गवत भरणे. पण त्यामध्ये फार मजा यायची. कारण आम्ही सर्व मिळून आनंदाने ती कामे करत असू.

मला अजून आठवते एकदा आम्ही सगळी मुलं गाय, बैल चरतात ती जागा शोधून काढली. घरापासून ती थोडी लांब होती. पण खूप हिरवेगार गवत होते सगळीकडे. तेव्हा तिथे कसलातरी आवाज झाला. आम्ही मग तिथून लगेच घरी आलो.

त्यानंतर आम्ही हे मावशीला सांगितले तर ती म्हणाली की, जास्त लांब जात जाऊ नका. तिथे भालू असेल. हे तर ती व्हाळा जवळ गेल्यावर पण म्हणत असे. ही भालू कोण हे मात्र अजून कळले नाही.पण मग आम्ही सगळी मुलं रात्री ह्या बद्द्ल चर्चा करू त्यामध्ये नवीन गोष्टींचा उलगडा होत असे. ते वय म्हणजे डिटेक्टिव्ह गिरीचं असत. 

आता हे सगळे आठवरून हसू येतं.आजोबांची कलमाच्या आंब्यांची झाडे होती. त्याला भरपूर आंबे धरत असत. आंब्याच्या बाबतीत आम्ही खरच सुखी होतो. हवे तेवढे आंबे खायला मिळायचे.

मला गावातली मंदिरे खूप आकर्षित करायची. आताही करतात. त्यामध्ये काही काही मंदिरात बायका जात नाहीत. मग का जात नाहीत यावर कधी नीट उत्तर ही मिळत नसे. माझ्यासाठी अजून ही ते गूढ आहे.

मला आठवतंय की, एकदा आम्ही मालवण ट्रिप ला गेलो होतो. बरोबर मोठी माणसे हवी म्हणून आई, मामा आणि मावशी बस तिघेच आले होते. कसली मजा आलेली सांगू.

तेव्हा आम्ही सातेरी देवीचे वारुळातले मंदिर बघितले आणि वेतोबाचे ही दर्शन घेतले. सिंधुदुर्ग किल्ला पाहिला, मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर फिरलो. खूप मजा केली.

तेव्हा आम्ही सगळे लहान होतो म्हणून आम्ही मजा करत असू. एकत्र येत असू.

पण जसे जसे आम्ही सर्व मोठे झालो आमच्याकडे गावाला यायला वेळ कमी पडू लागला. तरी आम्ही एक आठवडा सुट्टी काढून येत असू.

तेव्हा पण इतकीच मजा करू. पण आता तर बऱ्याच जणांनी लग्न झाली आणि आमची आजी ही आता या जगात नाही. 

आता आजोबा आहेत पण त्यांना जास्त एकटे ठेवत नाही म्हणून ते जास्त करून गावच्या मावशी कडे असतात.आता ते घर खालीच आहे. 

आमच्या सगळ्याची जणू वाट पाहतय.कधी ही सगळी मिळून इथे येतील आणि परत तो धिंगाणा घालतील व पुन्हा ह्या घराला घरपण येईल.

जे घर आता उदास आहे ते आनंदाने नाचू लागेल.


समाप्त


Rate this content
Log in