माझा छंद
माझा छंद


"छंद" म्हणजे आपली आवडती गोष्ट. वाचन, लेखन, भटकणे, खाणे, फोटोग्राफी, बागायत काय आणि काय, काही सांगता येत नाही. प्रत्येकाचे छंद वेगळे असतात. जे काही आपण काम म्हणून करत नाही व जे केल्याने आपल्याला आनंद मिळतो तो छंद असतो. काही जण आपले छंद लहानपणापासूनच जोपासतात. तर काही जण वय आणि वेळेनुसार छंद स्वीकारतात आणि नंतर त्या छंदाच्या आधीन होतात.
प्रत्येकाला छंद असावाच असे मला वाटते. छंद आता कोणत्या, कशा बाबतीत, किती प्रमाणात असावेत हे प्रत्येकाचे वेगळे असू शकते. छंद बाळगणे महत्वाचे. आपला छंद जोपासणारा वेळात वेळ काढून छंदा करता देतोच आणि आपल्या आवडीचे कार्य केल्यावर आपल्याला एक उर्जा मिळते व पुढील आपली सगळी कामे सुरळीत आणि जास्त उत्साहाने होतात.
मला लहानपणापासून पुस्तके वाचायची आवड होती. इंंग्रजी माध्यमात जरी शिकले तरी मराठी पुस्तके वाचण्याची गोडी होती. घरातली मोठी माणसे पुस्तके वाचत होती, म्हणजे कादंबऱ्या, दिवाळी अंक वगैरे, पण आम्हा मुलांना ती वाचायची बंदी होती. पण तुम्हाला माहीत आहेच, मुलांना काही करू नका म्हटले की तेच जास्त करायची इच्छा होते. मी ही तसेच करायचे, म्हणजे चोरून पुस्तके वाचायचे. त्यात ना. सी. फडके, वि.स. खांडेकर, व.पु. काळे, जयवंत दळवी, कानेटकर, अत्रे ईत्यादी वाचले. सगळं काही कळत नव्हतं तरी वाचायची इच्छा मात्र खूप दांडगी होती. अभ्यासाच्या पुस्तकात कादंबरी घालून वाचली व त्यामुळे मार आणि ओरडा ही खाल्ला.
नंतर मोठ्या वर्गात, कॉलेजात अभ्यासामुळे वाचन थंडावले. लग्नानंतर संसारात रमले. मध्ये लायब्ररी लावली. शिक्षकी पेशात होते, त्यामुळे थोडे लिखाण करत होते पण ते फक्त शाळेच्या सांस्कृतीक कार्यक्रमा पुरते. घर, संसार, मुले-बाळे, शाळा, शिकवणी यात वेळ कसा जायचा कळायचेच नाही. शाळेतून निवृत झाल्यावर मात्र भरपूर वेळ मिळाला. मग माझ्या छंदाला उधाण आले.
मोकळ्या वेळे मुळे माझ्या वाचनाला गती मिळाली. लेखनही करत होते, पण ते स्वतःपुरते, फक्त डायरीत. आता जवळ जवळ दोन वर्षे होत आली, मी फेसबुक आणि व्हाट्सएपमुळे हळूहळू माझे लेखन इतरांबरोबर सामायिक करू लागले.
आता वाचन लेखनाचा एवढा छंद लागलाय की कामा व्यतिरिक्त सगळा वेळ मी लेखनात घालवते. ह्या छंदाने वेळ मस्त जातो. बरेच काही शिकायला मिळाले आणि मिळत आहे. नविन नविन वाचन व लेखन ह्यातच मी मग्न असते. फेसबुक आणि व्हाट्सएपचे वेगवेगळे ग्रुपस व त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन लिहायला व वाचायला मिळते. हाच माझा छंद मला खूप खूप आनंदित ठेवतो.