लॉकडाऊन - दिवस 9
लॉकडाऊन - दिवस 9


प्रिय डायरी,
बाहर से कोई अंदर ना आ सके| अंदर से कोई बाहर ना जा सके ||
सोचो कभी ऐसा हो तो क्या हो| सोचो कभी ऐसा हो तो क्या हो ||
काहीशी अशीच स्थिती होऊन राहिली होती मुंबईची, बातम्यांतून मुंबईतल्या कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी वारंवार दाखवली जात होती. हळूहळू ही सुखद कैद अंगवळणी पडत होती, शरीर स्थूल होत होतं. आज आमच्या भागात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा वार्तापत्र आली होती, तशी काही भागांत वर्तमानपत्र 1 एप्रिल पासून सुरू झाली होती. आमच्याकडे दोन दिवस उशीरा.... चला उशीरा का होईना,
घरी रोजचा पुढारी आणि हिंदुस्थान टाईम्स घेऊन आलो, संपूर्ण पेपर कोरोनामय झाला होता. काही वेळ पेपर मध्ये गुंतवून मग सुधीरकडे गेलो. सात्विक चिंतेमुळे गावाहून सतत फोन येत होते. निसर्गाने स्वतः निर्माण केलेल्या या विश्वाचा ताबा स्वतःच निसर्गाने घेतला होता. परिस्थिती युद्धजन्य होती, पुढच्या महिनाभरासाठी लागणारं वाणसामान आमच्याकडे होतं. दुपारच्या खाण्यापिण्याची सोय सुधीरच्या घरीच झाली. सकाळपासून कंपनीचं काही काम केलं नव्हतं, आम्ही दोघही काही वेळ सिस्टमवर काम करत थांबलो. कामाचे वीकली रीपोर्ट मेल केले. संध्याकाळची चव चहाने आणखीन गोड झाली, अधून मधून आमचे प्रोजेक्ट च्या संदर्भात बोलणे सुरू असायचे; पण या परिस्थितीत हालचाली वेग घेत नव्हत्या. वेळ घालवण्यासाठी काहीच करमणूक उरली नव्हती. वेफर्सचची पाकीट संपली होती, आणि आता पुन्हा मिळणे अशक्य होती.आसपास परिस्थिती इतकी झाली होती की खिशात पैसे होते, पण दुकानात सामान नव्हते, जगणं अशक्य नाही पण कठीण होत होतं.
पुन्हा नव्याने जुने छंद हाती आले होते, पैसा सोडून हे मन जगण्याच्या उमेदीत होते. रात्री जेवणानंतर पत्त्यांची मैफिल पक्की ठरली होती, काका आणि राधिका दोघे माझ्या घरीच येणार होते. काकांच्या घरीच जेवण झाले, जेवता जेवता सहज एक विषय दुसर्या महायुद्धाभोवती घुटमळला. काकांनी त्या संदर्भात जेवणानंतरही बरेच भाष्य केले, मी आणि सुधीर आम्ही दोघेही ऐकत होतो, तशी दहावीनंतर इतिहास शिकवणीची मिळण्याची आमची बहुदा पाहिलीच वेळ... घड्याळाने वेग घेतला होता. आमचं बोलणं कदाचित वेळेच्या आवर्तनांपलिकडे गेलेलं होतं, कारण आम्हाला बाकी कशाचंच भान उरलं नव्हतं.