लॉकडाऊन दिवस 7
लॉकडाऊन दिवस 7


प्रिय डायरी,
जाग आल्यानंतरही कितीतरी वेळ अंथरूणात पडून होतो, अस्वस्थतेने कूस बदलत, उठायची काही इच्छा होत नव्हती, शेवटी कंटाळून 10 वाजता उठावं लागलं, अगोदर रोजची चर्या नंतर ठरल्याप्रमाणे आईला फोन, झालं दिवस सुरू झाला. वेफर्सचा नवीन पुडा सोबत घेऊन काही वेळ काम केले, प्रत्येक महिन्याची दोन तारीख आमच्या कंपनीची बिलिंगची, म्हणून जवळपास सारं काम काल रात्रीपर्यंत झालेलं, थोडी काही बिल्स बाकी होती त्यांना संध्याकाळपर्यंत पूर्ण करायचं ठरवलेलं. अचानक बेत बदलला, मनात आलं संध्याकाळी काही वेगळ काम करता येईल, म्हणुन अर्धा तास अधिक थांबून काम पूर्ण केलं. घरात गाणी ऐकत थोडी टंगळमंगळ केली तोवर कालच्या त्या अपूर्ण चित्राची आठवण आली, सगळ काही विसरून मी ते चित्र पूर्ण करण्यात हरवून गेलो, जेव्हा चित्र पूर्ण झालं तेव्हा घड्याळात दुपारचे तीन वाजले होते, आज वेळ काहीसा वेगाने धावतोय असं उगीच भासून गेलं.
सुधीरला फोन करून सांगितलं की त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे त्यानेही काम आटोपून येतो असं सांगितलं, संध्याकाळी चहाच्या निमित्ताने आमची मैफिल पुन्हा सजली, काका, राधिका मी आणि सुधीर. लॉकडाऊन मध्ये आमची मैत्री खूपच घट्ट झाली होती. याच मैफिलीत मी काढलेले राधिका आणि सुधीरचं चित्र त्यांना दिले, आजचा दिवस मला तस खास काहीच करता आलं नव्हतं, आज जेवण सुधीरच्या घरी होणार असल्याने काही काम नव्हतंच. काही वेळ बातम्या पाहत थंड उसासे घेतले, यादरम्यान आमच्या सोसायटीमधल्या काही सदस्यांसोबत माझं बोलणं झालं, एकत्रित येऊन आम्ही निर्णय घेतला की सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आम्ही संपूर्ण इमारत लॉकडाऊन ठेवायची असे ठरले. या परिस्थितीत इमारतीत सभा घेणं म्हणजे संचारबंदीचं उल्लंघन, त्यामुळे आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन ही बातमी दिली, आपत्कालीन कर्मचाऱ्यांची वेगळी यादी बनवून ती आमच्या इमारतीच्या पहारेकऱ्याकडे आणि कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली.
सकाळपासून काहीतरी काम झालं होतं. अगदी कडकडून भूक लागली होती. सुधीरच्या घरी पोहोचलो, आणि आधी दोघांनी जेवणावर ताव मारला. सकाळी बराच वेळ झोप घेतली असल्याने रात्री तशी झोप येण्याची शक्यता कमीच... दोघांनी रात्र जागवायचे ठरवले. आम्हाला दोघांनाही क्रिकेटचे भरपूर वेड. सुधीर आणि मी बर्याचदा एकत्र स्टेडियममध्ये जाऊनही क्रिकेटचा आस्वाद घ्यायचो, आणि आताही आम्ही तेच करणार होतो, आमच्याकडे 2011 च्या विश्वचषकाच्या काही हायलाईटस होत्या, आम्ही भारत पाक उपांत्य सामना पुन्हा पाहिला, सचिन तेंडुलकरची. 85 धावांची अप्रतिम खेळी, त्यानंतर भारतीय गोलंदाजांचा यशस्वी मारा, मिसबाह ची. झुंजार अर्धशतकी खेळी, विराट कोहलीने घेतलेला शेवटचा झेल, भारताचा दिमाखदार अंतिम सामन्यातला प्रवेश, बघता बघता दोन वाजलेच. अंतिम सामना दुसर्या दिवशीसाठी राखून ठेऊन आम्ही दोघेही थोड्या गप्पांत रंगलो, क्रिकेटच्याच... बोलता बोलता झोप केव्हा लागली हे समजलेच नाही