लॉकडाऊन दिवस 5
लॉकडाऊन दिवस 5


प्रिय डायरी,
काल जास्त काम न केल्याने तशी लवकरच जाग आली, आठ सव्वा आठ झाले असावेत, सगळं आटोपून चहा घेतच होतो तितक्यात अध्यक्ष साहेबांनी दरवाजावर टकटक केलं, त्यांच्यासोबत एक पोलिस अधिकारीदेखील होते, चहा वगैरे झाल्यावर मला त्यांचा परिचय मिळाला, आमच्या विभागातल्या तालुक्याच्या पोलिस ठाण्यात ते इन्स्पेक्टर आहेत असे कळले, कसे काय येणे केलेत? असा सावध प्रश्न मी विचारला, त्यावर ते म्हणाले की सध्या आम्ही प्रत्येक विभागाला जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ नियोजित करून देत आहोत, तसे एक परिपत्रक त्यांनी मला दिले आणि एक ओळखपत्रही दिले, आतापासून आमच्या इमारतीखाली एक पोलिस तैनात झाले होते ते आमच्या ठरलेल्या नियोजित वेळेशिवाय, आणि त्या ओळखपत्राशिवाय कोणालाच बाहेर सोडणार नव्हते. एकावेळी एकाच व्यक्तीने जाऊन सर्वांचे सामान आणावे अशी ती योजना होती, अर्थात आम्ही त्याचे स्वागत केले होते.
ही सर्व मंडळी गेल्यावर मी लॅपटॉप उघडला आणि कंपनीची बिल्स क्लोज करायला घेतली, मेल मध्ये रिमाईंडर वाजत होता, ओपन केल्यावर समजले की माझ्या ऑडिटरसोबत माझी विडीओ काँन्फरन्स होती, लगेचच सुरूही झाली. त्यांच्या मदतीने उरल्यासुरल्या बिलांचे धागेदोरे मी जुळवले आणि मोहिम फत्ते केली, काँन्फरन्स संपल्यावर मी जोरात आळस दिला, अगदी पानिपत जिंकल्याचे समाधान घड्याळाकडे नजर गेली तर दोन वाजलेले होते. वेफर्सचं एक पाकीट फोडलं आणि बातम्या लावल्या, कोरोनाची आकडेवारी हजारीपार दिसली. काहीश्या निराशेने मी बातम्या बंद करून लॅपटॉप मध्येच एक चित्रपट पाहायला सुरुवात केली, चित्रपट होता राजेश खन्ना यांचा 1969 सालचा आराधना.... एका आईने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी केलेला अविरत त्याग, अन त्या त्यागाचे चित्रण शक्ति सामंता यांनी सचिन भौमिक यांच्या संवादांतून उत्कृष्टरीत्या मांडले होते, जवळपास अडीच तास मी भान विसरून आराधनाशी एकरूप झालो होतो. चित्रपट संपताना मात्र डोळे भरून आले, आईची आठवण आली, लगेच फोनही केला तिला.... हालहवाल, ख्यालीखुशाली नंतर मग काळजी घे, बाहेर जाऊ नकोस असं सांगत आईने फोन ठेवला.
साडे सहा झाले...सुधीरला फोन करून सांगितले की मी त्याच्याकडे आज रात्रीचं जेवण करणार आहे, त्यावर त्याने सांगितले की तोच रात्री माझ्याकडे जेवायला येणार होता, हसेच झाले असते दोघांचे. मग आमचे एकत्र येऊन जेवण बनवायचे ठरले, चपातीसोबत तोंडी लावायला आम्ही चण्याच्या पीठाची पोळी बनवली, रात्री उशिरापर्यंत आमच्या गप्पा सुरू राहिल्या, वेळेचं भान दोघांनाही नव्हतं. मनावर, शरीरावर कोणताच बाह्य ताण अस्तित्वात नव्हता, उरली होती ती फक्त आपुलकी आपल्या माणसांसाठीची.... या वाक्यानंतर मी म्हणालो " असं लॉकडाऊन वर्षातून एक-दोनदा तरी घ्यायला पाहिजे" ह्यावर दोघेही हसू लागलो, रात्रीचा उत्तर प्रहर सुरू झाला होता, अश्या नीरव शांततेतल्या अंधारातही अविरत धावणाऱ्या मुंबईच्या गोठलेल्या रुपाचे आम्ही कदाचित दोघेच साक्षीदार होतो.