लॉकडाऊन दिवस 3
लॉकडाऊन दिवस 3


प्रिय डायरी,
काल रात्रीपर्यंत घराकडे तसं लक्ष दिलंच नव्हतं, दहावी नंतर कॉलेज होस्टेल तिथून मुंबईत डिग्री कॉलेज आणि आता मुंबईतच नोकरी, अधूनमधून घरी जाणेयेणे असायचे. पण या सहा वर्षाच्या धावपळीत, माझ्या जुन्या आठवणी, शाळेपासूनची प्रमाणपत्रे, माझ्या कविता अन सगळ्याच गोष्टी कोणत्या ना कोणत्या गाठोड्यात धूळ खात पडून होत्या. आज सकाळी उठताना विचार केला की या गाठोड्यांवरची धूळ आठवणींनी गदगद्लेल्या एका फुंकरीने दूर करावी. दहा वाजेपर्यंत आमचे चहादि संस्कार आटोपले, घरून फोन येऊन गेला होता. मी माझ्या कामाला लागलो.
एकच कपाट त्यातचं सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. सुरुवात कुठून करायची? हा प्रश्न मला पडला होता. एक लाल फितीने गुंडाळलेलं बंडल दिसलं, कुतूहलाने मी ते बाहेर ओढलं, काही जुने कागद होते, माझ्या शाळेच्या वेळचे, आमच्या शाळेत निबंध स्पर्धांमध्ये नंतर प्रत्येकाला त्याचे लिखाण परत करण्याची प्रथा होती. बाकी कुणाचे माहीत नाही पण मी माझे सर्व निबंध जपून ठेवलेले आहेत, आज ते पुन्हा नजरेस पडले, काही निवडक निबंध वाचत मी त्यांना पुन्हा एकत्र करून त्या लाल फितीने बांधले. कपाटात मला एक जाडजूड वही सापडली, गणितासाठी मी अश्या वह्या वापरायचो, वही हातात घेतो तोच ती एका बाजूला कलंडली गेली अन त्यातून बरेचसे जुने कागद, फोटो खाली पसरले. एका हाताने वही सावरत मी ते सर्व जमा करून न्याहाळू लागलो. माझे जुने ग्रुपफोटो होते त्यात... अगदी तिसरीपासून दहावीपर्यंत... बर्याच आठवणी ताज्या झाल्या. ते सर्व फोटो आणि बाकी निबंधाचे कागद त्या वहीत ठेवले, आणि कपाटातील धूळ साफ करून घेतली. दुपारी फक्त पोह्यांचा साधासुधा बेत होता, त्यानंतर पुन्हा या आठवणींच्या गावात शिरलो. ही गाठोडी कपाटात पुन्हा ठेवताना मला माझी इंजिनिअरींग पर्यंतची सर्टिफिकेट्स काही ऑडिओ टेप मिळाले. यापेक्षाही खास एक गोष्ट मला मिळाली ती म्हणजे, माझ्या दहावीच्या वर्गातला एक करार, आमची 50 जणांची बॅच, दहावीच्या शेवटच्या दिवशी आम्ही एका पेपरवर सगळ्यांची नावे फोननंबरसकट लिहून एकमेकांना कधीही विसरणार नाही अस वचन दिलं होतं.
सगळं कपाट नीट लावून मी तो कराराचा पेपर घेऊन इमारतीच्या बाल्कनीत आलो, सूर्यरथ पश्चिमेकडे कलत होता, त्या पानावरच्या एकेक नंबरवर मी फोन केले, काही लागले काही नाही लागले. सर्वांशी जवळपास आठ वाजेपर्यंत बोलत होतो एकटाच.... नंतर घरी येऊन साधी अंड्याची बुर्जी आणि चपाती बनवली, फार समाधान होत आज मनाला, जिवलग भेटले होते, बोलले होते. बाकी काही विशेष करायला नाही जमले, जेवण उरकल्यानंतर शनिवारची ठरलेली पत्त्यांची मैफिल सजली, शनिवारी तशी सर्वांना सुटी, त्यामुळे आज वर्क फ्रॉम होमही बंदच.. रात्री दीड-दोन पर्यंत मेंढीकोट रंगले. शेवटी तीन वाजता आम्हा निशाचरांच्या दिवसाची सांगता झाली.
लॉकडाऊन च्या तिसर्या दिवशी माझी ओळख पुन्हा त्या साथीदारांशी झाली जे आयुष्याच्या पाऊलवाटी कधी माझे आयुष्य होते. आजच्या दिवसाला मी पुन्हा त्यांच्यासह सजवलं. अश्याप्रकारे आजचा मला हव्याहव्याश्या वाटणार्या बंदीवासाचा अजून एक दिवस कमी झाला.