लॉकडाऊन दिवस 2
लॉकडाऊन दिवस 2


प्रिय डायरी,
काल रात्री उशिरा झोपल्यानंतर आज सकाळही उशीराच झाली, नेहमीप्रमाणे सकाळची चर्या आटोपून वाफाळता चहा चा कप समोर ठेवत लॅपटॉप उघडला, अपेक्षेप्रमाणे प्रमुख बातम्या कोरोनाच्याच होत्या. ती आकडेवारी नजरेखालून घालत मेल ओपन केला, आमच्या क्लोजिंगच्या कामाची भलीमोठी यादी दिसली, वर्षभरात कंपनीने केलेली करोडो रुपयांची उलाढाल....
एक एक ऑर्डर अगदी काळजीपूर्वक क्लोज करत बसलो, त्या गडबडीत चहा म्हणजे दाढी करताना गढूळ झालेल्या पाण्या सारखा झाला. काम संपवण्याच्या नादात चहा पिण्याचं भानचं राहीलं नाही. अर्धेअधिक काम आटोपून पुन्हा चहा उकळत ठेवला, अन मी आपला विचारात गुंग, उकळणाऱ्या चहाच्या पातेल्यासोबत केलेल्या खोडकर आवाजाने माझं ध्यान सुटलं. चहा घेत घेत मित्रांना फोन केला, आलोच.... इतकंच लहानसं पण आश्वासक उत्तर देऊन मित्राने फोन ठेवला. मला काहीस वेगळं वाटलं पण त्याकडे दुर्लक्ष करून मी पुन्हा लॅपटॉप मध्ये गुंग झालो. बराच वेळ झाला अजून मित्र आला नाही मला राहावले नाही आणि मी पुन्हा फोन हातात घेतला, आणि स्वतः मित्राच्या घरी गेलो, मित्र शेजार्यांच्या घरी बसला होता, तिथले वातावरण काहीसे गंभीर वाटत होते.
हे शेजारचे म्हणजे माझ्या मित्राचे प्रेमप्रकरण, सावंतांची मुलगी म्हणजे माझी होणारी वहिनी, माझ्या मित्राच्या आणि तिच्या दोघांच्याही घरी माहीत असल्याने काही सावळागोंधळ होणार नव्हता, राधिकाला (सावंत काकांची मुलगी) गेले तीन दिवस कोरडा खोकला सुरू होता, काका आणि सुधीर (माझा मित्र) या गोष्टीमुळे कमालीचे हैराण झाले होते. आणि होणारच मुंबई, महाराष्ट्रासह गेल्या तीन महिन्यात झालेली जगाची दैन्यावस्था समोर दिसत होतीच. मी अगोदर काकांना धीर दिला आमच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला, त्यांनी मला ताबडतोब येण्यास सुचवले. मी, सुधीर, काका आम्ही राधिकाला घेऊन लागलीच निघालो माझ्या गाडीतून... वाटेतल्या पोलिसांना तोंड देत देत पोहोचलो, डॉक्टरांकडे अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे विशेष त्रास झाला नाही. डॉक्टरांनी ब्लड टेस्ट करायला सांगितले. सहाजिकच आम्ही तिघेही घाबरलो, तरीही सुधीरने चाचपत विचारले " काही जास्त सिरियस आहे का?" डॉक्टर काहीसे गंभीर होत म्हणाले, नाही मला तरी वाटत नाही, पण... आपल्याला एक शाश्वती म्हणून करू.
ब्लड टेस्ट साठी राधिकाचं ब्लड सँपल देऊन आम्ही परतलो, कोणालाच काही समजत नव्हते, राधिका तर आल्या आल्या झोपून गेली होती. सुधीर माझ्या मागे माझ्या घरी येऊन बसला. त्याचेही कशात ध्यान नाही, मी त्याला बर्यापैकी धीर दिला. रीपोर्ट चार तासांत येणार होते काही दिवसांपूर्वीच काही खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी उपलब्ध झाली होती त्यापैकी चेंबूर मधल्या एका लॅब मध्ये आम्ही जाऊन आलो होतो आणि त्यांच्याच फोन ची वाट पाहत बसलो होतो. मी फक्त काही शब्दांनी सुधीरला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होतो, या गडबडीत दुपार टळून गेली होती. साधारण तीन च्या आसपास लॅब मधून फोन आला, त्यांनी रीपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. आमच्या दोघांच्या जीवात जीव आला, आम्ही लगेच सावंत काकांना सांगितलं तेव्हा ते ही सुखावले. सुधीर च्या चेहर्यावरची कळी चांगलीच खुललेली त्यानेच माझ्या घरी येऊन चहा गरम करत ठेवला मी तोपर्यंत गावी आईला फोन केला.
एकत्र चहा झाला, त्याच सायंकाळच्या सोनेरी किरणांत, सुधीरने भावनेच्या ओघात येऊन त्याची पूर्ण प्रेमकथा मला सांगितली, तोवर मागे घड्याळाने सातचे टोले दिले, आणि आम्हाला आमचं कंपनीचं अपूर्ण राहिलेलं क्लोजिंगचं काम आठवलं. आम्ही एकत्र माझ्या घरीच काम करायचं ठरवलं. सुधीर लॅपटॉप आणायला गेला, आणि मी विचार करत राहिलो, की या लॉकडाऊन चा संपूर्ण मुंबईवर किंवा महाराष्ट्रावर काय परिणाम होत आहे हे जरी प्रत्यक्षपणे दिसत नसले तरी या लॉकडाऊनमुळे काही कामात माणसांपासून वेगळी झालेली माणसे पुन्हा माणसांत मिसळायला लागली होती. सावंत काका जवळच्याच डेअरीमध्ये कामाला होते, येताना त्यांनी आमच्यासाठी 10-12 पाव आणले, आम्हीही रात्रीसाठी मिसळ पाव चा बेत पक्का केला. नऊ साडे नऊ पर्यंत सार्या ऑर्डर्स क्लोज करून झाल्या होत्या. राधिकाने गरमागरम मिसळ पावांसोबत सजवली होती. मी तर किती दिवसांपूर्वी असा सर्वांसोबत जेवत होतो काही आठवत नाही, पण आजचा दिवस खरंच खूप सुंदर अनुभव देऊन गेला, अगदी धावपळ, मैत्री, शेजारधर्म, आपुलकी, नात्यांची ओढ आणि मागे उरून कधी ना सरणाऱ्या आठवणींसोबत आजचा दिवस संपला...