Sakharam Aachrekar

Others

4.8  

Sakharam Aachrekar

Others

लॉकडाऊन - दिवस 13

लॉकडाऊन - दिवस 13

2 mins
302


प्रिय डायरी,


काल बॉसने केलेला फोन अद्याप स्वप्नवत वाटत होता, सकाळी उठून सगळं आवरायचं, नंतर चहाच्या घोटांसोबत लॅपटॉपशी गप्पा मारायच्या, आणि सगळं आटोपून 10 ला काम सुरू करायचं असा दिनक्रम अंगवळणी पडला होता. लॉकडाऊन वाढणार अशी अस्पष्ट कुजबुज कानी पडत होती. आज 13 दिवस मुंबईसह संपूर्ण भारत देश कोरोनाच्या अदृश्य भीतीच्या सावटाखाली वावरत होता.


आज एका नामांकित एनजीओमार्फत आमच्या इमारतीच्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, दोन दिवसांत रिपोर्ट देतो असे त्यांनी आश्वस्त केले. खायच्या अडगळीत सापडलेली कुरडयांची पिशवी सोडत मी तेल तापत ठेवले, काही कुरडया तळल्या. कामासोबत खाण्याचा आस्वाद असला की काम आणि वेळ दोन्ही पटापट संपतात आणि वर पोटाचाही अपमान होत नाही. दुपारी दोन वाजेपर्यंत मी काम उरकले, त्यानंतर कुंचला आणि रंगांचा संग एका कोऱ्या कागदाच्या श्वास पटलावर उभ्या आडव्या रेघा माझ्या हातून जन्म घेऊ लागल्या. असे दोन तीन कागद जिवंत करून मला झोप लागली, उठलो तो थेट फोनचा आवाज ऐकून.


आईचा फोन होता, उचलल्यावर सकाळपासून फोन केला नाही म्हणून आईने बरेच कान टोचले, कशीबशी मी आईची समजूत काढली. नंतर कंपनी पोर्टलवर आयोजित एका डिजिटल मार्केटिंगच्या वेबिनारला हजेरी लावायची होती, मी सज्ज झालो. महत्त्वाचे मुद्दे वेगळे लिहून घेतले त्याचे सादरीकरण होणार होते. संध्याकाळ ठरल्याप्रमाणे सुधीरसोबत जाणार हे ठरलेलं होतं. रात्रीसाठी दोघांच्याही जिभेला पाणी सुटत होतं. शेवटी बटाटावडा बनवायचा असा बेत निश्चित झाला, गावी दोघांनीही एसटी महामंडळाच्या उपाहारगृहात काम केल्याने तसं जेवण बनवण्यात आम्हाला कधी त्रास झाला नाही. सामानाची जमवाजमव झाली, सुदैवाने सगळं काही आमच्याकडे होतं. काकांना निरोप दिला की त्यांनी रात्रीचं जेवण आमच्या घरी आमच्यासोबत कराव. त्यांनीही मान्यता दिली.


काही आंबटगोड गप्पा, थोड्या दंग थट्टा आणि बटाटावड्याची मेजवानी या लॉकडाऊनमधली ही सर्वांत रंगतदार मैफिल होती. आम्ही अगदी फोटोसेशनपर्यंत सगळ्या औपचारिकता पूर्ण करून मगच बटाटावड्यांचा फडशा पाडला. रात्री कितीतरी वेळ त्या हवेत बटाटावड्यांचा परिवास भरून राहिला होता.


Rate this content
Log in