Sakharam Aachrekar

Others

4.9  

Sakharam Aachrekar

Others

लॉकडाऊन दिवस 12

लॉकडाऊन दिवस 12

2 mins
306


प्रिय डायरी,


एकांताच्या कृष्णविवराप्रमाणे भासणाऱ्या या जगात प्रेम आहे हे जाणवत होतं. आज सकाळपासूनच आम्ही सोसायटीच्या सदस्यांनी मिळून बिल्डिंग सॅनिटाईझेशनला सुरुवात केली. जिन्यावरचे रेलिंग्स, लिफ्टचे दरवाजे, निर्जंतुक केले, नंतर संपूर्ण इमारत पाण्याने स्वच्छ केली. हा सारा प्रकार दुपार पर्यंत संपला. त्यानंतर आमच चहापान उरकलं, मी आणि सुधीर आम्ही नाश्त्यासह काही ना काही खायचो त्यामुळे दुपारची जेवणं हमखास बुडायची. चहा नंतर आम्ही एक वेब कॉन्फरन्समध्ये गुंतलो, काही वेळ काम केलं, काकांनी रात्री गाण्याची मैफिल पक्की सांगितल्याने रात्रीच्या जेवणाची खटपट करायची नव्हती. जास्तीत जास्त काम आटोपून आम्ही इमारतीच्या गच्चीवर आलो, एव्हाना मुंबईत कोरोनाने 500 ची आकडेवारी गाठली होती, थोडावेळ संध्याकाळचा देखावा अनुभवून आम्ही उतरलो.


रात्रीसाठी अजून वेळ होता, मी घरी येऊन पुन्हा लॅपटॉप समोर रमण्याचा प्रयत्न केला, पण काम करणे जमले नाही, शेवटी यू ट्यूब वर द बर्निंग ट्रेन चित्रपट लावला, धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना अश्या त्या वेळी गाजलेल्या जोडगोळीने अभिनय केलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल दाखवू शकला नव्हता, पण का कोणास ठाऊक पाहावासा वाटला... थोड्या वेळात मूड बदलला, मी लॅपटॉप बंद केला, आणि गावी घरी फोन केला. आज अगदी विस्मरणात गेलेल्या एकेक व्यक्तीला आठवणीने फोन केला, वेळ सहज कलत होता, कधी 8 वाजले समजलंच नाही, सुधीरने दरवाजावर टकटक केलं आणि मला येण्याचा इशारा केला. काकांकडे लवकर जेवण्याचा रिवाज आहे, दुपारी जेवण नसल्याने भूक लागली होतीच, त्या सुग्रास अन्नावर आम्ही दोघांनी यथेच्छ ताव मारला.


जेवल्यानंतर आमच्या मैफिलीची मांडामांड सुरू झाली, काका तसे वयस्कर असले तरी विवादी व्यक्तिमत्त्वाचे होते, आणि विद्वानही होते, जुन्या बहुतेक गाण्यांच्या गायक, संगीतकारापासून कवींपर्यंत सारी माहिती त्यांच्या ध्यानी असायची, आम्ही गाणी म्हटल्यावर त्या चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से काका आवर्जून सांगायचे. मैफिल रंगली, आज मी सुधीर आणि राधिका तिघे होतो, आणि काका एकटे पण तरीही सामन्याचं पारडं आमच्या बाजूला अंशतः ही कलत नव्हतं. शेवटी साडे अकराला आम्ही माघार घेतली, दोघे घरी आलो, मी दरवाजा उघडला की बॉस चा फोन...

इतक्या रात्री बॉस चा फोन आलेला बघून विचित्र वाटलं, फोन उचलल्यावर बॉसने अगदी आस्थेने चौकशी केली, मला फारच वेगळं वाटलं, कारण हा तोच माणूस होता ज्याला आम्ही सगळे जण रोज शिव्या घालायचो, आज तोच माणूस सगळ्यांची एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे विचारपूस करत होता.


आज एका नवीन वास्तवदर्शी विधानाची ओळख झाली होती, या घडीला औषधाने नव्हे तर एका रोगाने तंत्रज्ञानाने जवळ आलेल्या जगातल्या दुरावलेल्या माणसाला एकत्र आणण्याचे काम केले होते.....


Rate this content
Log in