लॉकडाऊन दिवस 11
लॉकडाऊन दिवस 11
प्रिय डायरी,
एकांतात रमलेल्या एखाद्या निर्वासित राजाप्रमाणे माझी रोजची सकाळ व्हायची, अन असंख्य निरुत्तर राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात रात्र जायची, लॉकडाऊन संपण्याचे काऊंटडाऊन सुरू झाले होते, पंतप्रधानांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नव्हती, पण तरीही 14 तारखेला लॉकडाऊन संपावे असं वाटत होत.
दिवसागणिक आठवणी काळजात पक्क घर करू पाहत होत्या, अनावधानाने या रोगामुळे का होईना तारुण्यातले काही दिवस मनमोकळे आपल्या कुटुंबासह घालवता आले. मागचे दहाही दिवस अगदी स्वप्नवत होते, आज संध्याकाळी या आठवणीत आणखी एक भर पडणार होती, ती म्हणजे सन्माननीय पंतप्रधानांनी घातलेल्या दीपोत्सवाच्या आवाहनाची. आज देशातील जनता त्यांच ऐकणार की नाही याकडे माझे लक्ष होते, त्याला अद्याप वेळ होता, सकाळी चहा सोबत ब्रेड-बटर ची न्याहारी सज्ज झाली, जवळपास 11 वाजत आले होते. बिल्डिंग बंद होण्याची वेळ आली होती त्यामुळे खाली उतरणे म्हणजे आगळीक होती, म्हणून मी लॅपटॉप घेऊन सुधीरचे घर गाठले.
सुधीर अपेक्षेप्रमाणे कामात गुंतला होता, मला काही फाईल्स मेल करत सुधीरने मलाही त्यात गुंतवले. तसा आज रविवार, पण आम्ही सर्वांनी मिळून कामाची डेडलाईन शनिवारची पक्की केल्याने रविवारी देखील काम करणे अपरिहार्य होते. तसा बाकी साथीदारांकडून मिळालेला प्रतिसाद अप्
रतिम असल्याने जास्त अडथळे येत नव्हते, थोड्या थोड्या वेळाने आम्ही बातम्यांमधून कोरोनाचे अपडेटस घेत होतो, संध्याकाळ होताच आम्ही दिव्यांची तयारी करून ठेवली, अगदी वातीपासून तेलापर्यंत सज्ज केले, आजचा हा कार्यभाग मला पहिल्यांदा काहीसा अतिशयोक्त वाटत होता, पण दुसर्या बाजूने मला तो कोणत्यातरी भविष्यवाणीप्रमाणे वाटला, 135 कोटी जनतेची आस्था आज रात्री एक होणार की नाही? शेवटी दैवाचा पटलावर रेखाटलेले सर्व डाव संपल्यावर पैलतीर गाठण्यासाठी आशा देवाकडूनच उरते, तीच आता करायची होती.
नऊ वाजले, आम्ही घरातले सगळे वीजेचे दिवे बंद केले, पणत्या पेटवल्या. आम्हीच नाही, तर जवळपास इमारतीतल्या सगळ्यांनीच दिवे, मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्च पेटवून या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. आयुष्यात प्रथमचं मी ही अहोरात्र धावणारी मुंबई थांबलेली पाहिलेली नव्हती, आणि अश्या बिकट परिस्थितीत एखादा संदेश ईतका काटेकोरपणे पाळणारी मुंबई देखील पहिल्यांदाच पाहत होतो. सगळीकडे गो कोरोना गो चे नारे लागत होते, काही लोकांनी नेहमीप्रमाणे फटाके फोडून या शांततामय आवाहनालाही गालबोट लावले, अखेर 9 मिनिटांच्या त्या भावपूर्ण लहरींतून, उदास झालेल्या वास्तवात आम्ही पुनःप्रवेश केला. रात्रीसाठी शेवाची भाजी आणि भाकरी असा बेत दोघांनी मिळून केला. जेवल्यानंतर जास्त टंगळमंगळ न करता त्या रात्रीला आम्ही देखील कवेत घेतले......