लॉकडाऊन दिवस 1
लॉकडाऊन दिवस 1


प्रिय डायरी,
सकाळी 06:00 ला जाग आली. जाग कसली? झोपलो होतोच कुठे... कंपनीमधून चार दिवसांअगोदरच वर्क फ्रॉम होम ची घोषणा केली असल्याने लॉकडाऊन च्या ही चार दिवस अगोदर मी घरात पडून होतो. शरीराची हालचाल नाही झोप येणार तरी कशी? कंपनी तर्फे काही काम नसायचं, पण आपले उद्योग कमी असतात का? काही काम नसतानाही आज बरच काम करायचंय अश्या अविर्भावात उठून अंघोळादी काम आटोपून घेतली.
आईबाबा गावी... कोकणात... मी नोकरीच्या निमित्ताने मुंबईत, भाड्याच्या खोलीत... शेजारी घरांत अजून काहीच जाग जाणवत नव्हती. गॅलरीत उभे राहून खाली रस्त्यावर एक नजर टाकली, संपूर्ण रस्ता एका सुस्तावलेल्या अजगराप्रमाणे भासत होता. काही हालचाल संवेदना नव्हत्याच त्यात. थोडक्यात देवपूजा आटोपली चहाला पुरेल इतकं जेमतेमच दूध फ्रीजमध्ये होत. चहा उकळत ठेवला आणि आरश्यासमोर आलो, मस्तपैकी राजेश खन्नासारखा हिप्पी केला, एक बट उजव्या भुवईवर अधांतरी ठेवली, आणि थंड मनाने चहा घेतला, आज चहा सोबत वर्तमानपत्र नव्हते त्यामुळे आपसूकच मनात बाकी विचार... गावी सगळे कसे असतील ,हा नवीन कोरोना, मग मनातल्या मनात चीन ची हेटाळणी, तोच फोन वाजला, आईचा होता. विचारपूस केली आईने, फार बर वाटल. आता दिवसभर काय करायचं? हा एकच विचार मनात होता.
अगोदर खाली जावून याव अस मनात आल, तोंडाला मास्क लावून, आणि हातात घडी घातलेली कापडी पिशवी घेऊन दूध आणायला निघालो, डेअरी तशी नजीकच अगदी हाकेच्या अंतरावर, तिथेही 2 पोलीस उभे अगदी संपूर्ण तयारीत. दूध घेऊन येताना शेजारच्या दोघांना फोन केला म्हणालो आज जेवण सोबतच करु, आमची मैत्री तशी शाळेपासूनची नशिबाने जॉब मिळाला तो ही एकाच कंपनीत!
ही 21 दिवसांची रजा म्हणजे आम्हाला पर्वणीच होती, आमच्या ठरवलेल्या नवीन उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी हा वेळ आम्हाला खूप मदत करणार होता, पण आजचा दिवस आम्ही जुन्या आठवणींना, जुन्या दिवसांना उजाळा देण्यात घालवायचा असे ठरवले. आज आमच्या आठवणींच्या नदीला वेळेने घातलेला बांध फुटणार होता.
आमच्या तिघांपैकी एक गिटार वादक, मी पियानो वाजवायचो आणि तिसरा नाही म्हणता साथीला होताच की! तबला नव्हता आमच्याकडे पण बेड होता ज्याचा तबला करता आला आम्हाला. आमच्या गाण्यांची मैफिल सुरू झाली. कधी मराठी कधी हिंदी, कधी नवीन कधी जुनी जवळपास दोन तास आम्ही बहुतेक गाणी आळवली. चार दिवसांनी केलेल मी हे पाहिल काम, थोडा नाश्ता बनवला कांदापोह्यांचा... थोड मीठ कमी झालंच पण आमच्या मैफिलीचा संग त्याला वेगळाच गंध देऊन गेला. पाहता पाहता दुपार झाली भूक अशी नव्हतीच त्यामुळे रात्री एकदाच जेवायचे ठरले, अधून मधून कंपनीतल्या मॅनेजर चे फोन यायचे त्याला फक्त " येस सर " इतकं इमानी चाकरमानी उत्तर जायचं आणि आमचं ध्यान पुन्हा आमच्या मैफिलीत धुंद व्हायचं.
काही वेळाने मी म्हणालो, किती छान आहे ना! वर्क फ्रॉम होम! थोडी दिरंगाई झाली तरी कामं इमाने इतबारे सुरू आहेतच की, आणि आपण एकमेकांच्या जवळही आहोत. खरच गरज आहे का यांना आपल्याला इच्छा नसताना कामावर बोलावण्याची? बोलणं मला स्वतःलाही काहीस बालसुलभ वाटलं पण तथ्य आहेच ना त्यात.... आमच्या रंगीत गप्पांवर पश्चिमेची किरणे हळुवार उतरत होती, अशी किरण कित्येक वर्षे आम्ही पाहिलीच नव्हती, आमच्या गॅलरीत तिघांना उभं राहण्याईतकी प्रशस्त जागा नसली तरी आम्ही तिघे त्या सूर्यास्ताचा भरपूर आनंद लुटत होतो, अचानक मित्राने गिटार काढला आणि पाडगावकरांच्या या "जन्मावर या जगण्यावर" गीताने सूर घेतले अगदी सूर्यबिंबाची किरणे लहरून लुप्त होईस्तोवर आम्ही गॅलरीत पडून होतो, आणि आता पुढचे एकवीस दिवस आम्हाला या सूर्यास्ताचा आनंद लुटता येणार होता, रात्रीची चाहूल लागत होती, घरून फोन येत होते. जेवण बनवायला घेतले बीट-कोथिंबीरीचे पराठे आणि सोबत सांबार खोबऱ्याची चटणी.... अगदी सोपा बेत.
साडे नऊ पर्यंत हे सगळं आटोपलं. आता तिघेही एकमेकांकडे पहात होतो, तिघांचीही मने मोकळी झाली होती, आज या मैफिलीत षडरिपूंची किल्मिष गळून पडली होती. बाहेरच जग आमच्यासाठी संवेदनाशून्य होतं. आणि आमच्या संवेदनाही बाहेरच्या जगापासून फार दूर आल्या होत्या.
दोघेही आपापल्या घरी गेले. घरं शेजारीचं पण दोघे घरी गेल्यावर मला कोण्या वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटले, हे तेच रोजचे जग होते जिथे मी वावरायचो. उगीचच डोळे पाणावले, आयुष्यात बरेच प्रश्न निरुत्तर राहिले होते, त्यातल्या काहींची उत्तरे मला आजच्या सूर्यास्तात सापडली होती, अन काहींची सापडणार होती ती आजच्या रात्रीच्या स्वप्नात.........