लॉकडाऊन डायरी #9
लॉकडाऊन डायरी #9
प्रिय डायरी,
आज नववा दिवस. २ एप्रिल. माझा वाढदिवस. मोठाच आनंदाचा दिवस माझ्यासाठी. काल रात्रीपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत होता. आणि अगदी आतापर्यंत चालू आहे. प्रत्येकालाच आपला वाढदिवस विशेष असतो, नाही! सकाळी उठल्यावर घरातल्या सगळ्यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. नाश्ता करून मग मी फोन वर आलेल्या sms ना उत्तरे दिली. आभार मानले.
दुपारी माझ्या आवडीची पिठाची वांगी किंवा मोदकाची आमटीही म्हणू शकता, मम्मीने बनवली. पोटभर जेवलो सगळे आणि एक जुना हिंदी सिनेमा पाहत बसलो. त्यानंतर थोडी झोप आणि मग उठून मस्त चहा!
एरवी मित्रमैत्रिणींनी घरी येऊन किंवा बाहेर भेटून वाढदिवस साजरा केला असता; परंतु आता lockdown मुळे सगळेच आपापल्या घरी आहेत आणि बाहेरही पडू शकत नाहीत. मलाही त्याची जाणीव आहे. वाढदिवस पुन्हा पुढच्या वर्षी येईल; पण आपला जीव नाही! सगळ्यांनी एकत्र येऊन संयमाने वागण्याची गरज आहे.
मी बिस्किटांचा केक बनवला आणि चक्क मस्त लागला तो! ह्या वाढदिवशी भेटवस्तू काही नको फक्त हे कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे हीच प्रार्थना!
माझ्या प्रिय डायरी, दिवसभरात खूपच मज्जा केली. आनंद वाटला. पण आता झोपलंही पाहिजे. शुभ रात्र!