लॉकडाऊन डायरी #21
लॉकडाऊन डायरी #21




प्रिय डायरी,
आज एकविसावा दिवस. पाहता पाहता एकवीस दिवस सरुन गेले. आता घरीच बसायची सवय होते की काय असे वाटायला लागले आहे. कारण आज पुन्हा ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढले गेले आहे.
आज जरा उठायला उशीर झाला. रात्री गर्मीने झोप लागत नाही आणि सकाळी जेव्हा लागते तेव्हा उशीर होतो. नाश्त्याला बटाट्याची चटणी बनवली होती. आणि सोबत फक्कड चहा. रव्याचे लाडू बनवायचे असा बेत दिसत होता; पण ते काही आज जमून आले नाही.
दुपारी शेवग्याच्या शेंगांचं कालवण होतं. काय सुरेख चव होती. त्यामुळे भूक अजूनच खवळली. चतकोर भाकर जास्तच खाल्ली मग! मग लॅपटॉप वर मस्त सिनेमा पाहिला. आणि थोडीशी झोप, जी आता सोबतीण झाली आहे या लॉकडाऊनच्या काळात वेळ घालवायला!
संध्याकाळी मांजरांशी थोडं खेळणं झालं. मग आम्ही दारापुढच्या रामफळाच्या झाडावर आलेलं भल्लमोट्ठ रामफळ काढलं. पण ते झेलण्याऐवजी खाली पडलं आणि हाती काही लागलं नाही. रात्री कोथिंबिरीच्या वड्यांनी लज्जत आणली. आता झोपायची वेळ. शुभ रात्री!