लॉकडाऊन डायरी #18
लॉकडाऊन डायरी #18


प्रिय डायरी,
आज अठरावा दिवस. मस्त झोप झाल्यामुळे आज मूड चांगला होता. मज्जा, विनोद करत नाश्ता झाला. आईने आज गाजराच्या हलव्याचा घाट घातला. मग तर काय धम्माल! लालचुटूक लांब आणि शिडशिडीत गाजरे किसून तुपात शिजवली आणि वरून काजू-बदाम-मनुके पेरलेले. असा हा चविष्ट, सुरेख गाजराचा हलवा खाऊन कंटाळा कुठच्या कुठे पळाला.
दुपारी अगं बाई अरेच्चा चित्रपट पहिला. खूप दिवसांतून परत टीव्हीला लागला होता. संपूर्ण चित्रपट पाहून संपणारच होता की सिग्नल गेला. पावसाचे ढग दाटून आले होते आणि मुसळधार पाऊस येऊनही गेला. सोबतीला सोसाट्याचा वारा! त्यात लाइट गेली. अचानक येऊन पावसाने धावपळ उडवली. पण गरमागरम चहा मिळाला आणि जोडीला पाऊस!
आज पुन्हा बातमी आली की लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसा अंदाज होताच पण एकंदरीत हे करण्याची परिस्थिती आहेच. रात्री मसाले भात आणि मटकीची रस्सा होता. टीव्हीवरचे कार्यक्रम पाहता पाहता जेवण झालं. आता झोप येत आहे. माझ्या प्रिय डायरी, शुभ रात्री!