लॉकडाऊन डायरी #1
लॉकडाऊन डायरी #1


प्रिय डायरी,
पहिला दिवस. शाळेचा पहिला दिवस रडवणारा; पण आयुष्यभराची तरतूद करणारा, कामाचा पहिला दिवस टेन्शन देणारा; पण सहनशक्ती देणारा. असा कुठलाही पहिला दिवस नव्हता हा. हा होता सारा हिंदुस्थान लॉक डाऊन होण्याचा पहिला दिवस. कोरोना व्हायरस पासून बचावासाठी साऱ्या राष्ट्राने घेतलेल्या पावित्र्याचा! देशाने पुकारलेल्या युध्दाचा!
नाही,नाही. हे युद्ध सीमेवर जाऊन लढण्याचे नाही, तर घरात थांबून झुंज देण्याचे. व्हायरस पासून देशाची सुटका व्हावी म्हणून केलेला हा उपाय आहे. सबंध जनता घरात सुरक्षित राहावी व संचार बंदी लागू करावी, असा हा उपाय आहे. याने व्हायरस चा प्रभाव कमी होईल.
आज २५ मार्च. आज गुढीपाडवा. विजयाचा सण. पण तोही जरासा निरुत्साही पणाने साजरा झाला. घरात बंदिस्त असलेल्या जनतेने आपापल्या परीने सण साजरा केला. पण हाच संयम ठेवला तर खरेच कोरोना व्हायरस वर मात करून विजयाची गुढी आपण उभारू शकू.
आज दिवसाची सुरुवात जरा उशिराने झाली. आईने अंगणात छानशी रांगोळी काढली. खीर, चपाती नी भरल्या वांग्याची झणझणीत भाजी खाऊन पोटोबा खुश झाला. दुपारच्या वामकुक्षीची आताशा सवय झाली आहे. दैनंदिन जीवन सुरळीत चालू झाल्यावर काय होईल काय माहित..! साथीला फोन बाबा आहेतच. YouTube वरचे व्हिडिओज पाहून जरा टाईमपास केला.
तेवढ्यात चहाची वेळ झालेलीच. फक्कड असा चहा घेऊन जरा मोकळ्या वातावरण जावं म्हटलं, म्हणून ओट्यावर आले तर पाऊसाची टपटप चालू झाली. पाऊसाने पुढचा पावसाळा आला तरी अजून दडी मारलेली नाही बरं का! मातीच्या त्या अमृतमय सुगंधाने मनाचा ठाव घेतला.
थोडासा व्यायाम करून घेतला. तेवढंच बरं आरोग्याला. अण्णांना नी मला भूक लागलीच होती म्हणून २ मिनिटात तयार न होणारी मॅगी बनवली. रात्रीच जेवण जरा उशिरा झालं. खमंग असा मसालेभात खाऊन पोट नी मन तृप्त झाले. बिछान्यावर पडता पडता पुन्हा आजच्या परिस्थिती वर गप्पा रंगल्या नि झोप केव्हा लागली कळलेच नाही!