लग्न आणि वाढत्या अपेक्षा
लग्न आणि वाढत्या अपेक्षा


निलू इंजिनीरिंग पूर्ण करून एका चांगल्या कंपनीत काम करत होती... आता जॉब च झालं म्हणल्यावर आई बाबा तिला लग्नाचं मनावर घ्यायला सांगत होत्या.. निलू दररोजच्या लग्नाच्या टॉपिकला कंटाळली होती.. काय लग्न लग्न करतात यार हे... आता कुठे जॉब लागलंय जगू द्या ना आनंदाने... लगेच निघाले पाठवायला...स्वतःचीच बडबडत तिची ऑफिसला जायची तयारी चालू होती...आई तिला समझावत होती की बाळा लग्न वेळेवर झालं की कसं पुढच्या सगळ्या गोष्टी वेळेवर होतात नाहीतर सगळं गणित बिघडत ग...
निलू आईला म्हणाली.. ठीक आहे पण मुलगा बघायला आल्यावर मला त्याला काही प्रश्न विचारायचे आहेत जर समाधानकारक उत्तरे मिळाली तरच मी लग्न करेन..
निलूच्या आईने मान हलवली... मग करूया ना मुलगा बघायला सुरु?
हो ग आई.. मला चल उशीर होतंय निघते मी.. म्हणत निलू घराबाहेर पडली..
निलूची आई बाबांना म्हणाली तो देशपांडे च स्थळ आलेलं ना त्यांना ह्या रविवारी येतंय का बघायला विचारा ना..
बाबा म्हणाले.. म्हणजे तू निलूकडून मुलगा बघायला होकार मिळवलेला दिसतोय..
आई म्हणाली..मग काय हो..आमच्यावेळी कोणी विचारायचं ही नाही...कोण येणार काय काही माहीत नसायचं...आताच्या मुली म्हणजे..ना विचारता काही करणं म्हणजे डोक्याला ताप आहेत नुसत्या..
रविवारचा दिवस उजाडला...देशपांडे कुटुंब आलं निलूला बघायला...चहा, प्राथमिक गप्पा झाल्यावर निलू आणि मुलगा त्याच नाव राहुल होत त्यांना एकांतात बोलायला terrace वर पाठवलं..
गप्पांची सुरुवात कॉलेज, शाळा, जॉब ह्या गोष्टींपासून झालं..
राहुल: मघाशी माझी आई बोलल्याप्रमाणे तुला लग्नानंतर जॉब करावा लागेल हां..माझ्या घरचं लोन आहे...आणि सगळं नीट चालू राहायचं असेल तर दोघांनाही जॉब करावा लागेल.
निलू: मला जॉब करायला काहीच प्रॉब्लेम नाहीय..उलट आवडेलच मला..
राहुल: स्वयंपाक येतो ना तुला..मला बाहेरच नाही चालत..मी ऑफिस ला दररोज टिफिन घेऊन जातो..
निलू: मला येत पण तुला जॉब करणारी बायको हवी आहे म्हणून विचारते तुलाही येतच असेल ना... कारण मला ऑफिस मधून कधी कधी मिटींग्स, कॉल्स ह्यामुळे उशीर होऊ शकतं..तर तू वाट बघत बसणार माझी की थोड फार स्वयंपाक बनवून ठेवणार..
राहुल: (अभिमानाने) माझ्या आईने कधी चहाही नाही बनवू दिला..मला नाही येत स्वयंपाक..
निलू: तुझी बायकोला मदत करण्यासाठी शिकायची तयारी आहे का?.. पूर्ण स्वयंपाक म्हणत नाहीय..थोडी फार मदत तर नक्कीच करू शकतो ना तू..
राहुल: नाही..मला जमेल असं वाटत नाही..ऑफिस मध्ये खूप वर्क लोड असतो मला..
निलू: (मनात) मी काही गोट्या खेळत नाही ऑफिस मध्ये..
लग्न झाल्यावर मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे माझ्या आई बाबांना भावनिक आधार द्यावा लागला तर तुझी परवानगी असेल ना..म्हणजे ते आजारी असताना वगैरे..ह्या वयात एकटेपणा जाणवू शकतो..
राहुल: मला वाटत लग्न झाल्यावर तू माहेरी कमी संबंध ठेवावे व आपल्या घराला सर्वस्व मानावं..माझ्या आईवडिलांची सेवा करावी..
निलू: तुझ्या आई वडिलांची तर मी करेनच पण माझ्या आई वडिलांचे काय..उद्या दोघांपैकी कोणी एकजणांसोबत काही घडलं तर दुसऱ्याला एकटं सोडायचं..
राहुल: त्यांनी तशी व्यवस्था करून ठेवली असेल ना..
निलू: प्रश्न आर्थिक आधाराचा नाहीच आहे..भावनिक आधाराचा आहे..
राहुल: लग्नानंतर तुला पाहुणचार, सण वार जसं जमेल तसं कराव लागेल.
निलू: सण वार असलं सगळं करण्यात मला इंटरेस्ट नाहीय..पाहुणचार वगैरेच बघू नंतर..
मी ऐकलं तुमचा एक बीअचके चा फ्लॅट आहे..काही प्लॅन आहे का 2 बीअचके किंवा त्यापेक्षा मोठा घर घ्यायच?
राहुल: सध्यातरी नाही..असलेलं लोन आधी फेडून मग विचार करता येईल..
तू एकटी आहेस तर आई बाबांची सगळी मालमत्ता नंतर तुझ्याच नावावर होणार ना?
निलू: तो त्यांचा प्रश्न आहे..मी स्वतःच्या पायावर उभी आहे त्यामुळे माझी काही अपेक्षा नाहीय त्यांच्याकडून..
बापरे..किती त्या अपेक्षा...ह्यांचं लग्न होईल असं वाटतंय आणि झालंच तर टिकेल असतरी वाटतंय का..
या अशा अपेक्षा ऐकून, अनुभवून हसावे की रडावे हा प्रश्न अनेकांना पडतो. अशा अपेक्षा ठेवताना, त्यांना स्वतःलाही एकदा माणूस म्हणून तपासून बघायला हवे.. अशा अपेक्षा व्यक्त करताना आपणही तेवढ्या समर्थ आहोत का, हेही बघायला हवे.
एकीकडे भरमसाठ पगार असलेलाच नवरा हवा असणाऱ्या मुलीकडे स्वतःचे उत्पन्नाचे काहीही साधन नसते आणि तरीही तिला ते त्याच्याकडून अपेक्षित असते. आर्थिक बाबतीत आजच्या मुलींना कोणतीही तडजोड करायची नसते किंबहुना कोणतीच रिस्क घ्यायची नसते. काही लोक मुद्दाम एकुलत्या एक मुलीचे स्थळ शोधत असतात. मुलीच्या आई-वडिलांनंतर त्यांची मालमत्ता आपल्याच मुलाची होईल, हा त्यामागील धूर्त हेतू असतो. स्पष्ट आणि स्वतःचे मत मांडणारी मुलगी नको असते. स्वतःची नोकरी सांभाळून घर सांभाळणारीच मुलगी हवी असते.
लग्न ही अत्यंत नाजूक, सुंदर आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट असते. लग्नामुळे दोन मनांसह दोन कुटुंबांची सुंदर नात्यामध्ये बांधणी होत असते. ही नाती अशा अपेक्षांच्या व्यापारात मापण्यापेक्षा लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, प्रत्येक बाबतीत साथ देणे अतिशय आवश्यक आहे. लग्न करणाऱ्यांनी, समोरच्याकडे आधी माणूस म्हणून बघायला हवे. आर्थिक बाबतीत मुलांसह मुलींनीही स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे, त्याचबरोबर घरकामांमध्ये मुलानेही मदत करायला हवी.
मुले जसं आर्थिक बाबदीत मुलीची मदतीची अपेक्षा करतात तसं मुलीही घरकामात मुलांच्या मदतीची अपेक्षा करणे काही गैर नाहीय..
आपल्याला पैशाशी नाही, तर एका सजीव माणसाशी लग्न करायचे आहे, हे मुलींनी लक्षात ठेवावे, तर सतत घरकाम आणि जॉब करणाऱ्या एका यंत्राशी लग्न करणार नाही आहोत, हे मुलांनी लक्षात ठेवावे. एकमेकांपुढे अवास्तव आणि अनाकलनीय अपेक्षा न ठेवता एकमेकांची मने सांभाळत, प्रेमळ आणि आपुलकीच्या सोबतीने एकमेकांना सांभाळण्याचा आनंद, आयुष्यभरासाठी पुरेशी असते..
स्वतःच्या भावनांना ओव्हर प्रॅक्टिकल बनवण्यापेक्षा तसेच तरल राहू द्यायला हवे तरच आज वेगाने ढासळत चाललेल्या विवाह संस्थेची आणखी मोडतोड वाचू शकेल.