लढा
लढा


नेहमीप्रमाणे लिनाने आपल्या नवऱ्याला चहा आणि पोहे दिले. पोह्याची चव नेहमीसारखी नव्हती. म्हणून रवी खूप चिडला. लिनावर खूप आरडाओरड केली. इकडे लिनाचे तिचा पाणउतारा झाला म्हणून डोळे गच्च भरून आले. "साधे पोहे करता येत नाहीत तुला." त्याने त्याचा संताप व्यक्त केला. चिडचिड पोह्यामुळे नव्हती झाली. तर त्याला दोन महिने घरी बसावं लागल्यामुळे त्याचा संपूर्ण धंदा ठप्प झाला होता. त्यामुळे चिडचिड होत होती त्याची. तो कॉर्पोरेट ट्रेनर होता. आधीच फेब्रुवारी महिन्यापासून बंद झाले होते त्याचे काम. त्यात अजून ह्या कोरोनाची भर. काय करावे काही सुचत नव्हते. बँकेतले साठवलेले पैसे पण संपत आले होते. कोणाला माहित होतं पुढे जाऊन हे सगळं पहावं लागणार आहे असं तो मनाशी पुटपुटला.
लीना प्रिन्सिपल होती. पण नोव्हेंबर महिन्यामध्ये तिला तिची नोकरी गमवावी लागली. म्हणून तिने परत जानेवारीपासून प्रिन्सिपलसाठी इंटरव्यू द्यायला सुरुवात केली. पण अंतर जास्त असल्यामुळे तिची निवड कोणी करत नव्हते. शेवटी तिने मार्चमध्ये शिक्षिकेच्या हुद्द्यासाठी अर्ज दिला. तिची निवड पण झाली होती. पण या कोरोनामुळे तिची शेवटची फेरी राहून गेली. बघता बघता एप्रिलपण तिच्या हातातून निसटून गेला होता. मे उजाडला. तिचे पण खूप मानसिक खच्चीकरण झाले होते. आधीच नोव्हेंबरपासून घरी. त्यात ह्या कोरोनाचे संकट. मेल्याहून मेल्यासारखे झाले होते तिला. दोन वेळचं खायला तर पाहिजे. भाज्यांचे भाव खूप कडाडले होते. भाजी खरेदी करावी की नाही हा प्रश्न तिला पडायचा. फळं तर खूप लांबची गोष्ट. तीच गोष्ट किराणाच्या बाबतीत. किराणा मालाचे भाव खूप वाढवून ठेवले होते दुकानदाराने. उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होते दोघे. पण हातावरचे पोट. कोणाकडे मागायचे पैसे. सगळी सोंगं आणता येतात. पण पैशाचं नाही.
तिकडे मुलाची दहावी. तो पण चिडचिड करत होता. त्यालाही घरात बसून कंटाळा येत होता. नुसता वेळ वाया जात आहे असे वाटायचे त्याला. पण नंतर गप्प व्हायचा. कधीकधी एकटाच रडायचा. दोन महिने झाले मी उंबरठा ओलांडला नाही म्हणून त्याची घालमेल होत होती ती वेगळीच. स्वतःचं परिस्थितीशी लढा देत होता.
ते कोरोनाचे संकट काही करून जाऊ दे म्हणून देवाला प्रार्थना करत होता.
लिनाला कधीकधी वाटायचं तसे पाहिले तर आपली परिस्थिती थोडी बरी. थोडेफार बँकेत पैसे आहेत म्हणून घर चालत होते. पण मजूर, रिक्षावाले यांचं काय? खरं सगळ्या सुविधा सगळ्यांपर्यंत पोहचत असतील का? ते काय खात असतील? एक दिवस कामावर नाही गेले तर त्यांना रोजगार मिळत नाही. आता तर दोन महिने भरत आले होते. त्यांचं काय? आपली एवढी चिडचिड होत आहे. त्यांना तर रडूच कोसळत असेल. तर ते काय करत असतील? खूप जण आपल्या स्वतःच्या घरात नाहीत. अडकून पडलेत नोकरीच्या ठिकाणी. सकारात्मक रहावे असे म्हणतात. अन्नाचा कण नसेल तर कसली आली सकारात्मकता आणि तत्व. फक्त श्वास सुरू आहे. हे काय जगणे आहे का? फक्त लढत आहे प्रत्येकजण. जगतोय आपले. हीच परिस्थिती प्रत्येक घरात थोड्याफार फरकाने बघायला मिळत आहे.
एवढं असूनही लिनाने सोसायटीतील गार्डला एकदा जेवायला दिले. परिस्थितीची जाणीव होती तिला त्यांच्याही. फक्त जगण्यासाठी प्रार्थना करत आहेत सगळे. देवा काहीही कर पण कोरोनाचे संकट काही केल्या जाऊ दे. परीक्षा आहे प्रत्येकाची.
कोणाची लग्न राहिली आहेत. तर कोणी आई होणार आहे. कोणी मेलं तर त्याच्या अंत्ययात्रेला पण जाता येत नाही. अगदी सगळेच माणुसकी विसरल्यासारखे झाले आहे. जगाशी, समाज्याशी संपर्क तुटल्यासारखा झाला आहे. कोणाशी चार शब्द मोकळेपणाने बोलता येत नाहीत. कोणी परदेशात अडकून पडले आहे. कोणाचा कोणाला मेळ नाही. सगळं कसं फिस्कटल्यासारखे. बेरोजगारी,भय,आर्थिक चणचण, दुरावा, ताटातूट, चिंता ह्याच्याशी लढा तो हिम्मतीचा.
काहीतरी मार्ग नक्की निघावा आणि परत सगळे सुरळीत व्हावे हेच देवाकडे साकडे.