लालपरी आणि कॉलेजचे जीवन
लालपरी आणि कॉलेजचे जीवन


उन्हाळ्याची सुट्टी आणि मामाचे गाव लिहल्या नंतर अत्ता नवीन विषय तो म्हणजे लालपरी आणि कॉलेजचा प्रवास. हा लेख देखील मामाचे गाव नांगनूरकर यांचा कॉलेज साठी केलेला प्रवास आणि त्यातील अनुभव सांगत आहे.
नांगनूर येथून कॉलेजसाठी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे गडहिंग्लज मध्ये यावे लागते. सर्व कॉलेज कुमार आणि कुमारी आजकाल तर शाळेतील मुले(इंग्रजी शिकण्याचे फॅड) ही गडहिंग्लज किंवा नूल ला शिकण्यासाठी येत आहेत. या सर्व मुलांचे दिनक्रम हा या लालपरि (ST)अवलंबून असायचा. ही लालपरी(कॉलेज गाडी) रोज संध्याकाळी ७.३०वाजता गडहिंग्लज वरून निघून ८.३० च्या सुमारास कडलगे या गावी मुक्कामी थांबत असत. हीच कॉलेज गाडी सकाळी परत गडहिंग्लज ला जाण्यासाठी ६-६.१५ वा तयार असायची. ही गाडी पकडण्यासाठी गावातील सगळे कॉलेज कुमार/कुमारी पहाटे कोणी ४ तर कुणी ५ ला उठून आपला दिवस सुरुवात करत असे. उठल्या नंतर पहिला म्हसरांना (जनावरांना) पाणी पाजून, चारा टाकून पुढील कामास सुरुवात व्हायची ती म्हणजे जळण गोळा करून चुलीवर अंघोळीसाठी पाणी तापवायची. चूल पेटवून पाणी तापावणे म्हणजे एक प्रकारची जणू कसरतच, धूर काही केला थांबत नसे तसाच कसे तर फुंकणी ने फुकुन फुकुन पाणी तापून घ्यायचे. अंघोळीला जाण्या आधी त्याच चुलीवर किंवा त्याकाळी खूप साऱ्या लोकांच्या घरी गोबरगॅस शेगडी असायची त्यावर चहा ठेवायचा आणि अंघोळीला जायचे. कावळ्यासारखी गडबडीत अंघोळ करायची आणि गटकंन चहा ढोसायचा. चहा सोबत कोणी बटर, शिळ्या चपाती किंवा भाकरी तर काही जण शिळ्या भाताला फोडणी देऊन खात. केसांना लावण्यासाठी त्याकाळी खोबरेल तेल(पॅराशूट किंवा सुट्टे बॉटल मध्ये) असेल तर लावायचे तेही थंडीच्या दिवसात चुलीवर गरम करून किंवा हाता मध्ये बॉटल फिरवुन फिरवून थोडे फार कुठे तर हातावर आले तर जिथे लागेल तिथे गडबडीत लावायचे. पावडर घरी असेल तर तशीच तोंडाला थापायची आणि हाता मध्ये तीन चार वह्या घेऊन निघायचे लालपरी ला पकडण्यासाठी. तशी ही लालपरी कडलगे वरून यायची त्यामुळे आधीच स्थानिक आणि अरळगुंडी चे विद्यार्थी आपली आपली जागा पकडून येत असत. जशी ती नांगनूर बस स्टँड वर यायची तशी ८०% फुल्ल होत असे. यावेळी दोन बसचा पर्याय होता एक ही कॉलेज गाडी आणि दुसरी याच्या अर्ध्या तासाने संकेश्वर मार्गे जाणारी एक बस होती. तरी सगळ्याची पसंती ही त्या कॉलज बसलाच असायची. नांगनूर हा तिसरा स्टॉप होता तेव्हा बसची वाट तर पहावी लागायचीच कधी लवकर यायची तर काधी वेळ होत असे. विशेष म्हणजे थंडीच्या दिवसांत बस स्टॉप च्या बाजूला आसलेल्या उकिरड्यातला रवंदा जाळून बस येई पर्यंत शेकुन घ्यावे लागत असे.
नांगनूर सोडली की तिचा पुढचा टप्पा खंणदाळ मग तर ती एकदम भरगच्च व्हायची. यामध्ये मज्या अशी असायची की कोणी एकाद्या गावाचा आपला मित्र/मैत्रीण पुढे बस मध्ये येणार असेल तर त्याची/तिची सीट अगोदरच आरक्षित केली जायची. आत्ता हे कॉलेज च्या वयातील मुला म्हणजे जरा खोडसाळ असणारच कधी मुला आपल्या अवढत्या मुली साठी जागा अडवून ठेवत असत जेणेकरून त्याचे चांगले इम्प्रेशन पडेल. ही सर्व कॉलेज कुमार/कुमारी जितक्या खोडसाळ तितक्याच मनाने निर्मल ही होते समजा बस मध्ये एखादी जेष्ठ व्यक्ती अली की त्यांना उठून बसण्या जागा देत असत असे हे त्यांना मान देत होते. बस अशीच पुढे पुढे जात नूल मध्ये काही विद्यार्थी उतरायचे आणि त्याच मार्गे पुढे जायची. विशेष म्हणजे या बस मध्ये दोन गट असायचे एक मुलांचा आणि दुसरा मुलींचा. मूल नेहमी आपल्या मित्रांसाठी जागा पकडत आणि मुली नेहमी आपल्या मैत्रिणी साठी जागा पकडत असत. अजून तर काय या बसमध्ये गाव गावचे ही ग्रुप होते तू आमच्या गावच्या पोरीला का पाहिले यावरून यांच्यात धूमबड उडायची. त्याकाळी मोबाइलने अजून इतकी मान वर काढली न्हवती. सकाळ सकाळी खाण्या साठी खिशातून शेंगदाणे सारख्या सुक्या वस्तू कोणी ना कोणी घेऊन येत असत. सगळे प्रसंग हे बस सुरू असतानाच बस मध्ये सुरू असायचे. या लालपरी ची क्षमता ४५ लोकांची पण बिचारी रोज ७५-८० लोकांचे भार सोसत यायची. हळूहळू पुढे चन्नेकुप्पी गावात यायची तेथील काही विध्यार्थी चढायचे आणि भडगाव मार्गे पहिला स्टॉप जागृती हायस्कूल आणि कॉलेज. ज्यांना जागृतीला जायचे ते या स्टॉप ला उतरायचे बाकी सर्वजण शेवटचा टप्पा म्हणजे गडहिंग्लज बस स्टँड गाठवचे. इथे पोहचता पोहचता सकाळचे ७-७.१५ झाले असायचे. जे खूपच सीन्सिअर असतील अशी मुला आणि सर्व मुली पळत पळत कॉलेज गाठायचे आणि पाहोल्या तासाला आपली हजेरी लावायचे. तीन कॉलेज खूप प्रसिद्ध होते टुकार पोरा शिवराज कॉलेज, अभ्यासू मुले जागृती आणि साधना अशी वर्ग वारी केली जायची. हा असा एक बाजूचा प्रवास.
आत्ता इथून पुढे ११.३०-१ वाजेपर्यंत यांची मज्जा असायची. शिवराज कॉलेजवाली मुलं पहिला तास करून त्या व्यायामशाळेत जाऊन बसणार. जागृतीमधील मुलं आपले तिकडचे तास चुकवून तेही यांच्यासोबत त्या व्यायामशाळेत हजर. कॉलेज कमी आणि फिरणे जादा. बहुदा मुली प्रामाणिकपणे आपले आपले क्लास करत. काही मुलांना तर तास चुकवून साई मंदिर बाग, गणपती मंदिर बाग मध्ये जाऊन बसण्यात एक वेगळाच आनंद होता. कोणी त्या साई मंदिर जवळ बच्चन भेळ खायला जायचा तर कोणाला त्या बेंगलोर बेकरीमधील मस्का पाव खायला अवढत तर कोणी भडगाव रोड कॉर्नर वरील झुणका भाकर, चपाती भाजी, ओंकार हॉटेल मधील पाव भाजी, st कॅन्टीन मधील पुरी भाजी, म्हैसूर भजी, रेणुका बेकरी मधील कचोरी, जागृती आणि शिवराज कॉलेज कॅन्टीन मधील प्याटीस नंतर नंतर मॉडर्न बेकरी अश्या प्रसिध्द ठिकाणी जाऊन ताव मारून मनसोक्त आनंद लुटत. बस स्टँड म्हणजे जणू यात्रा असायची कारण सगळ्या कॉलेज चे विद्यार्थी एकत्र जावा व्हायचे. बस स्थानक म्हणजे पोरानं साठी लाइन मारण्याचा अड्डा त्यातल्या त्या पार्सल रूम जवळील बाकडे, STD बूथ, चिंचेच्या झाडाचा कट्टा, प्रत्येक रूट चा फलाट, उगाच माहिती असताना सुद्धा गाडीची चौकाशी करायची. पिक्चर बघायची खूप मुलांना हौस तेव्हा केदार आणि मराठा मंदिर हे दोन प्रसिध्द ठिकाण. आत्ता कॉलेज लाईफ म्हंटल की प्रेम आलेच मग या प्रेमावर कोणताही पिक्चर असो सुट्टी नाहीच ओ. जशी त्या चित्रपटात कपड्याची स्टाईल तशी सेम जीन्स पॅन्ट, बेल बॉटम, सिक्स पॉकेट पॅन्ट, बॉक्स पॉकेट, बच्चन स्टाईल पॅन्ट ला पुढे खिषे इ. सोबत जशी चित्रपटात हेअर स्टाईल एक साईड ला केस, मोठे क्रॉस कल्ले इ. अश्याच मुली ही काही कमी न्हवत्या त्याही चित्रपटात असेल अशी हेअर स्टाईल, कपडे सेम टू सेम प्रयत्न करत. कॉलेज गदरिंग म्हणटले की विषय हार्ड ओ कोण डान्स मध्ये कोण नाटकात, कोण फॅशन शोमध्ये तर कोण बॉडी बिल्डिंग मध्ये भाग घेत असे. सर्वात प्रसिद्ध म्हणजे पुशपोंड मुली मुलांवर तर मुले मुलींवर टाकत असे. कोणी प्रेम खातर तर कोणी चेष्टे खातर एक मेकांचे पाय ओढत असत. पुशपोंड म्हणजे कॉलेज मध्ये सर्वांना समोर एकमेकां वरील प्रेम किंवा तरस्कार सगळ्या कॉलेजसमोर मांडणे. यासाठी तर सर्व जण पूर्ण वर्षभर गदरिंग ची वाट बघत असायचे सोबतच कोणाला कोणता पुशपोंड टाकायचा याची तयारी असायची. गदरिंग हे स्पेशल प्रेमी युगलांसाठी दिलेला नियोजित वेळ म्हणता येईल. यातूनच मुला मुलांच्या मध्ये भांडण होत असे. या गावाची मुले त्या गावातील मुल सोबत भांडत हे चालतच राहायचे (उदा. चन्नेकुप्पी, मूतनाळ)
दिवसाचे कॉलेज झाले की बस स्थानका मध्ये येऊन बस ची वाट पहायची. कॉलज साधारण सकाळी ११ च्या आसपास सुटायचे आणि ११.३० वाजता परतीची गाडी असायची. इथे सुद्धा सेम तीच गर्दी तशीच माणसे जागा पकडण्या साठी भांडण मग ते मुले आणि मुली मधील असो वा गावा गावा मधील असो. एकदा का ही बस चुकली की मग नंतर १ वाजल्या शिवाय दुरी लालपरी न्हवती मग तो पर्यन्त तिथेच उपाशी बसायची वेळ येत होती. समज एकाद्या वेळी घरी लवकर जायचे असेल तर संकेश्वर बस पकडून मधल्या वाटेने चालत गावात यावे लागते असे. ही गाडी फलाटला लगे पर्यंत सर्व मुले-मुली मस्त गप्पा, टप्पा मारत तर कोणी लाइन मारत बसलो असायचे त्यात त्या बस स्टँड वर खुळे सुन्या ची भर पैसे दिले की तो काही ही करत असत. टिंगलटवाळी झाली की गाडी मध्ये जागा पकडून परतीचा प्रवास सुरु.
एकदा का १२-१२.३० ला घरी पोहचले की फ्रेश होऊन मस्त जेवणावर ताव मारून दुपरेची डुलकी मारायची. झोप झाली की मग परत सुरू व्हायचे संध्याकाळी कोणी शेतात जायचे तर कोणी म्हसर राखायला घेऊन जायचे आणि मुली आपल्या जेवणाच्या तयारीला लागायच्या.
असा हा खडतर लालपरीचा प्रवास करून गावातून खुप मुला मुलींनी प्रगती करून गावचे नाव उंचावले आहे. अशी ही लालपरी गावातील प्रत्येक कॉलेज विद्यार्थीच्या जीवनातील न विसरणारा दुवा आहे.