कुणाला कमी लेखू नये
कुणाला कमी लेखू नये


अनाजपूर नावाचे एक गाव होते.नावाप्रमाणे अन्नधान्याचे पीक खूप भरपूर प्रमाणात होते. अर्थात भरघोस पिकामुळे तेथे लक्ष्मी पाणी भरत होती.सगळे आनंदात एकत्र नांदत होते.कोणालाच तशी एकमेकांची गरज लागत नव्हती.
त्या गावात सखूबाई रहात होती. ती खूप गरीब होती .कारण तिची शेतीभाती नव्हती.रस्ते साफ करणे हे तिचे काम.ते बाकी ती इमानेइतबारे करीत असे.तिचे कपडे जुने असत.तरी स्वच्छ असत. पण लोक आजुबाजूने जाताना नाक मुरडत. लांबून जात. त्याचे तिला फार वाईट वाटे. पण गरिबाचा कोण वाली नसतो. आला दिवस ढकलायचा. तिला कोणीच नव्हते.ते गाव स्वच्छ केले की ते लखलखीत रस्ते तिच्याशी गप्पा मारत.गल्लीबोळ तिच्याकडे पाहून मनसोक्त गप्पा मारीत. त्यांना स्वच्छ ठेवल्याबद्दल धन्यवाद देत.
गावातील लोकांना बाकी त्याचे काही नव्हते. घरातील अन्न उरलेसुरले तर बाकी त्यांच्या नजरा तिला शोधत. ती नाही दिसली तर प्राण्यांना देत. म्हणजेच तिची जागा त्यांनी तशी ठरवली होती.तिलाही या गोष्टीची सवय झाली होती.कधीकधी मनही विषण्ण होई.पण आपले रक्ताचे कोणी नाही मग काय!असा विचार करून ती गप्प होई.
एके दिवशी ती अशीच स्वत:च्या विचारात चालली होती आणी सुटाबुटातील एका माणसाला धक्का लागला तो माणूस लगेच ओरडला "हे सखुबाई लक्ष आहे कुठे? तुझा धक्का लागला मला .घरी जाऊन अंघोळ करून कपडे बदलावे लागतील .फुकटचा वेळ घालवला माझा .चल चालती हो इथून." सखूला ते शब्द जिव्हारी लागले. ती विचार करू लागली एवढे मी गावाची साफसफाई करते .कोणताही लोभ मनात आणत नाही त्याचा काय उपयोग ?आपल्या मनाच्या शांतीसाठी काही दिवस या गावापासून दूर जावे हेच खरे .तिच्याकडे नाही संपत्ती ना काही सामान .गावातून मिळालेल्या तुकड्यावर ती जगत होती .तरीही मनाचा ठिय्या करून ती दुसऱ्या गावात गेली .
अनासपुरे गावातील साफसफाई बंद झाल्याने जिकडे तिकडे कचरा साठला .सुरुवातीचे काही दिवस लोकांच्या लक्षातच आले नाही .जसजसे दिवस वाढत गेले तसतसे त्या गावात साथीच्या आजारांनी तोंड वर काढले .कित्येक लोक गंभीर आजारी पडले .मग लोकांच्या लक्षात सखुबाई कुठे दिसत नाही हे आले .आपण जिल्हा घाणेरडी समजत होतो ती आपल्याला सर्व आजारांपासून दूर ठेवत होती .आपल्या गावाची स्वच्छता राखत होती .म्हणजे खऱ्या अर्थाने तीच या गावाची लक्ष्मी होती हे त्यांच्या लक्षात आले .पण खूप उशीर झाला होता सखुबाई कुठे गेली हे कोणालाच नव्हते .तिच्यासारखी स्वच्छता राखणारे माणसे भरपूर पैसे देऊनही त्यांना उपलब्ध होत नव्हती .गावाने काय चूक केली ते त्यांचा लक्षात आले होते .
काय करावे गावकऱ्यांची सभा भरली .आजपर्यंत आपण सखूबाईला खूप कमी लेखले .तिचा मान सन्मान झालाच पाहिजे .म्हणून तिला आपण सर्वप्रथम शोधून आणले पाहिजे असे ठरले .गावातील काही तरुण मंडळींनी उत्साहाने हे काम हाती घेतले व शोध कार्यास प्रारंभही केला .तीन चार दिवसांनी सखूबाईचा एका गावात शोध लागला .तिला सन्मानाने गावात आणले गेले .तिचा गौरव केला .जाने तिचा अपमान केला होता त्याने सर्व गावा समक्ष तिची माफी मागितली .गावातील लोकांनी तिला राहण्यास चांगले घर दिले .तिने गावातील साफसफाई करायची व त्याबद्दल गावातील लोकांकडून तिला चांगल्या प्रकारे मोबदला दिला जाईल.म्हणजे लोकांचे उरलेली उष्टी खरकटी खाण्याची तिला पाळी येणार नाही .तिथे ती ताजे अन्न खाऊन स्वतःचेही आरोग्य चांगले राखू शकेल .
सखूबाई ला खूप आनंद झाला. आजपर्यंत केलेल्या परिश्रमाचे फळ मिळाले होते .ती खूप आनंदी झाली व मोठ्या जोमाने कामाला लागली .
कोणाला कधीही कमी लेखू नये हा धडा अनाजपूर गावानेही चांगलाच घेतला