Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

कृतज्ञता - एक अनमोल गुण.

कृतज्ञता - एक अनमोल गुण.

3 mins
583


जीवनाच्या प्रवासात आपले आई वडील नातेवाईक शेजारी मैत्रिणी आणि काव्यसंस्थांमधले परिचित आपल्यासाठी खूप काही करत असतात. आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धन्यवाद असे म्हणतो. आपण छोट्या मुलाला वाढदिवसाचे प्रेझेंट, खाऊ, बिस्कीटपुडा दिला तरी ते पटकन आपल्याला थँक्यू म्हणून कृतज्ञता व्यक्त करते. केलेले जाणणारा तो कृतज्ञ !!


   ज्येष्ठ लेखक , कविवर्य , शिक्षणतज्ञ ,विनोदांचे बादशहा , नाटककार , विनोदी चित्रपटांचे निर्माते , पट्टीचे वक्ते , राजकारणी , पत्रकार , टीकाकार , समीक्षक आणि एक परिपूर्ण माणूसकी असलेला कृतज्ञ माणूस अशी अष्टपैलू ओळख असणारे आचार्य अत्रे जगप्रसिद्ध आहेत.

"सभ्य गृहस्थहो" अशी साद घातल्यावर "ओ" म्हणणारा एक खट श्रोता भेटला तेव्हा

"मी सभ्य गृहस्थांना हाक मारली . तुम्हांला नाही"असे म्हणून अफाट जनसमुदायाला हसवणारे अत्रेसाहेब सर्वांना सुपरिचित आहेत.

    त्यांचा बालगंधर्व पूलावरील अर्धपुतळा जवळून बघितला तेव्हा " उद्या माझे स्मारक उभारायचे असेल तर तिथे हा माणूस मूर्ख असेल, अविचारीही असेल पण कृतघ्न मात्र कधीही नव्हता " अशी अक्षरे लिहा असे अत्रेसाहेबांनी सांगितले होते.

वरती सांगितल्याप्रमाणे अष्टपैलू व परिपूर्ण व्यक्तिमत्व आणि एवढे सगळे गुण एकाच माणसाच्या अंगात असणे अगदी दुर्मिळ!!पण अहंकाराचा वारा न लागणे हे त्यांच्या सौजन्याचे व परिपूर्ण व्यक्तिमत्वाचे लक्षण होते.माणसाच्या अंगी कृतज्ञता असणे हे त्याच्या चांगुलपणाचे लक्षण आहे.

त्यांच्या कृतज्ञतेचे दर्शन घडलेली एक छोटीशी गोष्ट त्यांचे अफाट मोठेपण दाखवून देते. 

  आमच्या आजीकडे बगाराममामा बरेच वेळा दादरला येत. त्यांना आचार्य अत्रेसाहेबांना एकदा बघायचे होते. आमच्या आजीच्या मागे लागून आचार्य अत्रेंचा पत्ता मिळवून त्यांच्या घरी गेले. त्यादिवशी अत्रेसाहेब घरी नव्हते. त्यांनी तिथे बसल्याबसल्या एक सुंदर कविता लिहून ठेवली नाव पत्ता लिहिला व घरी परतले. भेट न झाल्याने ते नाराज झाले. पण काही दिवसांतच आचार्य अत्र्यांनी पत्र पाठवून त्यांना बोलावून घेतले. बगाराममामांचा आनंद गगनात मावला नाही. ते परत उत्साहाने भेटायला गेले.ते आपले साधे भोळे. स्वभावाने भोळसट!! एका नाटकातील बगारामचे पात्र मामांच्या संभाषणावरुनच घेतले. सामान्यातील सामान्य व्यक्ती भेटायला आली तरी तिच्या कवितेबद्दल आदर दाखवून भेटायला बोलावणे हे कृतज्ञतेचेच दर्शक आहे.

माजी राष्ट्रपती पै. अब्दुलकलामजी हेही कृतज्ञ म्हणूनच ओळखावे लागतील.साधे ग्रिटीग जरी एखाद्या मुलाने पाठविले तरी त्याला शेजारच्या फोनवरून धन्यवाद देणे हे कतज्ञ माणसाचेच लक्षण आहे. मी त्यांचे गुणवर्णन करणारी एक साधी शुभेच्छा देणारी कविता नवीन वर्षारंभी पाठविली , तर त्याची लेखी पोच व मलाही शुभेच्छा त्यांच्या अॉफिसमधून आल्या. ह्यात त्यांच्या अपार माणुसकीचे व कृतज्ञतेचे दर्शन घडते.

   आपल्याला आई वडील लहानाचे मोठे करताना अपार कष्ट करतात.ते उपकार कधीच फिटत नसतात.त्यांना उतारवयात आराम देणे , त्यांचे मन प्रसन्न ठेवणे ,त्यांच्याशी गप्पा मारणे , त्यांच्याशी जमवून घेणे हे मुले कृतज्ञ असल्याचेच लक्षण आहे.

    आपण समाजाचेही ऋणी असतो. सामाजिक कार्य करणारी माणसे , अनाथ पंगू दुबळ्यांसाठी आर्थिक शारिरीक कष्ट घेणारी माणसे , अनाथाश्रमातील मुलांना दत्तक घेणारी माणसे , अनाथाश्रमातील मुलींशी लग्न करणारी मुले , रक्तदान करुन जीवन देणारे रक्तदाते ह्यांनाही कृतज्ञच म्हणायला हवे. त्यांच्या खात्यात चित्रगुप्त अपार पुण्याची पुंजी जमा करतो यात शंकाच नाही .

   धन्यवाद शब्दांतून कृतज्ञता व्यक्त होते , पण जेव्हा ती आचरणातून व्यक्त होते तेव्हा ती हृदयापर्यंत पोचते. वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की कृतज्ञता हा फार मोठा गुण आहे. तो केवळ माणसांतच नाही तर , पशुपक्ष्यांमधेही असतो. शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेणारा कुत्रा, आपल्या आचरणातून अपार प्रेमाची आणि कृतज्ञतेचीच ओळख करुन देणारा आहे. माझ्यासाठी प्रेमापोटी ज्या ज्या व्यक्तींनी योगदान दिले , त्या सर्व व्यक्तींशी मी कृतज्ञ आहे.त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.


Rate this content
Log in