क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे


पांडूच्या बाबांची खूप शेती होती. पांडू अभ्यासात खूप हुशार. लक्ष्मी त्यांच्या घरात पाणी भरत होती. घरात खूप मजूर कामाला होते.सुखी संपन्न घर होते. पांडूचे बाबा खूप मेहनती होते. पण ते शिकलेले नव्हते. अनुभवाच्या जोरावर त्यांचे सर्व चालले होते.त्यांना नेहमी वाटायचे लिहिता वाचता आले असते ,शिक्षणाची जोड असती तर वेगवेगळी जास्त पिके घेता आली असती. आपण खूप श्रीमंत झालो असतो किंवा एक यशस्वी शेतकरी झालो असतो. पांडू त्यांचा एकुलता एक मुलगा. मुलाकडून आपण आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या त्यांनी ठरवले. शिकले नसले तरी एवढी दूरदृष्टी त्यांच्याकडे नक्कीच होती.
लहानपणापासून पांडूला त्यांनी जाणीवपूर्वक घडवले. आपण आपल्या शेतीत काहीतरी नाविन्यपूर्ण क्रांती करायची हे त्याच्यावर बिंबवले
त्याप्रमाणे पांडू कृषी विद्यापीठातून पदवीधर झाला. शेतकीचे चांगले ज्ञान मिळवले. त्याच्या बाबांची छाती अभिमानाने फुलली. प्रथम श्रेणीत प्रथम आलेला पांडू ही अभिमानात मानाचा तुरा घेऊन मोठ्या सरंजामात गावी दाखल झाले. सगळे लोक त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहू लागले.
पोरगे शिकून मेहनत करून आलेय. त्याला जरा विश्रांती घेऊ दे. म्हणून बाबा गप्प होते. तोही काय काय शिकला .आपण बरेच बदल करून आपलेच नव्हे तर आपल्या गावाचे नाव कसे उज्ज्वल करू शकतो ते सांगायचा. आपल्या हुशार मुलाची पोपटपंची ऐकून बाबा खूश व्हायचे.नविन चांगले काहितरी आपल्या मुलाच्या हातून घडणार म्हणून मनात मांडे घालायचे.लेकराला आधी आरामाची गरज आहे म्हणून तिथून निघून जायचे.
पांडूहि जणू खूप मोठी लढाई लढून आल्याचा आव अाणी.पाय पसरून झोपी जाई.आपण आपल्या गावाचा उध्दार केला आहे. सगळे गावकरी आपल्याला सलाम ठोकत आहेत. फक्त आपला आणि आपलाच सल्ला घेत आहेत. ऊन लागू नये म्हणून आपल्या डोक्यावर छत्री धरत आहेत.कुठेही बसण्याअगोदर ती जागा पुसत आहेत. पाण्याचे ग्लास ,वेगवेगळ्या खाण्याच्या डिश समोर आणत आहेत.एक एक शब्द झेलत आहेत. अशी स्वप्न तो पहात असे.
बाबांनी मुलाचे कौतुक गावभर केल्याने गावातील लोक ही पांडू मदत करेल याची वाट पहात होते. तो जायला निघाला की उठून उभे रहात .त्याला सलाम ठोकत.खूप अपेक्षेने त्याच्याकडे पहात. तोही ऐटित त्याच्यासमोरून जात असे.
म्हणता म्हणता वर्ष झाले तरीही पांडूची काही हालचाल दिसेना .लोक कंटाळली त्याला उभे राहून सलाम करणे सोडून दिले . त्यांच्या बाबांची टिंगल करू लागले .त्यांच्या ज्ञानाची शिक्षणाची देखील अवहेलना करू लागले .त्याची व त्याच्या बाबांची किंमत शून्य झाली .त्याचे बाबा खूप दुःखी झाले.त्यांची आशा फोल ठरली होती .
हळूहळू पांडूला ही ते सहन होईना.त्याची चूक त्याला पूर्णपणे काळली होती .
दुसऱ्या दिवशी तो सकाळीच उठला. देवाचे दर्शन घेतले .आपल्या बाबांच्या पाया पडला.व कामाला लागला .नवीन पध्दतीने शेतीचे काम करू लागला. नवनवीन पिकांची लावणी केली.हा हा म्हणता बाबांचे शेत हिरवेगार दिसू लागले टपोरे टपोरे दाणे खुलून दिसू लागले जणू की सोनंच चमकत आहे .लोक स्वप्नातही पाहू शकणार नाहीत अशी वेगवेगळी पिके त्याने त्यांच्या जमिनीत घेऊन दाखवली .लोक आश्चर्याने तोंडात बोटे घालू लागली .बाबांचा ऊर अभिमानाने भरून आला जे स्वप्न पाहिले होते ते प्रत्यक्षात दिसू लागले .
आता येता जाता पांडूला लोक सलाम करू लागले. त्याची काळजी घेऊ लागले त्याला मान देऊ लागले।आदराने त्यांची मान त्यांच्या पुढे झुकू लागली .
पांडूला त्याच्या बाईंनी लहानपणी शिकविलेला सुविचार आठवू लागला 'क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे '.त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्याने घेतला होता