कोण म्हणतंय मी आई होऊ शकत नाही
कोण म्हणतंय मी आई होऊ शकत नाही
आज संध्या लवकर उठली.. कारण आजचा दिवस तिच्यासाठी खूप महत्वाचा होता..एकटेपणा दूर करून आपल्या जगण्यासाठी एक कारण घरी घेऊन येणार होती.. बघायला गेलं तर खूप खुश ही होती आणि थोडीशी नाराजही.. कारण मागच्या सात वर्षाच्या आठवणी तिला रात्रभर झोपू दिल्या नव्हत्या आणि आता स्वस्थ बसूही देत नव्हत्या.. चहाचा कप घेऊन ती गॅलरीत येऊन बसली आणि मागचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर येऊ लागला..
"बाळा तू असं निघून यायला नको होतं.. एकदा लग्न झालं कि शेवट्पर्यंत निभवता यायला हवं.. असं समज कि तुझंच नशीब खराब आहे.. कोण काय करणार त्याला.. तू जर आई होऊ शकली असती तर गोष्ट वेगळी असती.. "
"मी आई होऊ शकत नाही ह्यात माझी काय चूक आहे? हे काय माझ्या हातात आहे काय? आई नाही होऊ शकत म्हणजे मी माणूस नाहीय? मला भावना नाहीयेत? म्हणून मिनिटा मिनिटाला अपमान करणाऱ्या, माझं जगणं नकोस करणाऱ्या लोकांसोबत मी आयुष्य काढायचं? ते जे म्हणतील ते ऐकायचं?"
संध्या आणि आईचं हे बोलणं चालू असतानाच बाबा आले..
"हे बघ बेटा..मी तर एका कापडाच्या दुकानात कामाला होतो..आता वय झालं तसं कोणी नोकरीवर ठेवून घ्यायला बघत नाही..आणि तुझा दादा अनंत तर परदेशात आपल्या संसारात मग्न आहे..त्यामुळे हवं तर मी तूझ्या सासर च्या लोकांसोबत बोलतो..पण तू परत सासरी जावस असं मला वाटतं.."
"नाही बाबा, काही झालं तरी मी त्या घरी परत जाणार नाही..तिथे जीव गुदमरतो माझा..तिथे मिळणाऱ्या अपमानाला कंटाळली आहे मी आता..लग्नाआधी मला माझ्या पायावर उभा राहायचं होतं पण माझं ग्रॅड्युएशन होताच तुम्ही माझं लग्न लावून दिलं..तेव्हा मी तुमच्या दबावाखाली येऊन लग्न केलंही पण आता जेव्हा मला तुमच्या आधाराची गरज आहे तेव्हा तुम्ही माघार घेताय? "
"लग्नानंतर मुली सासरचीच शोभा वाढवतात..माहेरी चार दिवस राहणंच बरं दिसतं संध्या...लोकं काय म्हणतील? लग्न म्हणजे काही खेळ नाहीय बेटा.." बाबा रागातच बोलत होते..
"नाही बाबा..त्या घरात जाणं आता मला शक्य नाही..मी येतानाच डिवोर्स पेपर्स वर सही करून आलीय..कारण त्या लोकांना फक्त माझ्याकडून बाळ हवंय जे मी नाही देऊ शकत त्यांना.."
"अरे इतका मोठा निर्णय घेण्याआधी आम्हाला एकदा विचारावंस ही नाही वाटलं तुला..जन्मदाते आहोत आम्ही तुझे"
"बाबा..लग्न झाल्यापासून मी सांगतच आलीय तुम्हाला आणि आईला कसा दररोज छळ होतो तिथे माझा..ह्या दोन वर्षात कधी मला माझ्या मनासारखं वागता ही नाही आलंय..जेव्हा मेडिकल रिपोर्ट आले आणि कळालं कि मी आई नाही होऊ शकत तर तर त्या लोकांनी मला वाळीतच टाकलं..कशी राहणार होते मी अशा वातावरणात आणि ह्या सगळ्यापासून पळ काढुन जीवन संपवण्याऱ्यातली मी नाहीय.."
"हे बघ, अनंतने दिलेल्या पैशातच माझं आणि तुझ्या आईचं कसबसं चालतं..त्यात तुझा खर्च उचलणं थोडंसं अवघड जाईल.."
"बाबा डिवोर्स पेपर्स वर सही करण्याआधी ह्या सगळ्याचा विचार केलंय मी..मी माझ्याजवळचे सोन्याचे दागिने घेऊन आलीय..आणि थोडं एडुकेशन लोन काढुन मी सहा महिन्याचा एक कोर्स करणार आहे ज्याची आज मार्केट मध्ये खूप गरज आहे..त्यानंतर मला चांगल्या कंपनीत नोकरीं मिळू शकते..मी तुमच्यावर आर्थिक ओझं नाही टाकणार बाबा..मला जीवन जगायचं
आहे..संघर्ष करेन मी..कमवेन आणि जगेन मी.. विश्वास ठेवा माझ्यावर.."
"पण लोकं काय म्हणतील बाळा? काय उत्तर देणार त्यांना? "
आई डोळ्यातील पाणी लपवत बोलत होती..
"आई सांगायची वेळ आली तर खरं काय ते सांगून टाक..जेव्हा मला सासरी जनावरासारखं वागवत होते तेव्हा कुठे होती ही लोकं..माझ्यावरून कळेल तरी फक्त मुलीना मोठं करून लग्न करून द्यायचीच जबाबदारी नसते फक्त तर मोठे करून योग्य शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करणं ही त्यांची जबाबदारी आहे जेणेकरून पुढे काही बरं वाईट झालं तर त्याचा उपयोग होईल"
ठरल्याप्रमाणे संध्या ने सहा महिन्याचा कोर्स केला आणि लगेचच तिला एका चांगल्या कंपनीत कामही मिळालं..ती खूप खुश होती..आता बऱ्यापैकी सगळं नीट चालू झालं होतं..अधून मधून सुट्ट्या काढुन आई बाबांना जवळच असलेल्या पर्यटन स्थळाला फिरायला घेऊन जायची..आई बाबा मध्येच दुसऱ्या लग्नाचा विषय काढायचे..काही वेळातर मुलांना बघायला ही बोलावलं होतं..एकटा मुलगा तर डिवोर्स झालेलं असतानाही तिला स्वीकारायला तयार होता पण पहिल्याच लग्नाने इतके दुःख दिले होते कि दुसऱ्या लग्नासाठी तिचं मन तयार नव्हतं..
"असं किती दिवस एकटी राहशील..जोपर्यंत आम्ही दोघे आहोत तोपर्यंत ठीक आहे..पण आमच्या नंतरचा विचार केला आहेस का..वय ही किती लहान आहे तुझं अजून"
"आई बाबा हे लग्नाचं विषय सोडून द्या..तुम्हा दोघांना खुश बघूनच मी खुश होते..आणि आहेतच कि माझे मित्र-मैत्रिणी सोबतीला.. कशाला हवं दुसरं लग्न.."
"इतकं सोप्प नाहीय बाळा हे..एका वयानंतर एकटेपणा खायला उठतो माणसाला.." आई म्हणाली.
खरच ठरलं तिचं हे बोलणं पुढच्या दोन वर्षात आधी आई आणि सहा महिन्यानेच बाबांचं निधन झालं..आणि संध्या एकटी पडली..अनंत दादा आणि त्याची बायको आले आणि सोबत चल म्हणायची औपचारिकता केली..पण मला त्यांच्यासोबत जाऊन परत ओझं नव्हतं व्हायचं..गरजेच्या वेळी माझ्या पाठीशी राहा एवढं बोलून मी त्यांना निरोप दिला.
ऑफिसचं काम आणि खूप सारे मित्र मैत्रिणी असूनही तिला एकटेपणा जाणवू लागला..जवळपास सगळ्या मित्र मैत्रिणींची लग्न झाली होती आणि ते आपापल्या संसारात मग्न होत्या..जगण्यासाठी काही कारणच सापडत नव्हतं तिला..सुट्टीच्या दिवशी असच एक मॅगझीन वाचताना तिला सिंगल मॉम वर एक लेख वाचायला मिळाला आणि तिला जीवनाचा उद्देश सापडला..तिने त्याच दिवशी ठरवलं कि एका मुलीला दत्तक घ्यायचं..एका अनाथ आश्रमात जाऊन तिने चौकशी केली आणि एका दहा महिन्याच्या मुलीला दत्तक घ्यायचं प्रयत्न चालू केलं..प्रक्रिया खूप मोठी होती पण म्हणतात ना मनात इच्छा असली कि मार्ग सापडतो तसं ती प्रक्रिया पूर्ण झाली आणि आज तोच दिवस होता कि ती त्या मुलीला घ्यायला अनाथ आश्रमात जाणार होती..
ह्या मुलीला घरी घेऊन येऊन ती आई नाही होऊ शकणार ह्या तिच्यावर झालेल्या आरोपाला पुसून टाकणार होती..आणि तेव्हाच तिने निश्चय ही केला कि मुलीला खूप शिकवणार, स्वतःच्या पायावर उभा करणार आणि मगच लग्न करणार..ह्या विचारातच ती पटकन घड्याळाकडे बघत उठली आणि आवरायला लागली.
खरच आहे ना... आजच्या काळात मुलींना शिकवून स्वतःच्या पायावर उभा करणं खूप गरजेचे आहे..
कसा वाटला लेख..नक्की कळवा.