Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Nagesh S Shewalkar

Children Stories


3  

Nagesh S Shewalkar

Children Stories


कोण आवडते तुला?

कोण आवडते तुला?

6 mins 1.4K 6 mins 1.4K

           दुपारचे तीन वाजत होते. प्रथमा आणि प्रथमेश दिवाणखान्यात बसून आपापला शाळेचा अभ्यास करीत होते. वार्षिक परीक्षा तोंडावर होत्या त्यामुळे दोघांचेही लक्ष अभ्यासात लागले होते. दोघेही हुशार होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे बाबा घरीच होते. त्यांचा आतल्या खोलीत आराम चालला होता. आईचे नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काहीतरी काम चालू होते. प्रथमा प्रथमेशपेक्षा दोन वर्षांनी मोठी असल्यामुळे प्रथमेश तिला 'ताई' म्हणून हाक मारत असे.

 

"ये ताई, झाला बघ माझा आजचा अभ्यास. तुझा झाला का ग?"

"तसा माझाही झालाच आहे. पण तुझा नक्की झालाय ना?"

"हो ना गं. ताई, मी टीव्ही लावू का? अभ्यास करून कंटाळा आलाय."

"नाही. बाबा झोपले आहेत. बरे, आपण एक खेळ खेळूया....."

"खेळ? कोणता ग?"

"मी तुला कवितेतून एक प्रश्न विचारेल तू त्याचे उत्तर द्यायचे."प्रथमा म्हणाली.

"अं...अं... ठिक आहे. सांग..."सावरून बसत प्रथमेश म्हणाला. दुसऱ्याच क्षणी दोघांनीही आपापले दप्तर बाजूला ठेवले.

प्रथमा प्रथमेशच्या समोरासमोर खुर्ची टाकून म्हणाली,"सांग मला रे, सांग मला आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला?"

"तायडे, काहीही हं. तसे कसे सांगता येईल? दोघेही आवडतात."

"ते तर मलाही आवडतात रे. पण एक गंमत म्हणून सांग ना. आपल्या शाळेत नाही का हे गाणे अधूनमधून ऐकवतात. सांग तर मजा करुया."

"मला की नाही आई खूप आवडते.आपली आई की नाही खूप सुंदर आहे. देखणी आहे तशीच ती नाजूकही आहे. गोड आहे. हुशार आहे. आपल्या आईला ना किती छान गाता येते. तिचा आवाज मधुर आहे. लहानपणी तर ती आपल्याला खाताना, झोपताना सुंदर सुंदर गाणे ऐकवायची. तिचे गाणे ऐकल्याशिवाय मला झोप यायची नाही की, जेवण गोड लागायचे नाही. ताई, आपली आई, सुगरणपण आहे ना, असा एकही पदार्थ नाही की, तो तिला जमत नाही. उलट असे अनेक पदार्थ आहेत की, जे तिने स्वतः तयार केलेले आहेत. कोणताही खाऊ करायला सांगितला की, ती अगदी तात्काळ बनवते. तिच्या हाताला वेगळीच चव आहे. म्हणून मला आई जास्त आवडते.


तुला कोण आवडते ? सांग मला ग सांग मला, "आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला?" प्रथमेशने प्रथमाला विचारले.

तशी प्रथमा म्हणाली,"ते खरे आहे रे. आई, गोजिरवाणी आहे. सुंदर आहे. खाण्याचे विविध पदार्थ खूपच छान करते. ते खावेसे वाटतात. पण एक आहे, आई ना भित्री भागूबाई आहे रे. बाबा, बघ बरे कसे शक्तीशाली आहेत. जणू शक्तीमान! वेळ पडलीच तर ते कुणालाही अगदी गुरखा असो की चोर असो एक थप्पड द्यायला मागेपुढे बघत नाहीत. आई, माझ्या आवडीचे खमंग पदार्थ करते पण त्यामध्ये ती गंमत नाही जी बाहेर पडले की, बाबा खायला काही तरी घेऊन देतात. चिंगम असेल, चॉकलेट असेल, पाणीपुरी असेल, आईस्क्रीम असेल काय मज्जा येते असे रस्त्यावरून जाताना बाबांनी घेऊन दिलेले पदार्थ खाताना. म्हणून की नाही मला बाबा अधिक आवडतात."

 

"ते बरोबर आहे गं पण थोडे काही दुखले की, आपल्याला येते आईची आठवण. मग तिने कुशीत घेतले की, सारे दुःख आपोआप नाहीसे होते जणू काही तिच्याजवळ जादूची कांडीअसल्याप्रमाणे. बाहेर थंडी पडू दे, नाहीतर जोराचा वारा सुटू दे, की मुसळधार पाऊस येऊ दे, आईच्या कुशीत शिरले की एका क्षणात सारे नाहीसे होते. आपल्या शरीरावरून आईचे फिरणारे मऊशार हात म्हणजे जणू दुधावरची साय. त्यामुळे सारा थकवा, सारी भीती दूर पळते. कुशीत शिरल्यावर आईने घेतलेल्या पाप्याला येणारा सुगंध इतर कोणत्याही खाण्याच्या पदार्थाला येत नाही. म्हणून तायडे, तू काहीही म्हणालीस तरी आई आवडते अधिक मला." प्रथमेश ठामपणे म्हणाला.


प्रथमा कुठे मागे राहणार होती. ती तितक्याच निर्धाराने म्हणाली,"असेल तुझे बरोबर पण बाबाच आवडती अधिक मला. कारण रात्री जेव्हा आपण बाबांजवळ झोपतो ना तेव्हा आपण एकदम निर्धास्त होतो. कशाचीही भीती वाटत नाही. ना चोराची, ना भूता-राक्षसाची, ना कोणत्याही संकटाची कारण आपल्याला माहिती असते कोणतेही संकट आले तरी त्या संकटाचा सामना करण्यासाठी माझे बाबा समर्थ आहेत. ते साऱ्यांना पळवून लावतील. बाबा, आवडण्याचे आणखी एक कारण तुला सांगू का, बाबांच्या जवळ झोपले आणि बाबांनी कुशीत घेऊन पापा घेतला ना की, तेव्हा त्यांच्या मिशा टोचतात आणि काय मस्त गुदगुल्या होतात ना आपुल्या गालाला."


" आई, केवळ स्वयंपाक आणि फराळाचे पदार्थ करण्यातच हुशार असते असे नाही तर ती स्वतः आपल्यासाठी किती छान छान कपडे शिवते. आंघोळ घालून कपडे घालते, पावडर लावते आणि आपल्या बाळाला कुणाची नजर लागू नये म्हणून छानसा टीकाही लावते. बाळाचा केलेला असा श्रुंगार पाहून त्या गोजिरवाण्या बाळाला कुणीही पटकन उचलून घेते. ताई, अगं, आई की नाही, तुम्हा मुलींची वेणी घालते, तिला रिबीन बांधून छान तयार करते म्हणून मला बाबांपेक्षा आई जास्त आवडते." प्रथमेश आत्मविश्वासाने म्हणाला.


"रिबीन असेल, पावडर असेल, कपडे असतील पण ते सारे विकत आणावे लागते आणि त्यासाठी लागणारे पैसे कोण मिळविते तर बाबा. घरात बसलेल्या आईला का कुणी पैसा देते का? नाही ना ? म्हणून मला बाबा आवडतात." प्रथमा ठसक्यात म्हणाली.


प्रथमेश का मागे राहणार होता. तोही जिद्दीला पेटला होता. तो म्हणाला,"ताई, आमच्या बाई काय म्हणतात माहिती आहे का, आई म्हणजे देवीच असते. म्हणून आधी मायीला म्हणजे आईला पुजावे. तिचा आदर, सन्मान करावा. रोज सकाळी उठले की, आधी आईच्या पाया पडावे. तिच्या पायाला हात लावून नमन करावे. बाई, म्हणतात ते पटते मला. आपल्याला जे हवे ते आई देते उलट एखादी गोष्ट आपण मागितली आणि बाबा नाही म्हणाले तर आई बाबांकडे हट्ट धरून, कधीकधी त्यांच्याशी भांडून ती वस्तू आणायला लावते म्हणून तू काहीही म्हणाली तरी मला आईच जास्त आवडते."


"आईच्या पाया पडणे, तिचा आशीर्वाद घेणे हे चांगलेच आहे पण तुला एक गंमत सांगू का, आई नेहमी बाबांच्या पाया पडते याचा अर्थ काय तर मोठेपणामध्ये बाबांचा क्रम वरती आहे. अजून एक बघ ना, बाबा बाहेरून आले की, आई कशी सावरून बसते, डोक्यावरून पदर घेते. बाबांना काय हवे, काय नको याची आस्थेने, आदराने चौकशी करते. आता तरी कबुल कर, असा बैलोबा होऊन मान डोलावू नकोस. आईपेक्षाही बाबा सगळ्याच बाबतीत मोठे आहेत. अरे, आता हेच पहाना, आईप्रमाणेच इतर बायकाही बाबांसोबत म्हणजे पुरुषांसोबत लग्न करायला तयार होतात यावरून तरी लक्षात घे, मान्य कर की, आईपेक्षा अधिक आवडती बाबा मला..."


प्रथमा स्वतःची बाजू सविस्तरपणे मांडत असताना अचानक टाळ्यांचा आवाज दोघांच्याही कानावर पडला. तो ऐकून दोघांनीही दचकून तिकडे पाहिले. त्यांचे आईबाबा टाळ्या वाजवत त्यांच्या दिशेने येत होते ते पाहून दोघेही घाबरून उभे राहिले.


दोघांपैकी कुणी काही बोलण्यापुर्वीच बाबा म्हणाले,"व्वा! व्वा! तुमची उत्स्फूर्त चर्चा ऐकून मला तर एखाद्या सिनेमात, एखाद्या कार्यक्रमात जशी कव्वालीची जुगलबंदी होते ना त्याचीच आठवण आली...."

"पण बाबा..."

"नाही. बेटी, नाही. तुमची मतं ऐकून आम्ही नाराज झालो नाहीत तर आम्हाला आनंद झाला, तुमचा अभिमान वाटला." आई म्हणाली.

"मला एक सांगा, ही तुमची चर्चा अशीच चालू होती की, कुठे काही ऐकून...."

"बाबा, शाळेत दुपारच्या सुट्टीत आम्ही जेवण करीत असताना आमचे गुरुजी दररोज वेगवेगळी गाणी लावतात. ती सारी गाणी आम्हाला खूप आवडतात परंतु हे गाणे मला जास्त आवडते." प्रथमा म्हणाली. ते ऐकून प्रथमेशही म्हणाला,

"मलाही हे गाणे खूप आवडते. आम्ही अनेकदा मित्र मित्र मिळून अशीच चर्चा करत असतो."


"खूप छान. एक सांगा, हे गीत कुणी लिहिले आहे ते माहिती आहे का?" बाबांनी विचारले आणि प्रथमा, प्रथमेश यांनी एकमेकांकडे पाहिले.

तसे बाबा म्हणाले,"ठिक आहे. नसेल माहिती तर मी सांगतो ना. 'कोण आवडे अधिक तुला?' हे गीत गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडगूळकर या एका मोठ्या गीतकाराने लिहिलेले आहे. गदिमांनी हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दोन हजारांहून अधिक गाणी लिहिली आहेत. बालकांसाठीही त्यांनी सोपी सोपी, समजण्यासारखी, छान संदेश देणारी अशी एकाहून एक सरस अशा अनेक बाल कविता, गीतांची रचना केली आहे. 'झुकझुक आगीनगाडी असेल, गोरी गोरी पान दादा मला एक वहिनी आण असेल, नाच रे मोरा आंब्याच्या वनात असेल, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गीत असेल, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही हे असेल, सैनिकहो, तुमच्यासाठी हे असेल, हे राष्ट्र देवतांचे .. हे असेल, जिंकू किंवा मरु .... अशी अनेक गाणी त्यांनी लिहिली आहेत...."

"होय बाबा. यातली बहुतेक गाणी आम्ही दररोज शाळेत जेवण करताना ऐकतो."

"तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती अशी की, सध्या गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे म्हणजे त्यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. अशावेळी तुम्ही त्यांच्या एका गीतावर अशी छान चर्चा करता हे पाहून आनंद झाला." बाबा म्हणाले.

"हो ना. नाहीतर काही मुले टीव्ही आणि मोबाईल सोडता सोडत नाहीत." आई म्हणाली.

"बाबा, एक काम करता का हो, गदिमांच्या गीतांच्या कॅसेट आणता का? आम्ही रोज सायंकाळी शाळेचा अभ्यास झाला की,त्यांची छान छान गाणी ऐकत जाऊ." प्रथमा म्हणाली आणि बाबांनी तिच्या आईकडे पाहताच आई म्हणाली, "अहो, पाहता काय असे? द्या की आणून. बाहेर नेऊन मुलांना काहीबाही खाऊ घालता त्यापेक्षा हे कितीतरी पटीने छान आहे की. "

"व्वाह! किती सुंदर कल्पना आहे. आवडली मला. मी उद्याच मिळतील तेवढ्या कॅसेट घेऊन येतो आणि गदिमांची बालगीतांची पुस्तकेही घेऊन येतो." हसतहसत बाबा म्हणाले. बहीण-भाऊ टाळ्या वाजवत असताना प्रथमा प्रथमेशकडे पाहून म्हणाली,

      "आता तरी मान्य कर रे तू बैलोबा,

      आईहूनही मोठ्ठे बाबा, 

      गदिमांची गाणी आणून देती आम्हा..."

ते ऐकून सारे समाधानाने हसू लागले....

               - नागेश सू. शेवाळकर,

               


Rate this content
Log in