कॉलेज 1
कॉलेज 1


काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला काही मुलं पास झाली तर काही नापासही झाली. पण आता चाहूल लागलेली ती म्हणजे कॉलेज सुरु होण्याची, सगळी मुले कॉलेजचं जीवन अनुभवण्यासाठी फार उत्सुक होती. मी आमच्या शहरातील नामवंत कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
मी विचार केलेला की कॉलेजमध्ये छान असे कपडे घालुन जाणार, मन लावुन अभ्यास करणार,नवीन मित्र बनवणार. परंतु आमच्या कॉलेजला युनिफॉर्म होता. माझा पहिला विचार तर ह्या नियमामळे नष्ट झाला. कॉलेज सुरु होण्याचा दिवस जवळ येत गेला आणि अखेर कॉलेज सुरु होण्याचा दिवस आला. मी छानपणे कॉलेजला जाण्यासाठी तयार झालो. कॉलेजला जाण्याच्या उत्सुकतेने मी जोरात जोरात पाऊले टाकत रिक्षा स्टैंडपर्यंत पोहोचलो. अखेर मी कॉलेजच्या गेटबाहेर पोहोचलो. आत जाताच बघतो तर काय?
एक भली मोठी इमारत होती. मी त्या इमारतीच्या आत गेलो. मी तिथे असलेल्या शिपाई काकांना विचारल “अकरावी कॉमर्सचा वर्ग कुठे आहे?” त्यांनी मला सांगितलं की माझा वर्ग कुठे आहे. मी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे माझ्या वर्गात गेलो. मी एका मुलाच्या बाजुला जावुन बसलो. काही वेळानंतर त्याच्याशी बोलण्यातून मला कळालं त्याचं नाव ‘राज मोरे’ आहे, तो डोंबिवलीवरुन आमच्या कॉलेजला यायचा. हे ऐकून मी चकीत झालो कारण मला मी तरी जवळून कॉलेजला येतोय तो तर इतक्या लांबून कॉलेजला येतोय. काही वेळात आमचे वर्गशिक्षक आले. त्यांनी आम्हाला वेळापत्रक लिहून दिले आणि कॉलेजचे काही नियम सांगितले. थोड्या वेळात घंटा वाजली. सर वर्गातून बाहेर गेले.
थोडा वेळ बोलून बोलून मी अजुन मित्र बनवले. आम्ही एकमेकांना आमचे फोन नम्बर्सदेखील दिले आणि काही वेळात सूचना आली की “थोड्या वेळात तुमचं कॉलेज सुटेल तुम्ही घरी न जाता आपला कॉलेजमधलं ग्रंथालय, प्ले रुम, ग्राउंड, कॅन्टीन, संगणक कक्ष पहा आणि त्या नंतर घरी जा.” मग मी नवीन मित्रांबरोबर कॉलेज फिरलो. काही वेळानंतर आम्ही घरी निघालो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता आणि अश्याप्रकारे माझा कॉलेजचा पहिला दिवस पार पडला.
अजुन संपल नाही ही तर फक्त सुरुवात आहे. अजुन खूप काही बाकी आहे.
(क्रमशः)