कोकरु
कोकरु
रामू धनगर आपली शंभर मेंढरं घेऊन येरवाळी डोंगरावर निघाला.पायाखालची वाट असल्यानं नेहमीप्रमाणं जागोजागी थांबत मेंढरं चरवत - चरवत डोंगरमाथा त्याला गाठायचा होता.शेवटी नेहमीच्या विसाव्याच्या जागी पोहचला,घाम पुसुन घटकाभर थांबुन त्यानं खांद्यावरच घोंगडे झाडा खाली अंथरूण भाकरी सोडली.आता त्याला कोणतीच घाई न्हवती. वातावरण पण चांगलं होत.नेहमीच्या जागी वेळेत सारी पोहोचले होते.निवांत चटणी-भाकर कांदा गार हवेत खात होता.मेंढरं मनमुरादपणे चरत होती.रामानं न्याहरी उरकून चरणाऱ्या मेंढराना कोणताच धोका नव्हता त्यामुळे भरल्यापोटी त्यानं छोटीशी डुलकी घेतली.
झोपून उठल्यावर झाडा- झुडपाचा पाला बेणून तो मेंढ्यांना घालु लागला. दिवस बराच कलांडला होता अन त्याला आता घरी परतायचे वेध लागले. जसा दिवस ढळू लागला तसं त्यानं मेंढरं गावाच्या रस्त्याला लावली. पण का कुणास ठाऊक आज त्याला काही तरी चुकल्यासारखं वाटलं. घरी परतताना मेंढरं बरोबर आहेत काय याची खात्री करावी असे त्याला वाटले. सगळी मेंढरं सारखी वाटत असली तरी त्याची मोजायची पद्धत वेगळी होती. मेंढराच तंगड धरून एक एका बाजूला तर दुसरं दुसऱ्या बाजूला ढकलत त्याला अडाणी असूनसुद्धा बरोबर गणती जमायची. पण आज एक कोकरु कमीच भरलं. त्याला आश्चर्य वाटलं आणि खात्री करण्यासाठी पून्हा एकदा गणती केली पण खरंच एक कोकरू कमी भरलं. त्याच्या नजरेसमोर कमी असणार कोकरु येऊ लागलं. कुठं राहीलं असल? त्याला प्रश्न पडला. थोडा अस्वस्थ झाला पण लगीच त्यानं सारी मेंढरं गावाच्या दिशेनं हाकलून दिली आणि मोठया कळवळयानं चुकलेल्या कोकरास साद घालू लागला.पण कुठूनही त्याला साद मिळत न्हवती. मनानं हळव्या व कातर झालेल्या रामान गावाच्या दिशेनं सोडलेल्या शंभर पैकी ९९ मेंढराचा केंव्हाच विचार सोडून चुकलेल्या कोकरावर लक्ष केंद्रित केलं. चुकलेल्या एका कोकराऐवजी राहिलेल्या ९९ मेंढराना घरी सुखरूप नेणं हा व्यापारी हिशोब त्यानं मनात सुद्धा आणला नाही. हरवलेल्या कोकराची किंमत न करता आपण त्याचे रखवालदार आहोत याची जाण ठेऊन त्यानं कोकरु शोधायचा ध्यास घेतला. आर्ततेने साद घालत राहिला आणि आक्रीत झालं लांबून दुरून कुठून तरी त्या चुकलेल्या कोकराचा ओरडून-ओरडून दमल्यानं श्रांत आवाज शेवटी त्याच्या कानावर आला .तसा खसपसनाऱ्या झुडपाच्या दिशेने रामू वेगात धावला. कोकरु दिसताच बावरलेलं कोकरु पटकन उचलून त्यानं छातीशी कवटाळून धरलं.दोघेही एकमेकांकडे बघत होते. कोकरु देखील आनंदानं रामुला निर्धास्थ बिलगलं.रामूनं त्याला आनंदानं जमिनीवर सोडलं नाही. त्याला खांद्यावर घेत आनंदाने तोंडात येईल ते गाणं म्हणत गावाकडे पळत डोंगर उतरू लागला. रस्त्यातल्या वाहत्या झऱ्यावर त्यांना कोकराला पाणी पाजलं. दोघेही निवांत पाणी पिऊन रस्त्याला लागली. रामाच्या गाण्याला कोकरु त्याच्या आवाजात साद देत होतं. जिव्हाळा हा असाच असतो, खरा रखवालदार हा कधीच हिशोबी नसतो.
देव सुद्धा सुखात व्यवस्थित जीवन व्यथित करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून दुरून लक्ष ठेवतो पण चुकलेल्या,संकटात सापडलेल्या,आजारानं दुबळया झालेल्याना व आपल्यावर विसंबुन राहणाऱ्या भक्ताला असाच हृदयाशी धरतो.प्रेमाने सारा भार खांद्यावर घेतो. त्याचा रखवाला होऊन त्याला अलगदपणे सुरक्षित ठेवतो,अभयदान देतो.अगदी या निष्पाप कोकरासारखं.
