कमिटमेंट # ३
कमिटमेंट # ३


तदेव लग्नम सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव........
.
.
शुभमंगल सावधान!!
लग्नात कन्यादान करत असताना तिच्या वडिलांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं.
त्यांची नजर काहीतरी शोधत होती.
त्यानं आश्वासक नजरेने त्यांचा हात दाबला.
ते गहिवरले....
जणू ती नजर सांगत होती.....
मी तुमच्या मुलीचं प्रेमाने, मायेने आणि विश्वासाने रक्षण करीन.
तिच्या स्त्रीत्वाचा....कर्तृत्वाचा...मान राखीनं.....
लग्न लागलं......
नवीन आयुष्याचं माप ओलांडून ती त्याच्या घरी आली.
तो शिकलेला..बुद्धिमान..
ती ही तशीच
त्याच्या पेक्षा काकणभर सरसच.
तो नोकरी करणारा, उच्चपदस्थ
तिचा अजून नोकरी संघर्ष चालू
....अचानक तिला परदेशी जाण्याची आणि तिथे जाऊन ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाली.
ट्रेनिंग नंतर ती त्याच्याच ऑफिसला त्याच्यापेक्षा वरच्या पोस्टला जॉईन होणार.
त्याच मन खट्टू झालं.
विचारांनी डोकं सुन्न झालं..
ठरलं.....
आपल्या नवरेपणाचा फायदा घेऊन
तिला यापासून परावृत्त करायचं.
तो घरी आला बघतो तो तिचे
बाबा आणि आई सोफ्यावर बसलेले.
तो आलेला बघून तिचे बाबा म्हणाले,
" बघा ना हो जावईबापू , काय वेड घेतलेय हिने.
आम्हीही स्पष्ट सांगितलंय,
जर तुमची परवानगी असेल
तरच जायचं"
त्यानं बोलायला तोंड उघडलं आणि ...
"......मी विश्वासाने तुमच्या मुलीचे रक्षण करीन.
तिच्या कर्तृत्वाचा मान राखीन..."
शब्द ..त्याच्या कानात घुमू लागले
.......त्यानंच मनोमन दिलेलं वचन..
पुन्हा माईंडस्क्रिन रिफ्रेश..
बाबांचा हात हातात घेऊन म्हणाला,
" जाऊ दे तिला
पसरु दे पंख
झेपावू दे उंच आभाळात
थोड्या दिवसांचाच तर प्रश्न आहे"
मोठ्ठा आ वासून ती पहात राहीली.
तिची विकेट सपशेल पडलेली
करियरची मॅच तीने जिंकली
पण मॅन ऑफ द लाईफ मॅच अॅवॉर्ड यालाच.
नवऱ्या बद्दलचा सार्थ अभिमान तिच्या भरून आलेल्या डोळ्यातून वाहू लागला आणि मनोमन ती ही वचनबद्ध झाली.