SMITA GAYAKUDE

Others

2  

SMITA GAYAKUDE

Others

खूप मोठा होणार

खूप मोठा होणार

4 mins
571


आज खूप खुश आहे मी.. बारावीचा निकाल लागला आणि मी 86% गुण मिळवून पास झालो.. आधीच्या मी आणि आताच्या मी मध्ये किती फरक आहे ना.. पण असू देत.. आता मी थांबणार नाही.. खूप मोठा होणार.. माझ्या कर्तृत्वाने मागची दोन तीन वर्षाच्या आठवणी पुसून काढणार.. 

आज अजूनही आप्पांचे ते शब्द कानावर जसेच्या तसें घुमतायेत.. 

"बाळा, आता मागे नाही तर पुढे जाण्याची वेळ आली आहे.. झालं गेलं ते एक वाईट स्वप्नं म्हणून विसरून जा.. आणि खूप मोठा हो.. "

ह्या त्यांच्या वाक्याने मला पूर्णपणे बदलून टाकलं होतं.. मला आधीचा अद्वैत बनवलं होतं.. का मी ती दोन वर्ष माझ्यावर आप्पा आणि अम्माने केलेल्या संस्कारांना विसरलो होतो..

लहानपणापासूनच मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो आहे.. लहानपणी आजीच्या श्यामची आई, तेनालीरामनच्या गोष्टी, रामायण, महाभारत ऐकत मोठा झालो मी.. अभ्यासात तर मी आधीपासूनच खूप हुशार होतो.. आप्पा आणि अम्मा नी कधीच कोणती बंधने माझ्यावर लादली नाहीत.. आणि मीही कधी त्यांच्या मनाविरुद्ध वागायचा प्रयत्न केला नाही. अद्वैत म्हणजे गुणी मुलगा असच सगळ्यांच्या मनात माझी प्रतिमा होती.. आधीपासूनच मी अभ्यासात हुशार असल्याने दहावीलाही माझ्याकडून सगळ्यांच्या खूप अपेक्षा होत्या.. आणि त्या अपेक्षांना सार्थ ठरवत मी 95% गुण मिळवून उत्तीर्ण झालो.. खरच किती खुश झालेले सगळे.. आप्पानी तर माझ्या भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी पैशांची जुळवाजुळव ही करायला सुरुवात केली.. आणि मला शहरातल्या सगळ्यात चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन दिला.. किती कष्ट केले होते त्यांनी माझ्या कॉलेजची फी भरताना.. पण हे कोडकौतुक, मला चांगले मिळालेले मार्क्स माझ्या डोक्यात गेलं आणि मी हवेतच उडू लागलो.. त्यातच मला कॉलेज मध्ये एक 5-6 जणांचा ग्रुप भेटला.. आणि मी माझ्यावर असलेल्या संस्कारांना विसरून ह्या ग्रुपच्या वाईट संगतीत वाहवत गेलो.. लास्ट बेंचवर बसून टपोरीपणा करणे, येता जाता मुलींची छेड काढणे, सिगारेट ओढणे आणि दारू पिऊन बाईकवरून इकडे तिकडे फिरणे हेच माझं आयुष्य बनलं.. काय चांगलं आणि काय वाईट हेच कळेनासं झालेलं मला.. घरातल्यांपेक्षा त्या ग्रुप वर जास्त विश्वास ठेवायला लागलो.. आप्पा आणि अम्मांनी मला वेळोवेळी सावरायचा प्रयत्न केला पण मी मात्र ह्या सगळ्यालाच आयुष्य मानून बसलो होतो..बारावीचा वर्ष होता.. पण ह्या सगळ्यांमध्ये अभ्यास कधी केलाच नाही.. 


बारावीची परीक्षा संपली होती आणि एके रात्री मी आणि माझ्या कॉलेज मधला ग्रुप दारू पिऊन भन्नाट वेगात गाडी चालवत रस्त्यावर फिरत होतो.. आणि नशेत गाडीवरचा ताबा सुटला आणि आम्ही जाऊन झाडावर आदळलो.. पुढे काय झाले काहीच आठवत नाही... आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटल मध्ये होतो.. हाता पायाला खूप सारे पट्ट्या बांधल्या होत्या..समोर आप्पा आणि अम्मा उभे होते आणि मी शुद्धीवर आलेला बघून त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं.. दुपारी जेव्हा डॉक्टर मला बघायला आले तेव्हा मी अर्धवट झोपेत च होतो आणि डॉक्टरांनी आता अद्वैत ठीक आहे..उद्या तुम्ही घरी जाऊ शकता..बिल आज क्लिअर करून टाका असं सांगितलं.. तेव्हा आप्पा अम्माला म्हणत होते.." बिलचं काय ग.. आपला अद्वैत बरा झाला हेच खूप आहे आपल्यासाठी.. तीन लाख त्या देसाई काकांकडून उसने घेऊन भरून टाकतो आज.." अम्मा आप्पाना म्हणत होती.."त्याला नीट बरा होऊ दे हां...काही ओरडू नकात..झालेल्या गोष्टीबद्दल काही बोलू नकात हां.."

हे ऐकून माझ्या मनाचे तुकडे तुकडे झाले..हवेत उडणारा मी एका क्षणात जमिनीवर आलो..काय करत होतो मी..खूप पश्च्याताप होत होता..स्वतःचा खूप राग येतं होता..

डिस्चार्ज मिळाला आणि घरी आलो..त्या दिवशी रात्री आप्पा आले माझ्याजवळ आणि म्हणाले.."बाळा बरं वाटतंय ना आता? "

मला काय बोलावं काही कळत नव्हतं..खूप अपराधी वाटतं होतं.. मी मोठ मोठ्याने रडायला लागलो.. 

"आप्पा माफ करा मला.. खूप चुकलो मी.. मी असं वागायला नको होतं.. मी तुमचा मुलगा म्हणून घ्यायच्या लायकीचा ही नाहीय.. "

"नाही बाळा.. आयुष्यात चुका सगळ्यांकडूनच होतात..पण त्या चुकांची पुनरावृत्ती परत होऊ नाही द्यायची.. चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो तोच खरा शहाणा..अजूनही वेळ गेलेली नाहीय बाळा.. आता मागे पाहू नकोस.. सुधार आता स्वतःला आणि पुढे जा. "

"हो बाबा.. परत अशी चूक करणार नाही ज्याने तुमचं नाव खराब होईल.. " अद्वैतने आप्पाना उठून घट्ट मिठी मारली.. अम्मा दारातच उभी राहून सगळं ऐकत होती आणि साडीच्या पदराने डोळे पुसत होती..

बारावी नापास झालो होतो मी.. त्याचं दिवशी ठरवलं आता परत बारावीची परीक्षा द्यायची आणि नीट अभ्यास करायचं.. 

बारावीचा फॉर्म भरला.. परीक्षा दिली आणि आज निकालही लागला.. 86% गुणांनी उत्तीर्णही झालो.. आप्पा सकाळपासूनच आनंदाने सगळ्यांना पेढे वाटत होते.. आणि मी बेडवर आडवा पडून भविष्याचा विचार करत होतो... 

आज मोठ मोठ्याने ओरडून सांगावस वाटत होतं... 

"आप्पा आता मागे नाही तर पुढे जाण्याची वेळ आली आहे.. 

माझ्या कर्तृत्वाने आप्पा तुमचं नाव खूप मोठं करणार.. खूप मोठं करणार.. "


कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा.. share करा पण नावासहीतच..



Rate this content
Log in